आपल्या रोजच्या जेवणात जेवढे मिठाचे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व भाजीत कोथिंबिरीचे आहे. भाजीत स्वाद वाढवण्यासाठी जगभर कोथिंबिरीचा वापर केला जातो. दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिका या देशांत याचे उत्पादन प्रारंभी सुरू झाले. त्यानंतर मोरोक्को, रोमानिया, इजिप्त, भारत, पाकिस्तान, बांगलादेश अशा सर्व देशांत कोथिंबिरीचे उत्पादन घेतले जाते. कोथिंबीर केवळ चवीसाठीच नाही तर ती आरोग्यवर्धकही आहे. पचनशक्ती वाढवते, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते, तोंडाचा अल्सर बरा करते, धन्याचा वापर उष्णता कमी करण्यासाठी केला जातो. ‘अ’ जीवनसत्त्व असल्यामुळे दृष्टिवर्धक म्हणूनही कोथिंबिरीचा वापर होतो.
उन्हाळय़ात ज्याप्रमाणे गुलकंदाचे महत्त्व आहे तसेच महत्त्व खडीसाखर व धने पावडरीला आहे. जगभर कोथिंबीर ही १२ महिने घेतली जाते. आपल्याकडे होळीपासून शिमग्यापर्यंत तापमान झपाटय़ाने वाढते, पाऊस कमी होतो, विहिरीचे पाणी कमी होते त्यामुळे महिनाभरात येणाऱ्या कोथिंबिरीची हुशारीने लागवड केल्यास शेतकऱ्याला त्याचा लाभ होतो.
ऐन उन्हाळय़ात तापमानामुळे कोथिंबिरीची फारशी वाढ होत नाही. १५ मार्च ते २० जूनपर्यंत कोथिंबिरीचे भाव मोठय़ा प्रमाणावर वाढतात. लग्नसराई व उन्हाळय़ात कोथिंबिरीला मागणी असते, त्यामुळेच हे भाव या कालावधीत कैकपटीने वाढतात. १७ मार्चपासून १९ जूनपर्यंत कोथिंबिरीची लागवड केली जाते. दर आठ दिवसांनी एक गुंठा या पद्धतीने लागवड करून योग्य प्रमाणात पाणी दिले तर तीन महिन्यात एकरी ५० हजार ते १ लाखापर्यंतचे उत्पादन मिळू शकते. धन्याच्या अनेक जाती आहेत. गावरान किंवा वाई धना हा लंबाकृती असतो. या कोथिंबिरीचा स्वाद चांगला आहे. पानाचा आकार किंचित पोपटी असतो व कोथिंबिरीची काडी कडक असते. बदामी धना ही जात जळगाव भागात घेतली जाते.
अकाराने मोठा व गोलाकार असणाऱ्या या धन्याची पाने पल्लेदार असतात. विक्रीच्या दृष्टीने शेतकरी या धन्याला पसंती अधिक देतात. इंदोरी धना हाही अतिशय स्वादयुक्त असतो. १५ ते २० फुटांवरूनही याचा स्वाद येतो. शहरवासीयांमध्ये मसाल्यासाठी याचा अधिक वापर होतो. त्यामुळे या धन्याला दुप्पट भाव मिळतो. गौरी धना हा हिरवागार असतो. चार, सहा दिवस उशिरा काढणी झाली तरी पाने हिरवीगार राहतात. धन्याचे पीक हे मिश्र पीक म्हणूनही घेतले जाते. कोबी, घेवडा, कांदा यात हे पीक घेतल्यास खुरपणीचा खर्च कोथिंबिरीच्या उत्पादनातून निघतो.
धन्याची पेरणी साधारणपणे रगडून करण्याची प्रचलित पद्धत आहे, मात्र या पद्धतीत मर होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तो न रगडताच पेरावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे असे शेतकरी कोथिंबिरीचे उत्पादन घेण्याकडे वळतात, पण काही शेतकरी केवळ पावसाच्या भरवशावरही कोथिंबिरीचे उत्पादन घेतात. लातूर जिल्हय़ातील औसा तालुक्यातील उजनी येथील विश्वनाथ खच्रे हे शेतकरी गेल्या
चार वर्षांपासून कोथिंबिरीचे उत्पादन घेतात. पावसाचा अंदाज पाहून ते पेरा करतात. मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतले जात असल्यामुळे शेतावरूनच व्यापारी कोथिंबीर घेऊन जातात. सरासरी दीड महिन्यात एकरी २५ ते ५० हजार रुपयांचे उत्पादन मिळते. एखाद्या वेळेस कोथिंबिरीला बाजारपेठेत योग्य भाव नसल्यास ती अधिक काळ ठेवून धन्याची विक्री केल्यासही चांगला नफा होतो, असा आपला अनुभव असल्याचे खच्रे सांगतात.
हेक्टरी २० क्विंटल धन्याचे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात धना उत्पादन घेणारे शेतकरी अधिक आहेत. साधारण
२० ते २५ दिवसांच्या अंतराने धन्याला गरजेनुसार पाणी दिले जाते व उत्पादन घेता येते. धन्याची शेती ही परवडणारी आहे. कमी कालावधीत उत्पादन मिळते. एकाच ठिकाणी वर्षांत तीन ते चार वेळा धन्याचे त्याच ठिकाणी उत्पादन घेणारे शेतकरीही आहेत. रोजच्या रोज कोथिंबिरीकडे लक्ष दिले तर अधिक उत्पादन घेता येते, असा अनुभव खच्रे यांच्याप्रमाणे अनेक शेतकरी सांगतात. आपल्या शेतातील पाण्याची उपलब्धता, जमिनीचा पोत लक्षात घेऊन कोथिंबिरीची लागवड फायदेशीर ठरते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 21, 2016 12:32 am