11 December 2017

News Flash

अमेरिकी केशरचा बनाव

शेतमालाचे भाव अस्थिर असतात. ते कमी-जास्त होत राहतात.

अशोक तुपे | Updated: April 8, 2017 12:17 AM

पारंपरिक पिकांना शेतकरी आता कवटाळून बसत नाहीत. त्याचाच फायदा काही लोकांनी घ्यायला सुरुवात केली. मल्टिलेवेल मार्केटींगच्या माध्यमातून पसा उकळण्याचे प्रकार काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना लखपती होण्याचे स्वप्न दाखवून केले. सफेद मुसळी, महोगणी, कोरपड, स्रिटेला, जट्रोफा, इमुपालन अशा एक ना अनेक गोष्टी शेतकऱ्यांना करायला लावून त्यातून कंपन्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. अमेरिकी केशरच्या लागवडीतही आता असलाच प्रकार सुरू आहे. मुळात असले काही केशरच नाही. अमेरीकेतील बिनकाटय़ाची करडई या पिकाचीच अमेरिकी किंवा ऑस्ट्रेलियन केशर म्हणून आता लागवड केली जात आहे. त्याचे बी विकून काही लोक कोटय़धीश होत आहेत. मात्र लागवड करणारे हे कर्जबाजारी होण्याचा धोका असून याबाबत वेळीच दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेतमालाचे भाव अस्थिर असतात. ते कमी-जास्त होत राहतात. त्यामुळे नफा देणाऱ्या पिकांकडे त्यांचा कल अधिक असतो. त्यातून पिकपद्धतीही बदलते. काही शेतकरी नवीन फळे, भाजीपाला, वनऔषधी याकडे वळतात. पारंपरिक पिकांना शेतकरी आता कवटाळून बसत नाहीत. त्याचाच फायदा काही लोकांनी घ्यायला सुरुवात केली. ‘मल्टिलेवेल मार्केटींग’च्या माध्यमातून पसा उकळण्याचे प्रकार काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना लखपती होण्याचे स्वप्न दाखवून केले. सफेद मुसळी, महोगणी, कोरपड, स्रिटेला, जट्रोफा, इमुपालन अशा एक ना अनेक गोष्टी शेतकऱ्यांना करायला लावून त्यातून कंपन्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. अमेरिकी केशरच्या लागवडीतही आता असलाच प्रकार सुरू आहे. मुळात असले काही केशरच नाही. अमेरीकेतील बिनकाटय़ाची करडई या पिकाचीच अमेरिकी किंवा ऑस्ट्रेलियन केशर म्हणून आता लागवड केली जात आहे. त्याचे बी विकून काही लोक कोटय़धीश होत आहेत. मात्र लागवड करणारे हे कर्जबाजारी होण्याचा धोका असून याबाबत वेळीच दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

खऱ्या केशरची लागवड ही इराण व काश्मिरमध्ये होते. केशर हे सौंदर्यवर्धक, त्वचेला चकाकी आणणारे, खाद्य पदार्थाचा स्वाद वाढविणारे आहे. विशेष म्हणजे मेंदु, त्वचा तसेच विविध आयुर्वेदीक व एॅलोपॅथीच्या औषधात त्याचा वापर केला जातो. सोन्याचे मोल त्याला असून दर्जानुसार ५० हजार ते २ लाख रुपये किलोपर्यंत ते विकले जाते. केशरच्या फुलातील जायंगाच्या टोकावरील धाग्यासारखा भाग (अँथर) वाळवून केशर मिळवितात. या पिकाला अतिकोरडे, उन्हाळ्यात उष्ण व हिवाळ्यात अतिकमी तापमान आवश्यक असते. नोव्हेंबरमध्ये पडणाऱ्या पावसामुळे केशरचे नुकसान होते. त्यामुळे जम्मू-काश्मिर व हिमाचल प्रदेश सोडला तर अन्यत्र केशरची लागवड झालेली नाही. गुजरातच्या आनंद विद्यापीठात नियंत्रित परिस्थितीत केशर लागवडीचे प्रयोग यशस्वी झाले आहे. मात्र त्याकरिता तापमान व थेट सूर्यप्रकाश याचे नियंत्रण करावे लागते. केशरची लागवड ही कंदापासून करतात. त्याच्या ४० हजार फुलांपासून केवळ अर्धाकिलो केशर मिळते. केशरचा दर्जा ठरविण्यासाठी ते पाण्यात तळाशी टाकतात. तळाशी बसलेले केशर हे चांगल्या प्रतिचे व पाण्यावर तरंगणारे केशर हे हलक्या प्रतिचे असते. भारतात शाही केशर, मोगरा केशर व लांचा केशर हे प्रकार आहेत. केशरचे तंतु हे अतिशय नाजूक असतात. ते गोळा करताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढतो. काश्मिरमधील शेतकरी पारंपरिक पद्धतीने त्याची वर्षांनुवष्रे लागवड करत आले आहेत.

केशर हे अत्यंत महाग असल्याने त्याचा दर्जा हा रासायनिक विश्लेषणाच्या आय.एस.ओ – ३६३२/१ या मानांकानुसार ठरविले जाते. केशरमधील पिवळसर रंग दर्शविणारे, कडवट रासायनिक घटक, पिकोक्रोसिन, क्रोसिन, साफ्रानाल याच्या उपलब्धतेनुसार गुणवत्ता व शुद्धता ठरविली जाते. त्यासाठी आद्र्रता, गंध, चव व रंग तपासला जातो. इराण येथील संशोधक प्रा. डॉ. ओमिद महारुफ यांनी त्यावर मोठा अभ्यास केला आहे. त्यांच्या निष्कर्षांनुसारही केशरची गुणवत्ता तपासली जाते. औषध कंपन्यांना केशरची आवश्यकता असल्याने केंद्र सरकारच्या आयुष विभागाने विविध ठिकाणी प्रयोगशाळांना केशर विश्लेषणाचे प्रकल्प दिले आहेत. अशाच स्वरुपाचा प्रकल्प मुंबई येथील रुईया महाविद्यालयात आहे. त्यांच्या प्रयोगशाळेत केशरची तपासणी करून अहवाल दिला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंवा देशातील विविध खरेदीदार हे तपासणी करूनच केशर खरेदी करत असतात. लाखो रुपये किलोने एखाद्या शेतमालाला भाव द्यायला औषध कंपन्या किंवा अन्य उत्पादक हे काही दुधखुळे नाहीत. त्यामुळे आता बनावट केशरच्या खरेदीलाही ते बळी पडत नाहीत. मात्र केशरमध्ये भेसळ करणारे किंवा केशरच्या नावाखाली बनावट पदार्थ विकणारे काही महाभाग या उद्योगात आहेत. त्यांचा हा सारा खेळ आहे.

लखपती शेतकऱ्यांच्या कथा पसरवून, प्रसार माध्यमांतून त्या पद्धतशीरपणे आणून बनावट केशरचा बोलबाला अमेरिकी केशरच्या नावाने करण्यात आला. सर्वात प्रथम राजस्थान, मध्यप्रदेश नंतर गुजरातमधून हे अमेरिकी केशर राज्यात आले. जळगावच्या रावेर भागात तसेच अन्यत्र त्याची लागवड सुरू झाली. आतापर्यंत शेतकऱ्यांना बनवून केवळ बियाणांच्या माध्यमातून लाखो रुपये कमविण्यात आले. एकरात साडेचार हजार बी लागते. एका बीची किंमत ही ४० रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे बी विकून लोकांनी धंदा सुरू केला. राजस्थान व मध्यप्रदेशात हे अमेरिकी केशरचे उत्पादन घेण्यात आले. त्याला खरेदीदार मिळाले नाही. तेव्हा इंदौर येथील कृषी विद्यापीठातील शास्रज्ञ डॉ. डी.के.श्रीवास्तव यांनी पाहणी केली. त्यांनी हे खरे केशर नाही असा खुलासा केला. मात्र हर्बल चहामध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो. अन्यत्र बिनकाटय़ाच्या अमेरिकी करडईच्या फुलांचा असा वापर होतो. त्याला केवळ ५०० रुपये किलो हा दर आहे. डॉ. श्रीवास्तव यांनीही त्याला दुजोरा दिला. आता राज्यात अमेरिकी केशरची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. आणि बियाणे विकून लाखो रुपये कमविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर काहींना ते शक्य होत नसल्याने ते लाखो रुपयांना फसले आहेत. फळशास्त्रामध्ये पी.एच.डी केलेले नगरचे शास्रज्ञ डॉ. विनायक िशदे यांनी सर्वप्रथम हा प्रकार उघडकीला आणला. त्यानंतर डॉ. िशदे यांच्यासह पुणे विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. नरेश शेजवळ, ‘होय आम्ही शेतकरी ग्रुप’चे संयोजक व राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संशोधक डॉ. अंकुश चोरमुले, डॉ. विश्वजीत कोकरे यांच्यासह अनेकांनी या फसवणूकीच्या प्रकाराविरुध्द शास्रीय पायावर आधारीत सत्य मांडून मोहिम उघडली.

रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्द येथील एका शेतकऱ्याने अमेरिकी केशरची लागवड केली आहे. त्याच्याशी संपर्क करून सर्व माहिती घेतली. या शेतकऱ्याला बियाणे विक्रीतून फायदा झाला आहे. मात्र त्यांच्या केशरला ग्राहक सापडलेले नाही. आता त्यांनी प्रामाणिकपणा दाखवित केशरची लागवड करताना मार्केटींगचा आधी विचार करा, खरेदीदार मिळत असेल तरच लागवड करा असा सल्ला दिला. ज्या शेतकऱ्यांचे केशर विक्रीला आहे, त्यांना खरेदीदार मिळत नाहीत. रुईया महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत या केशरची तपासणी या तरुणांनी केली असता हे केशर बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याला ५०० रुपये किलोनेही ग्राहक मिळायला तयार नाही. डॉ. िशदे, डॉ. शेजवळ यांनी फसवणुकीविरुध्द जोरदार मोहीम हाती घेतल्याने आता त्याचा विचार शेतकरी करु लागले आहे. शेतकऱ्यांनी कुठल्याही नव्या प्रयोगाबाबत उत्साहाच्या भरात निर्णय न घेता सत्य, असत्यता पडताळून पाहण्याचा विवेक ठेवावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.

अमेरिकी केशर हे तपासणीत बनावट निघाले आहे. मात्र त्याचा खाद्यपदार्थात वापर झाला तरी ते घातक नाही. पण त्याचा केशर म्हणून वापर करणे अयोग्य आहे, असे मुंबईच्या रुईया महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेचे संचालक डॉ. शशीकुमार मेनन व हर्बल संशोधन केंद्राच्या प्रमुख  डॉ. सुनिता शैलजन यांनी सांगितले.

बोगस केशर लागवडीला आळा घाला

सध्या काश्मीर वगळता अन्यत्र सुरू असलेल्या बिनकाटय़ाच्या करडईची लागवड जिला अमेरिकी केशर असे सांगण्यात येते तिला बंदी घालावी. अमेरिकी केशरमध्ये साफ्रानलप्रमाणे घटक आढळून येतात. त्याचा वापर शुद्ध केशरमध्ये भेसळीसाठी होतो. पण इराणमधील संशोधकांनी ही भेसळ ओळखण्याकरीता डीएनए मार्कर पद्धत विकसीत केली आहे. त्यामुळे ही फसवणूक चालणार नाही. शेतकऱ्यांनी फसवणुकीपासून सावध रहावे.

डॉ. नरेश शेजवळ,

 

सहाय्यक प्राध्यापक पुणे विद्यापीठ.

विविध प्रसारमाध्यमातून लखपती शेतकऱ्यांच्या कथा पसरविल्या जात आहेत. त्याच्या मोहात शेतकऱ्यांनी उत्साहाच्या भरात पडू नये. विवेकाने निर्णय घ्यावा. अमेरिकी केशरच्या यशोगाथेवर विश्वासच ठेऊ नका. ऐकीव माहितीपेक्षा केशर लागवडीचे सत्य समाजावून घेतले तर या फसवणुकीला आळा बसेल.

डॉ. विनायक िशदे, फळशास्रज्ञ

ashok tupe@expressindia.com

First Published on April 8, 2017 12:17 am

Web Title: american kesar