केंद्रातील यूपीए सरकारने गेल्या दहा वर्षांंमध्ये जेवढे काम विविध क्षेत्रांमध्ये केले तेवढे काम देशात कधीच झाले नव्हते.  वातावरण काँग्रेसच्या विरोधात असल्याचे चित्र भाजपच्या वतीने उभे करण्यात आले असले तरी काँग्रेसला नाकारण्याएवढे मतदार मूर्ख नाहीत, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी गुरुवारी केला.
अवघ्या २४ तासांमधील तीन घटनांवरून भाजपमध्ये सारे आलबेल नाही हेच स्पष्ट होते. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची उमेदवारी गांधीनगरमधून जाहीर झाली असली तरी ते लढण्यास अनुकूल नव्हते. भाजपमधूनच धोका निर्माण करण्याची भीती अडवाणी यांना होती. शेवटी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या निवासस्थानी धाव घ्यावी लागली. उत्तर प्रदेशमधील मुझ्झफरनगरमधील दंगलीत सहभाग असलेल्या दोन जणांना उमेदवारी देण्यात आल्याने भाजपचा खरा चेहरा पुढे आला. भाजपचे नेते ‘पार्टी विथ डिफरन्स’ असा दावा करीत असले तरी या पक्षातील हेवेदावे एवढे समोर आले की पक्षात साराच गोंधळ (डिफरन्स) समोर आला, असेही मत सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राज्यातील प्रवक्ते अनंत गाडगीळ व सचिन सावंत उपस्थित होते.