मतदानाच्या पहिल्या टप्प्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी संघपरिवारातील विचारवंत, अभ्यासकांना सुगीचे दिवस यायला लागले आहेत. भाजपप्रणीत रालोआच्या काळात अर्धवट राहिलेला ‘अजेंडा’ राबविण्यासाठी आत्तापासूनच कंबर कसायला हवी, असं वाटणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. परिवारातल्या कुठल्याही कार्यक्रमावर मोदी किती ग्रेट, मोदी किती महान वगैरे वगैरे.. असा ‘नमो-नमो’ जप सुरू आहे. नाही म्हटले तरी आपल्याच बाब्याच्या लाथा कुणाही मातेला लागतात! भाजपची मातृसंघटना तरी अपवाद का? पंडित दीनदयाल उपाध्याय शोध संस्थानमधल्या कार्यक्रमात यातील सर्वानी मोदींची सत्ता आल्यावर आपला अजेंडा राबविण्याची भीष्मप्रतिज्ञा केली आहे. या कार्यक्रमातील प्रमुख वक्ते होते डॉ. जे. के. बजाज. त्यांनी तर थेट अटलबिहारी वाजपेयी-मोदी तुलना करून टाकली. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात कुठलाही हिंदुत्ववादी मुद्दा राबविला गेला नसल्याचा दावा त्यांनी केला. शेवटी शेवटी तर ते डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यावरच घसरले. अहो, कसचे काय मनुष्यबळ विकासमंत्री? जोशींच्या काळात उर्दू शाळांना सर्वाधिक अनुदान दिलं गेलं. संस्कृत भाषा तर कुठेही दिसली नाही. ना संस्कृतचा विकास झाला ना संस्कृतीचा! उलट जोशींच्याच काळात संस्कृत भाषा रसातळाला गेली. किमान मोदींच्या बाबत तरी तसे वाटत नाही. कारण, मोदींनी जोशींचा पत्ताच साफ केला. बजाज यांच्या अशा आशयघन वक्तव्यांमुळे कार्यक्रमस्थळी चुळबुळ सुरू झाली. जोशींचा पत्ता कापण्यामागे कोण? हे ‘गुपित’ सांगून बजाज यांनी धमालच उडवून दिली. त्यावर मुरली मनोहर जोशी नाराज झाले म्हणे. नंतर म्हणे जोशींनी बडय़ा समदु:खी नेत्याशी चर्चा केली.. ‘हरे कृष्ण, हरे कृष्ण..’