तीस वर्षांनंतर देशात एकाच पक्षाला संपूर्ण बहुमत मिळण्याची करामत करणाऱ्या भाजपच्या विजयाची तसेच नरेंद्र मोदींच्या कामगिरीची दखल जगभरातील सर्व प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही राष्ट्रातील निकालांवर जागतिक वृत्तपत्रांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी मोदी आणि भाजप यांचे कौतुक करीत त्यांना सुयश चिंतिले आहे, तर काही नियतकालिकांनी नव्या सरकारवर अपेक्षांचे प्रचंड ओझे असल्याचे सूचित केले आहे.
चीनकडूनही दखल
‘मोदींशी असलेल्या व्यक्तिगत संबंधांमुळे भारत-चीन संबंध सुधारण्यास वाव’ असे सांगत चीनमधील ‘साउथ चायना मॉर्निग पोस्ट’ या दैनिकाने मोदी सरकारकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. देशातील अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांनी मोदींची आईचे आशीर्वाद घेतानाची छबी पहिल्या पानावर छापली आहे. मोदी यांच्या परराष्ट्रविषयक भूमिकांचेही चीनकडून कौतुक करण्यात आले आहे.
अमेरिकेत अग्रलेख
द न्यूयॉर्क टाइम्सने मोदी यांच्या विजयाची दखल घेत या विजयाचे विश्लेषण करणारा अग्रलेख लिहिला आहे. ‘नरेंद्र मोदींसह भारतात बदलाचे वारे’ असे शीर्षक असणाऱ्या या लेखात प्रस्थापित अभिजनांविरोधात असलेल्या तीव्र लोकभावना निकालातून प्रतिबिंबित झाल्याचे म्हटले आहे. मात्र मोदींनी स्वत:कडून असलेल्या अपेक्षा इतक्या उंचावल्या आहेत की त्यांची पूर्तता करताना समाजातील कोणत्याही घटकाला वगळणे त्यांना परवडणारे नाही, असा सावधगिरीचा इशाराही मोदी आणि भाजपला देण्यात आला आहे. एक उद्योगस्नेही पंतप्रधान की सांप्रदायिकतेला खतपाणी घालणारे संकुचित हिंदू राष्ट्रवादी पंतप्रधान, यातून नरेंद्र मोदी यांना अचूक पर्यायाची निवड करावी लागणार असल्याचेही न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.
ओबामांकडून अभिनंदन
लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भावी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी रात्री दूरध्वनीवरून अभिनंदन केले. दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मोदींना अमेरिका भेटीचे आमंत्रणही त्यांनी दिले.  दोन्ही नेत्यांमधील पहिल्याच संभाषणात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी मोदींना अमेरिका भेटीचे आमंत्रण दिल्याचे व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. मोदी ‘ए-वन’ वर्गातील व्हिसासाठी पात्र ठरतील, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.
पाकिस्तानात विस्तृत वर्णन
शेजारील राष्ट्र असलेल्या पाकिस्तानातील उर्दू भाषिक आणि इंग्रजी भाषिक अशा दोन्ही प्रकारच्या दैनिकांनी भारतीय लोकसभेच्या निकालांना पहिल्या पानावर स्थान दिले आहे. ‘हिंदू राष्ट्रवादी असलेले नरेंद्र मोदी शतकावर भारताची मोहोर उमटविण्यास सज्ज’ असे वर्णन ‘द नेशन’ या वृत्तपत्राने केले आहे. तर ‘द डॉन’ या आघाडीच्या पाकिस्तानी दैनिकाने ‘काँग्रेसला भाजपचा दणका’ अशा शब्दांत या विजयाचे वर्णन केले आहे. यांच्याबरोबरच जंग, नवा-इ-वक्त, मश्रिक, दुनया, जेहान पाकिस्तान यांसारख्या उर्दू दैनिकांनीही मोदीविजयास पहिल्या पानावर स्थान दिले आहे.