लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला जेमतेम १०० जागा मिळतील हा जनमत चाचणीतून काढण्यात आलेला निष्कर्ष म्हणजे मोठा विनोद असल्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. जनमत चाचण्या म्हणजे कायदा नव्हे त्यामुळे नरेंद्र मोदी आणि भाजप सत्तेवर येण्याचा प्रश्नच नाही, असेही गांधी यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये जो अंतर्गत कलह सुरू झाला आहे त्यावरही राहुल गांधी यांनी टीका केली. काँग्रेसला केवळ १०० जागा मिळतील हा विनोद आहे, तो समजून घेतला पाहिजे, विरोधकांचा संपूर्ण प्रचार काँग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी सुरू आहे, मात्र तुमचे खच्चीकरण झाले नाही तरच आपण त्यांना योग्य धडा शिकवू शकतो, असेही गांधी यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
कार्यकर्त्यांनी मनात जर संशय बाळगला नाही तर आपण २०० हून अधिक जागा जिंकू शकतो, संपूर्ण खेळ कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी सुरू आहे, असेही गांधी म्हणाले. काँग्रेसला केवळ १०० जागाच मिळाल्या तर काँग्रेस पुढे काय करणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारला होता त्याला गांधी उत्तर देत होते.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये म्हणजेच २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेसचे खच्चीकरण होईल, असा जनमत चाचण्यांचा अंदाज होता, तो फोल ठरला. आता आपण तिसऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहोत, काँग्रेसची कामगिरी उत्तम होणार नाही असे ते नेहमीच म्हणत राहणार, त्यामुळे निर्धाराने निवडणुकांना सामोरे जावे लागेल, असेही ते म्हणाले.