बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मुंबई काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात खटला चालवण्यास विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी परवानगी नाकारली आहे.
कृपाशंकर सिंह यांनी त्यांच्या ज्ञात स्रोतापेक्षा जास्त मालमत्ता जमवली असल्याची तक्रार संजय तिवारी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यासंबंधीची एक याचिकाही मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणामुळे कृपाशंकर सिंह चांगलेच अडचणीत आले होते. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) कृपाशंकर यांच्याविरोधातील तक्रारीची तीन वर्षे चौकशी सुरू होती.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर सिंह यांच्याविरोधात खटला चालविण्यासाठी विधानसभा अध्यक्षांची परवानगी मागण्यात आली होती. कृपाशंकर सिंह हे विधानसभेचे सदस्य असल्याने अध्यक्षांची तशी परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र अध्यक्षांनी खटला चालवण्यास परवानगी नाकारली आहे. अधिकृत सूत्राचा हवाला देऊन पीटीआयने तसे वृत्त दिले आहे.