काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांचे पुत्र नीलेश यांनी गुहागरमध्ये बंडाचा पवित्रा घेतल्याबद्दल काँग्रेसने आक्षेप घेतल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा नीलेश राणे यांनी मागे घेतली. मात्र, कामगारमंत्री भास्कर जाधव यांच्या पराभवासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर करून वादाची भूमिका कायम ठेवली.
आघाडीत जो मतदारसंघ ज्या पक्षाच्या वाटय़ाला येईल त्याच पक्षाने निवडणूक लढवावी. कोणी बंडखोरी केल्यास पक्ष खपवून घेणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नीलेश राणे यांना दिला होता. वडिलांना त्रास होऊ नये म्हणूनच आपण गुहागर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा जाहीर केलेला निर्णय मागे घेत असल्याचे नीलेश यांनी जाहीर केले.

हरतालिकेला राष्ट्रवादी युवतीचे ‘श्री तेथे सौ’!
मुंबई : घराची मालकी पती-पत्नीची संयुक्तपणे असली तरी घरावर नाव मात्र ‘श्रीं’चे असते. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून येत्या हरतालिकेला शरद पवार यांच्यासह पक्षाच्या अन्य सर्व नेत्यांच्या निवासस्थानी ‘श्री.’ व ‘सौ.’ अशा नावांच्या पाटय़ा लावण्याचा उपक्रम राष्ट्रवादी युवती काँग्रेस हाती घेणार आहे. इंदिरा आवास योजनेत घराची मालकी पती-पत्नी यांची संयुक्तपणे असते. घरांवर दोन्ही नावे असावीत, या ग्रामविकास मंत्रालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्या निवासस्थानापासून करण्यात येईल, असे राष्ट्रवादी युवती नेत्या अर्चना घारे यांनी दिली.

महायुतीत  जागावाटपात आठवले यांची ‘उलटी गणती’!
मुंबई : आधी भरमसाठ जागा मागायच्या आणि नंतर क्रमाक्रमाने स्वतच त्याची संख्या कमी कमी करत जायची, हाती एखाद-दुसरी जागा लागली तरी त्यात समाधान मानायचे ही रामदास आठवले यांची राजनीती. विधानसभा निवडणुकीसाठी ६० ते ६५ जागा मिळाव्यात, अशी मागणी महायुतीकडे सुरुवातीला करणारे आठवले यांनी पुढे किमान २० जागांचा आग्रह धरला. आता त्यातही दोन-चार कमी झाल्या तरी त्यावरही समाधान मानण्याची तयारी दर्शविली आहे.