मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या काँग्रेस प्रवेशाचा सोहळा पार पडला. सोहळय़ाला प्रचंड बंदोबस्त असल्याने छावणीचे स्वरूप आले होते. शिवसैनिकांनी पोलिसांना चकवा देत प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. तर निदर्शने करण्यासाठी आलेल्या मुळा-प्रवराच्या कामगारांना सभेतूनच ताब्यात घ्यावे लागले. सभा संपल्यानंतर प्रेमानंद रूपवते यांच्या समर्थकांनीही निष्ठावंतांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करून काँग्रेसला घरचा आहेर दिला.
राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मेळाव्याला अनुपस्थित असले तरी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी सोहळय़ाला हजेरी लावली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच मला कार्यक्रमाला पाठवले. जातीयवादी शक्ती सत्तेवर येऊ नये, म्हणून जाणीवपूर्वक कार्यक्रमाला गेले पाहिजे असे पवारांनी सांगितल्याने मी आलो, असे पिचड यांनी सांगितले.
पिचड यांनी उपस्थितीत राहावे म्हणून काँग्रेस नेत्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आघाडीच्या राजकारणात काँग्रेसला त्रास होतो. विरोधी पक्षाचे काही खासदार, आमदार काँग्रेस प्रवेशासाठी इच्छुक असले तरी आघाडीमुळे जागा सोडता येत नसल्याने शब्द देता येत नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.
खासदार वाकचौरे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या निर्णयामुळे शिवसैनिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे आज पोलिसांनी मोठी दक्षता घेतली. अपेक्षि़त गर्दी मेळाव्याला झाली नाही. मंगल कार्यालयाला छावणीचे स्वरूप आलेले होते.
मुख्यमंत्री चव्हाण व गृहमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत गडबड, गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे हे स्वत: दोन दिवसांपासून तळ ठोकून होते. आज नेवासे रस्त्यावर दर दहा फुटांवर पोलीस उभे होते. मंगल कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांलाही सहा वेळा तपासून आत सोडले जात होते. मुळा-प्रवरा वीज संस्थेचे कर्मचारी कार्यक्रमस्थळी गेले त्यांना ताब्यात घेण्यात आले. सोहळा संपल्यानंतर प्रेमानंद रूपवते यांच्या समर्थकांनी राहुल गांधी झिंदाबादच्या घोषणा देत निष्ठावंतांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली. मुख्यमंत्री चव्हाण, गृहमंत्री शिंदे, काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पिचड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह सर्वच नेत्यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. खासदार वाकचौरे यांनी पक्ष सोडताना सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसैनिकांचे आभार मानले. मला मागील निवडणुकीतही काँग्रेसनेच मदत केली होती, असे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2014 रोजी प्रकाशित
पोलीस बंदोबस्तात वाकचौरे काँग्रेसमध्ये
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या काँग्रेस प्रवेशाचा सोहळा पार पडला.
First published on: 25-02-2014 at 02:42 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mp from shirdi bhausaheb wakchure joins congress