लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाची चर्चा करण्यासाठी शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष या महायुतीच्या नेत्यांची येत्या चार-पाच दिवसांत बैठक होणार आहे. त्यात माढा मतदारसंघाचा वाद  सोडविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. भविष्यात विधानसभेच्या जागा किंवा विधान परिषदेच्या आमदारकीचे आश्वासन देऊन हा तिढा सोडविण्याचा भाजप-सेना नेतृत्वाचा प्रयत्न राहणार असल्याचे समजते.
महायुतीत राजू शेट्टी व महादेव जानकर या दोन नेते सहभागी झाल्याने जागा वाटपात रस्सीखेच सुरु झाली आहे. शेट्टी व जानकर यांनी माढा या लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. तर रामदास आठवले यांनीही हा मतदारसंघ आपल्या पक्षासाठी मागितला आहे. प्रतापसिंह मोहिते-पाटील हे रिपाइंच्या वतीने निवडणूक लढविण्यास तयार आहेत, असे कळते. त्यामुळे आठवले यांना हा मतदारसंघ हवा आहे, असे सांगितले जाते. तर शेट्टी यांना त्यांचे खास सहकारी सदाभाऊ खोत यांच्यासाठी हा मतदारसंघ पाहिजे. त्यावरुन चांगलीच घासाघीस सुरु झाली आहे. आणखी काही मतदारसंघावरुनही महायुतीत रस्सीखेच सुरु झाली आहे.
लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार जागावाटपाची चर्चा करण्यासाठी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची येत्या चार-पाच दिवसांत बैठक होणार आहे, असे कळते. त्यात माढाचा विषय प्राधान्याने घेतला जाणार आहे. भविष्यात जानकर व खोत यांना विधानसभेच्या जागा किंवा थेट विधान परिषदेची आमदारकी देऊन माढावरचा त्यांचा दावा संपुष्टात आणता येतो का, याचाही विचार केला जात आहे. आगामी बैठकीत या तोडग्यावर चर्चा होणार असल्याचे समजते.