भाजपने एकाच वेळी मनसे आणि शिवसेनेला चुचकारून युतीमध्येच संशयाचे वातावरण तयार केले. भाजपची सारीच भूमिका संशयास्पद आहे. याचा भाजप आणि शिवसेना दोघांनाही फटका बसण्याची शक्यता असून, राज्यात गेल्या वेळेप्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादीच आघाडीवर राहील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी व्यक्त केला.
राज्यात मोदी लाट आल्याचा प्रचार भाजपने सुरू केला. पण आपल्याला तरी कोठे मोदी यांचा प्रभाव दिसत नाही. उलट विरोधकांमध्येच उघडउघड संघर्ष दिसतो. भाजपने मनसेला चुचकारल्याने शिवसेनेने भाजपलाच लक्ष्य केले. आता भाजपचे नेते सारवासारव करीत असले तरी भाजपचे मनसेप्रेम लपून राहिलेले नाही. एकीकडे भाजप-शिवसेना युती असताना मनसेने मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला. परिणामी एन.डी.ए.चा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या विरोधात मुंबई, ठाणे, नाशिक परिसरात मनसेचे उमेदवार िरगणात आहेत. भाजपच्या नेत्यांच्या एकूणच संशयास्पद भूमिका लक्षात घेता ते या मतदारसंघांमध्ये पडद्याआडून कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे, असे मत मुख्यमंत्र्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
नरेंद्र मोदी यांच्याकडे एकहाती सत्ता असल्याने त्यांना निर्णय घेणे सोपे जाते. याउलट राज्यात आघाडीचे सरकार असल्याने निर्णय घेण्यात अनेकदा अडचणी येतात. पण महाराष्ट्र आणि गुजरातची तुलनाच होऊ शकत नाही. १ मे १९६० रोजी मुंबई प्रांताचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती झाली.  तेव्हापासून दोन्ही राज्यांच्या दरडोई उत्पन्नाची तुलना केल्यास महाराष्ट्रच खूप पुढे आहे. भाजपमधील अंतर्गत लाथाळ्या, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा झालेला अवमान, खोटे पण रेटून बोला.
स्वाक्षरीसाठी तीन सेकंद ..
सरकार निर्णय घेत नाही, अशी टीका केली जाते. निर्णय घेण्यास विलंब लागला हे मीसुद्धा मान्य करतो. पण कोणताही निर्णय घाईगडबडीत घेता येत नाही. त्याकरिता कायदेशीर बाबी अजमावून घ्याव्या लागतात. फाईलवर स्वाक्षरी करण्याकरिता फक्त तीन सेकंद लागतात. पण त्यासाठी विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विरोधकांना मारला.