नरेंद्र मोदींच्या लाटेत देशभरातील राज्यांत प्रस्थापित सरकारांविरोधातील वातावरण असताना तामिळनाडूत मात्र सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे. मुख्यमंत्री जयललितांच्या नेतृत्वाखालील या पक्षाला ३९ पैकी ३७ जागांवर विजय प्राप्त झाला आहे. लोकसभेत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून अण्णाद्रमुक उदयास आला आहे.
दक्षिणेत भाजपचा चंचूप्रवेश व्हावा यासाठी नरेंद्र मोदींनी जोर लावला खरा, मात्र तामिळी मतदारांनी अण्णाद्रमुकच्याच पदरात भरभरून मते टाकली. एकीकडे द्रमुकने  अण्णाद्रमुकवर कुरघोडी करण्यासाठी केलेल्या कुरापती, विजेची टंचाई आणि पिण्याच्या पाण्याची समस्या हे प्रश्न उपस्थित करून द्रमुकने प्रस्थापितांविरोधात जनमत उभारण्याचा प्रयत्न केला, मात्र जयललिता यांनी तो फोल ठरविला. काँग्रेस पक्षाशी कोणीही आघाडी न केल्याने त्यांना स्वबळावरच निवडणूक लढवावी लागली. भाजपने विजयकांत यांच्या पक्षाशी केलेल्या आघाडीचाही तामिळी मतदारांवर परिणाम झाला नाही. दरम्यान, अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री जयललिता यांनी मात्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मोदींच्या सरकारात सहभागी होण्यासारखी परिस्थितीच नसल्याने तसा प्रश्नच उद्भवत नसल्याचे जयललितांनी स्पष्ट केले. स्वतच्या पक्षाच्या कामगिरीवर खूष असलेल्या जयललितांनी मोदींचे हार्दिक अभिनंदन केले आहे. नवे सरकार मित्रत्वाच्या भावनेने वागेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
द्रमुकचा ऐतिहासिक पराभव
अण्णाद्रमुकने भरीव कामगिरी केल्याने एम. करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक पक्षाला सपाटून मार खावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या लक्षणीय कामगिरीमुळे काँग्रेस आणि भाजपने आघाडी केलेल्या सहा पक्षांनाही राज्यात भरीव कामगिरी करता येणे शक्य झालेले नाही. द्रमुकला १९९८ नंतर हा दारुण पराभव पत्करावा लागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayalalitha hold ground
First published on: 17-05-2014 at 05:17 IST