राज्यसभेसाठी शिवसेनेने स्वत:च्या कोटय़ातून जागा दिली नाही. प्रचारातही फारसे महत्त्व दिले नाही. जाहीरातींमध्ये नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र वापरले, पण रामदास आठवले यांना स्थान दिले नाही. एकूणच शिवसेनेने रामदास आठवले यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
आठवले यांना शिवसेना विसरली, असे सांगत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दलित मतदारांमध्ये व विशेषत: आठवले समर्थकांमध्ये शिवसेनेनेबद्दल नाराजी पसरविण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आणि मनसेचे नेतृत्व कधी निवडणूक लढवित नाही त्यामुळेच त्यांना राज्यभर प्रचारासाठी जाणे शक्य होते, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मारला.
भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची पातळी खालच्या स्तरावर नेल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. एवढा उपहासात्मक आणि नकारात्मक प्रचार आतापर्यंत कोणीच केला नव्हता.
राज्यात काँग्रेसच नंबर १
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. देशात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असा दावा शरद पवार यांनी केला असला तरी महाराष्ट्रात मात्र काँग्रेस आघाडीच पहिल्या क्रमांकावर राहील. राष्ट्रीय पातळीवरील चित्र किंवा अंदाज व्यक्त करण्यासाठी मी राज्याबाहेर गेलोलो नाही, असे सांगत निवडणुकीच्या तोंडावर पवार यांच्याशी विसंवाद आहे हे चित्र राहू नये, असा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला.