अभिनेते-खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव भाजप उमेदवारांच्या यादीत नसल्याने त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी सिन्हा यांचे नाव का वगळण्यात आले, असा सवालच केला आहे. दलबदलू नेत्यांना उमेदवारी देण्यात आली, असा आरोपही आता केला जात आहे.
भाजपने गुरुवारी २५ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली त्यामध्ये सिन्हा यांचे नाव का नाही, अशी विचारणा सातत्याने होत असल्याचे माजी आमदार विनोद यादव आणि भाजपचे पदाधिकारी संजय राम यांनी सांगितले. पाटणा साहिब मतदारसंघातून सिन्हा यांना उमेदवारी दिली नाही तर पक्षाला तेथे नुकसान होईल, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याची शिक्षा सिन्हा यांना देण्यात येत आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. इतरही काही नेते नाराज आहेत.