लोकसभा निवडणुका राज्यात एप्रिल महिन्यात होणार असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून, त्या निवडणुकांआधी किंवा नंतर घ्याव्या लागणार आहेत. शालेय, महाविद्यालयीन आणि विद्यापीठ परीक्षांचे निकालही लांबणीवर पडण्याची चिन्हे असून, नवीन वेळापत्रकाबाबत शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग आणि विद्यापीठांमध्ये विचारविनिमय करण्यात येत आहे.
आली समीप घटिका..
महाराष्ट्रात १०, १७ व २४ एप्रिलला मतदान होणार आहे, तर मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे. दहावी व बारावीच्या परीक्षांना निवडणूक वेळापत्रकाचा फारसा फटका बसणार नसला तरी दहावीपर्यंतच्या शालेय परीक्षा आणि अकरावी ते पदवीपर्यंतच्या तसेच अभियांत्रिकीपासून व्यावसायिक शिक्षणापर्यंतच्या सर्व परीक्षांच्या वेळापत्रकावर निवडणुकांचा परिणाम होणार आहे. विद्यापीठांच्या परीक्षा १५ एप्रिल ते मेच्या पहिल्या आठवडय़ापर्यंतही होत असतात. प्रात्यक्षिक परीक्षा एप्रिलमध्ये होतात. विभागनिहाय निवडणुकीच्या तारखा विचारात घेऊन या परीक्षा विद्यापीठांना आणि शाळा-महाविद्यालयांना पार पाडाव्या लागणार आहेत.
शाळांमधील शिक्षक व महाविद्यालयांमधील प्राध्यापकांना निवडणुकीचे काम करावे लागते. निवडणूक प्रशिक्षण व तयारी वर्गासाठी त्यांना जावे लागते. मतदान केंद्रे प्रामुख्याने शाळा-महाविद्यालयांमध्येच आहेत. त्यामुळे मतदानाचे दिवस टाळून परीक्षा पार पाडाव्या लागणार आहेत. तसेच मतमोजणी १६ मे रोजी असून तत्पूर्वी निकालाचे कामही शालेय शिक्षकांना पार पाडावे लागणार आहे. तर महाविद्यालयीन व विद्यापीठ परीक्षांचे निकाल विलंबाने लागण्याची शक्यता आहे. शालेय परीक्षांचे निकाल एप्रिलअखेर किंवा मेच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत लागतात, पण शिक्षकांना निवडणुकीचे काम करावे लागणार असल्याने पेपर तपासणीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्यास हे निकालही लांबतील. वैद्यकीयची सीईटी मे महिन्यात असल्याने तिच्यावर परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र अन्य काही अभ्यासक्रमांच्या एप्रिलमधील प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकातही बदल करावे लागणार आहेत.
बाहेरगावचे विद्यार्थी मतदानाला मुकणार ?
पुण्यात शिकणाऱ्या बाहेरगावच्या आणि परराज्यातील लाखो विद्यार्थी मतदारांना मतदानाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. पुण्यात बाहेरगावाहून आणि परराज्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यातील बहुतेक विद्यार्थ्यांचे त्यांच्या मूळ गावी मतदार यादीत नाव आहे. मात्र पुणे विद्यापीठाच्या या सत्राच्या परीक्षा सर्वसाधारणपणे मार्चच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये सुरू होत असून मे अखेरीस संपत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मतदानास मुकावे लागण्याची शक्यता आहे.