राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेची धार अधिक तीव्र करताना, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संघ ही विखारी संघटना असून ती देशास ‘संपवू’ शकते, असे आरोप केले. सरदार पटेलांचा पुतळा उभारू पाहणाऱ्या मोदींना त्यांचे संघाविषयीच्या विचारांचा विसर पडलेला दिसतो, असे शेलके बोलही गांधी यांनी या वेळी सुनावले.
लोकसभा निवडणुकीच्या हिमाचल प्रदेशातील काँग्रेस पक्षाच्या प्रचारास राहुल गांधी यांच्या सभेने प्रारंभ झाला. नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान करताना ‘आपली हयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घालवलेल्या मोदींनी सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करणे हास्यास्पद आहे. मोदींनी इतिहासाचे किंवा सरदार पटेलांच्या विचारांचे अजिबात वाचन केलेले नाही’, अशी टीका केली.
‘सरदार पटेल यांनीच संघ ही विषवल्ली असल्याची टीका केली होती, याचे मोदींना विस्मरण झाले आहे की काय’, असा सवालही त्यांनी केला.
ही निवडणूक म्हणजे पक्षांमधील किंवा उमेदवारांमधील लढाई नसून ती विचारांमधील – मूल्यांमधील लढाई आहे. देशातील सामान्य माणसाला सबल करणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे, तर केवळ श्रीमंतांचे हितसंबंध जोपासणे हे भाजपाचे लक्ष्य आहे. – राहुल गांधी