देशातील प्रत्येक नागरिकाला लोकशाहीने मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे त्या अधिकाराचा उपयोग करणे म्हणजे सामाजिक न्याय आहे. प्रत्येक नागरिकाने मतदान करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. त्यामुळे उमेदवार आवडो किंवा न आवडो, आपल्या मनाला जो उमेदवार स्वच्छ आणि प्रामाणिक वाटत असेल, अशा उमेदवाराला मतदान केलेच पाहिजे. मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी शासकीय पातळीवर आणि विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आल्यामुळे लोकांमध्ये जागृती आली आहे. कुठल्याही उमेदवाराच्या प्रेमात न पडता काटेकोरपणे आणि निपक्षपातीपणे उमेदवाराला मतदान केले पाहिजे.
शिवाय, कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदान केले पाहिजे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आपले कर्तव्य संपले, असे न समजता, ज्याला आपण मतदान करतो तो कशाप्रकारे काम करतो, याचा विचार केला पाहिजे. राजकारणाचा फार अभ्यास नाही, मात्र सध्याची परिस्थिती बघता देशात परिवर्तनाची गरज आहे. सध्याचे राजकारण ‘मार्केटिंग बेस’ झाले आहे. इतके मार्केटिंग नसावे. यामुळे त्याविषयीची विश्वसनीयता कमी होण्याची भीती आहे. मतदानाच्या दिवशी सुटी दिली जात असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या अधिकाराचा उपयोग करून मतदान करावे आणि योग्य उमेदवार निवडून द्यावा, असे आवर्जून सांगावेसे वाटते.