उत्तर प्रदेश व बिहारमधून येणाऱ्यांना येथे नोकऱ्या मिळणार असतील आणि मराठी तरुणांच्या तोंडचा घास हिरावून घेतला जाणार असेल तर परप्रांतीयांना पुन्हा मारीन असा खणखणीत इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. महाराष्ट्रात दिल्लीत दिसते पण दिल्लीत महाराष्ट्र दिसत नाही, अशावेळी महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत गर्जावा म्हणूनच लोकसभा निवडणूक लढवत असल्याचेही राज यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश व बिहारसरख्या राज्यातून लोक नोकरीसाठी येतात. नंतर आपले मतदारसंघ निर्माण करतात आणि मराठी टक्का कमी करण्याचे उद्योग करतात. यातूनच अबू आझमीसारखी व्यक्ती दोन दोन मतदारसंघातून निवडून येते. आबू आझमीसारखी घाणेरडी व्यक्ती या महाराष्ट्रात नको, असेही राज यांनी लालबाग येथील जाहीर सभेत सोमवारी सांगितले. देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूपासून राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयींपर्यंतचे जवळपास सर्व पंतप्रधान हे उत्तर प्रदेशमधून निवडून आले. त्यांनी यूपी-बिहारचा विकास का केला नाही, असा सवाल करत त्यांचे ओझे महाराष्ट्राने का वाहायचे असा खडा सवालही राज यांनी केला.  रेल्वेपासून सर्व ठिकाणी परप्रांतीयांचीच भरती होते. रेल्वे स्थानकावरील खानपान सेवाही परप्रांतीयांच्याच हातात, हे सर्व यापुढे खपवून घेतले जाणार नाही. मराठी तरुणांच्या तोंडचा घास पळवून नेणार असाल तर पुन्हा मारीन असा इशाराही त्यांनी दिला.
प्रत्येक वेळी महाराष्ट्रानेच देशाचा विचार करायचा हेच आजपर्यंत चालले आहे. देश महाराष्ट्राकडे कधी पाहणार असा सवाल करत मी मराठी माणसासाठी आवाज उठवला की, तात्काळ दिल्लीत यूपीचे नेते टीका करतात. दुर्दैवाने महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत तोंडही उघडत नाहीत, म्हणूनच यांची हिम्मत होते, असेही ते म्हणाले. यापुढे हे चालणार नाही, महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत गेलाच पाहिजे आणि मनसे तो उठवल्याशिवाय राहणार नाही असे राज यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बसवलेले मुख्यमंत्री आहेत तर नरेंद्र मोदी हे स्वत:च्या कर्तृत्वावर निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना मॅडम सोनिया गांधी यांनी उठ म्हणले ते उठणार, चालते व्हा म्हटले की हे निघून जाणार, असले मुख्यमंत्री काय कामाचे असा प्रश्न उपस्थित करत या काँग्रेसवाल्यांना मुंबईचे आणि महाराष्ट्राचेकाहीही पडलेले नाही, असेही राज म्हणाले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना अनधिकृत झोपडय़ांनी विळखा घातला आहे. उद्या तेथे काही घातपात झाला तर मुंबईचे पाणी बंद होईल, असे सांगत मुंबई आज परप्रांतीयांमुळे असुरक्षित बनल्याची टीका त्यांनी केली.