काँग्रेस पक्षाचे राज्यमंत्री आणि पालघर लोकसभा मतदारसंघाचे पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना सोमवारी त्यांच्यात मतदारसंघात मोठा फटका बसला. पालघर नगरपरिषदेच्या २८ जागांसाठी रविवारी झालेल्या अतिशय प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधीक १७ जागाजिंकून एकतर्फी विजय मिळवला. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसला १० जागांवर समाधान मानावे लागले, कॉग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा या निवडणुकीत पालघरवासियांनी पुरता धुव्वा उडवला.
निकाल लागताच शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याने पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करावा लागला. कार्यकर्त्यांच्या हाणामारीत काही महिला पोलीस किरकोळ जखमी झाल्या आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे खासदार असून यंदाची निवडणुक या पक्षाने कॉग्रेसमध्ये विलीन होऊन लढावी, असा प्रस्ताव हितेंद्र ठाकूर यांच्यापुढे ठेवण्यात आला होता. मात्र, बोलणी फिस्कटल्याने या मतदारसंघात काँगेसने थेट गावित यांनाच रिंगणात उतरवले आहे.