आम आदमी पक्षाला काँग्रेसची ‘बी टीम’ संबोधून नरेंद्र मोदी दिल्लीकरांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप ‘आप’ ने केला आहे. दिल्लीच्या सीलमपूर भागात बुधवारी झालेल्या सभेत मोदींनी आम आदमी पक्ष म्हणजे काँग्रेसचेच अपत्य असल्याचा आरोप केला होता. तेवढय़ावरच न थांबता मोदींनी काँग्रेस- ‘आप’च्या दिल्ली विधानसभेत झालेल्या युतीची ‘अभूतपूर्व’ अशी उपहासात्मक संभावना केला होती. त्यामुळे चवताळलेल्या आम आदमी पक्षाने मोदींवर हल्ला चढविला.
विशेष म्हणजे, राष्ट्रपती राजवटीच्या माध्यमातून काँग्रेसला मागच्या दाराने सत्ता चालविण्यासाठी आम आदमी पक्षान संमती दिली, असा आरोप मोदी यांनी केला होता. मोदींचा हा आरोप आपला चांगलाच झोंबला आहे. आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल, प्रा. योगेंद्र यादव यांनी मोदींच्या आरोपांना थेट उत्तरे देणे टाळून एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. ज्यात म्हटले आहे की, राष्ट्रपती राजवटीविषयी मोदींनी दिल्लीकरांची दिशाभूल केली. आम आदमी पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळे आलेली निराशा अर्धसत्य सांगून मोदींनी दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु, दिल्लीकरांचा त्यांच्यावर कदापि विश्वास बसणार नाही. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला आपने विरोध केला. जेव्हा सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याची वेळ आली तेव्हा भाजप नेते गप्प का बसले, असा प्रश्न आपने मोदींना विचारला.