महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीवरून मित्रपक्ष असणाऱ्या मनसे आणि भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली. या निवडणुकीत उभय पक्षांमध्ये सरळ लढत होऊन मनसेकडून भाजपच्या उमेदवाराला पराभूत व्हावे लागले. राज ठाकरे यांनी दिलेला शब्द मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी धुडकावल्याचा आरोप भाजपने केला आहे. दुसरीकडे स्वबळावर हे यश प्राप्त केल्याचा दावा मनसेने केला. या घडामोडींमुळे महापालिकेतील मनसे-भाजपची सत्तासंगत फारकतीत रुपांतरीत होण्याच्या मार्गावर आहे.
महापालिकेची आर्थिक तिजोरी समजल्या जाणाऱ्या आणि सत्ताधारी मित्रपक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत मनसेचे अ‍ॅड. राहुल ढिकले यांनी भाजपच्या रंजना भानसी यांचा पराभव केला. या पदावरून गतवेळी एकत्र आलेल्या मनसे, भाजप व शिवसेना या तिन्ही पक्षांत चांगलीच जुंपली होती. अखेरच्या क्षणी शिवसेनेने आपला दावा मागे घेऊन भाजपला पाठिंबा दिला. परंतु, मनसेने कोणत्याही स्थितीत माघार न घेता निवडणूक लढविण्याचा चंग बांधला होता. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेत मतदानावर बहिष्कार टाकल्याने मनसे व भाजपच्या उमेदवारांमध्ये लढत झाली.
अपक्ष सदस्याच्या मदतीने स्थायी सभापती पदावर मनसेने पुन्हा कब्जा मिळविला. या निकालानंतर मनसेला आता सहकार्य केले जाणार नसल्याचे भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी सांगितल्यानंतर भाजपने अर्ज भरला. पण, मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्याच्या शब्दाला किंमत दिली नाही. मनसेने कितीही नवनिर्माणाच्या वल्गना केल्या तरी या कार्यशैलीमुळे काही होणार नसल्याची तोफ भाजपने डागली आहे. दुसरीकडे मागील दोन वर्षांत राज्याच्या राजकारणात ज्या घडामोडी घडल्या होत्या, त्या लक्षात घेऊन मनसेने स्थायी सभापतीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही निवडणूक लढवून स्वबळावर मनसेने हे यश मिळविल्याचे महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी सांगितले. या वादाच्या पाश्र्वभूमीवर, भाजपने आता तरी धडा घेण्याची गरज असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute created between bjp and mns over standing committee chief post of nashik municipal corporation
First published on: 01-07-2014 at 03:09 IST