अहमदनगर जिल्ह्य़ातील खर्डा गावातील नितिन आगे याची हत्या जातीयवादातून नव्हे; तर प्रेम प्रकरणातून झाल्याचा कांगावा काही संघटना करीत आहेत. नितीन हा दलित समाजातील मुलगा होता. मात्र नितीन आगेऐवजी सवर्ण समाजातील तरुण असता तर कदाचित त्याची हत्या झाली नसती, अशी भावना रोजगार हमी योजनामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली.  
वर्षभरापासून राज्यातील दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आह़े  त्यासंबंधी माहिती देण्यासाठी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे राऊत यांनी सांगितले. खडर्य़ातील घटनेचा ठपका स्थानिक पोलिसांवर ठेवून राऊत यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनाच दोषी ठरवले. त्याबरोबरच १४ फेब्रुवारीला कृती समितीची बैठक झाल्याची माहिती देत दलितांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत राज्य सरकार गंभीर असल्याचा दावा राऊत यांनी केला. मात्र मे महिन्यात खडर्य़ातील दलित युवकाच्या हत्येचे प्रकरण समोर आल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर राऊत यांनी फार बोलण्याचे टाळले.
आघाडी सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचारांत वाढ झाली का, हा प्रश्न राऊत यांनी  टोलवला़ कोणतेही सरकार विशिष्ट जातीचे नसते, असे सांगत, या प्रकरणांत ग्रामीण विकास, सामाजिक न्याय विभाग व स्थानिक पोलीस /प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप राऊत यांनी केला. दोन महिन्यांत राज्यात १०२ अॅट्रॉसिटीच्या तक्रारी पोलीसांकडे आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने जालना, औरंगाबाद, पुणे, उस्मानाबादसारखे जिल्हे आहेत.