प्रचाराच्या काळात चांगला मेळ जमल्याचा दावा दोन्ही बाजूने करण्यात येत असला तरी निवडणूक पार पडल्यावर कोणी कसा ‘गेम’ केला याची उदाहणे परस्परांकडून दिली जाऊ लागली आहेत. एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा नेहमीचा खेळ काँग्रेस-राष्ट्रवादीत यंदाही झाला आहे.
आघाडीत चांगला समन्वय असल्याचा निर्वाळा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. तर कधी नव्हे तेवढी एकवाक्यता असल्याची ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली होती. निवडणूक पार पडल्यावर मात्र कोणी कशी खेळी केली हे पुढे येऊ लागले आहे.  शरद पवार किंवा अजित पवार यांनी मुख्यमंत्री वा प्रदेशाध्यक्षांनी विनंती करूनही नंदुरबारमध्ये सभा घेण्याचे टाळले. सागंलीमध्येही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोधातच भूमिका घेतली होती. नंदुरबार आणि सांगलीमध्ये भाजपने राष्ट्रवादीतूनच उमेदवार आयात केले होते. काँग्रेसच्या जागा निवडून येतील अशाच ठिकाणी राष्ट्रवादीने विरोधात भूमिका घेतल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येते.
ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदरमध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी साथ दिली नाही, अशी राष्ट्रवादीची तक्रार आहे. परभणीमध्ये स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केले. अमरावतीमध्ये काँग्रेसची साथ मिळाली नाही. रावेरमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी बंडखोर काँग्रेस उमेदवाराला मदत करीत होते, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात येते.
काँग्रेस-राष्ट्रवादीत यंदा चांगला मेळ राहीला असला तरी काही ठिकाणी धुसफूस झाल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रचाराला गेले नाहीत याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी, काँग्रेसच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात काम केल्याचा आरोप केला. काँग्रेसने तक्रार केल्यावर आम्ही त्या पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केले वा कारवाई केली. विरोधात काम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची यादी सादर करूनही काँग्रेसने काहीच कारवाई केली नाही, असे जाधव म्हणाले. २००९च्या तुलनेत समन्वय चांगला होता हे मात्र ठाकरे आणि जाधव या दोघांनीही मान्य केले.
नंदुरबार या काँग्रेसच्या पांरपारिक बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्येने भाजपच्या वतीने निवडणूक लढविली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीची सारी यंत्रणा भाजपच्या बाजूने उतरली होती, अशी माहिती नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीने कारवाईचा बडगा उभारला. तोपर्यंत बिघडलेले शेवटपर्यंत दुरुस्त झाले नाही. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची फूस असल्याशिवाय स्थानिक नेते टोकाची भूमिका घेणे शक्यच नाही, अशी भावना उद्योगमंत्री नारायण राणे यांची झाली आहे.