काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणाऱ्या ३७० कलमावर आता केवळ चर्चा नको. त्यातून काही निष्पन्न होत नाही. आता सरळ निर्णय घ्यावा. ३७० कलम, समान नागरी कायदा याबाबत थेट कृती करण्याची गरज आहे, असे विधान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई येथे ते बोलत होते. केंद्रातील सरकारच्या नव्या प्रयोगांसाठी थोडा वेळ द्यायला हवा. त्यावर लक्ष ठेवायला हवे व परिणाम पाहायला हवेत. त्यावर घाईघाईने बोलणे योग्य ठरणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दिल्लीत सत्तास्थापनेची तयारी
गृहमंत्रीपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर राजनाथ सिंह यांनी लगेगच दिल्लीतील राजकीय स्थितीचा अंदाज घेतला. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. दिल्लीत सध्या राष्टपती राजवट आहे. आता केंद्रात भाजपचे सरकार आल्याने दिल्ली विधानसभेतदेखील कमळ फुलवण्यावर सरकारमध्ये गंभीर चर्चा सुरु आहे. ही अनौपचारिक भेट असल्याचे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले असले तरी दिल्लीत सत्तास्थापनेसाठी भाजप प्रयत्नशील  आहे.