प्रचारासाठी ‘आप’चे अभिनव मार्ग

मर्यादित आर्थिक साधने आणि गुजरातमधील भाजपचे वर्चस्व यांचा सामना करण्यासाठी अभिनव प्रचारपद्धती राबविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला आहे. पथनाटय़े, तरुण प्रशिक्षणार्थी अशा अपारंपरिक मार्गानी ‘आप’ प्रचार करणार आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोहोंनाही कंटाळलेल्या नागरिकांना ‘तिसरा पर्याय’ देऊ पाहणाऱ्या आपकडे आर्थिक उत्पन्नाचे विशेष स्रोत नाहीत. वृत्तपत्रांद्वारे, दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी यांच्यावरील जाहिराती, पोस्टर अशा पारंपरिक मार्गानी प्रचार करण्याचा मार्ग अनुसरणे या पक्षाला परवडणारे नाही. म्हणून पुढील आठवडय़ापासून, गुजरातमध्ये पथनाटय़ांद्वारे पक्ष प्रचारास सुरुवात करेल, अशी माहिती राज्यातील पक्षाचे निमंत्रक सुखदेव पटेल यांनी दिली. वाणिज्य शाखेतील अभ्यासू विद्यार्थ्यांना पक्षाचे आर्थिक हिशेब ठेवण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, असेही सुखदेव म्हणाले.

राहुल गांधी यांचे  फाटाफुटीचे राजकारण
नवी दिल्ली : ‘गुजरात दंगलीप्रकरणी नरेंद्र मोदी निर्दोष असल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आलेले आहे आणि राहुल गांधी यांच्यापेक्षा न्यायालय नक्कीच विश्वसनीय आहे. पण तरीही राहुल गांधी यांच्याकडून अशा प्रकारचे वक्तव्य केले जाते. निवडणुकीदरम्यान धार्मिक द्वेषभावना निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,’ असा आरोप भाजपचे नेते सिद्धार्थनाथ सिंग यांनी केला आह़े

मोदींबाबत ‘ते’ विधान केले नाही असांज यांचा खुलासा
पीटीआय, नवी दिल्ली
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना भ्रष्ट करणे शक्य नाही, असे आपण कधीही म्हटलेले नाही किंवा आडमार्गाने सुचविलेलेही नाही, असे विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांनी म्हटले आहे. मोदींबाबतच्या वक्तव्यांचा विपर्यास झाल्याचे त्यांनी ट्विप्पणीत म्हटले आह़े
‘मोदींना भ्रष्ट करणे, त्यांना लाच देणे शक्य नसल्यामुळेच अमेरिका त्यांना घाबरली आहे’, अशा आशयाचे पोस्टर्स अनेक ठिकाणी झळकले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर असांज यांनी खुलासा केला़ ‘मोदी हे देशात सर्वाधिक लोकप्रिय असण्याचे खरे कारण त्यांच्याकडे स्वच्छ आणि निष्कलंक म्हणून ‘पाहिले’ जाते हे आहे’, असे आपण म्हणालो, असे असांज यांनी सांगितल़े
भाजपने मात्र, मोदींच्या प्रतिमेसाठी आपल्याला कोणाच्याही दाखल्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

काँग्रेस नेते सीमांध्रवासींच्या भेटीला
पीटीआय, हैदराबाद
आंध्र विभाजनाबाबत केंद्राने एकांगी निर्णय घेतल्यामुळे दुखावलेल्या सीमांध्रवासीयांची समजूत काढण्यासाठी चिरंजीवी आणि अन्य काही काँग्रेस नेते सीमांध्रात ‘बसयात्रा’ काढणार आहेत़ पक्ष कार्यकत्रे आणि मतदारांशी संवाद साधण्यासाठी लवकरच ही यात्रा रायलसीमा आणि आंध्र किनारपट्टीत फिरणार आह़े सीमांध्रवासीयांमध्ये काँग्रेसबद्दल प्रचंड संतापाचे वातावरण आह़े त्यामुळे काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांसाठी उमेदवार मिळणे अवघड झाले आह़े आम्ही कार्यकर्त्यांच्या २१ ते २७ मार्च या काळात बैठका घेणार आहोत़ विभाजनामागील सत्य त्यांच्या पुढे मांडून त्यांचे धर्य उंचाविण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे चिरंजीवी यांनी सांगितल़े