पक्षातील उमेदवारी वाटपावर नाराजी व्यक्त करणाऱ्या शाजिया इल्मी यांना आम आदमी पक्षाने गाझियाबादमधून उमेदवारी दिली आहे. आज ‘आप’च्या सहाव्या यादीत एकूण ५५ उमेदवारांची नावे आहेत. त्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातून अभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना आपकडून विचारणा झाली होती, मात्र त्यांनी नकार दिला. जळगावमधून डॉ. संग्राम पाटील यांना आपने उमेदवारी दिली आहे. परदेशातील नोकरी सोडून डॉ. पाटील यांनी जळगाव जिल्ह्य़ातील एरंडोल येथे ग्रामीण रुग्णालय सुरू केले आहे.
आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिभा शिंदे यांना रावेरमधून ‘आप’ने मैदानात उतरवले आहे. पालघरमधून पांडुरंग पारधी, अकोल्यातून अजय हिंगलेकर, तर वर्धा मतदारसंघातून मोहम्मद अलीम पटेल यांना आपने उमेदवारी दिली आहे.
उत्तर प्रदेशातील अकरा जागांसाठी आपने उमेदवाराची नावे आजच्या यादीत प्रसिद्ध केली आहेत. शाजिया इल्मी यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात उमेदवारी देण्यावर केजरीवाल यांनी शिक्कामोर्तब केले होते, परंतु इल्मी यांनी त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिली होती. यापूर्वी कधी रायबरेलीला गेलेली नसताना तेथून निवडणूक कशी लढणार, असा सवाल इल्मी यांनी पक्षनेत्यांना विचारला होता. त्यामुळे केजरीवाल यांनी एक पाऊल मागे सारत इल्मी यांना गाझियाबादमधून उमेदवारी दिली. इल्मी यांचा सामना काँग्रेस प्रवक्ते राज बब्बर यांच्याशी आहे. गोव्यातून स्वाती केरकर, तर डॉ. दत्तराम देसाई यांना अनुक्रमे उत्तर व दक्षिण मतदारसंघातून आपने उमेदवारी दिली आहे. देशातील १३ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशातील जागांचा समावेश यादीत करण्यात आला आहे.
शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीमुळे आपने आता देशभरात २४२ उमेदवार जाहीर केले आहेत. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर, केरळ, गोवा, दमण-दीव, दादरा-नगर हवेली, अंदमान-निकोबार, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, ओदिशा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र येथील उमेदवारांचा समावेश आहे.