News Flash

पाणलोट क्षेत्र संकल्पना

पाणलोट क्षेत्र विकासाचा विचार करताना त्या पाणलोट क्षेत्राचे सर्व गुणधर्म तपासणे आवश्यक आहे.

ज्या क्षेत्राचे पाणी नैसर्गिकरीत्या ओढय़ाद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहते त्या संपूर्ण क्षेत्रास पाणलोट क्षेत्र असे म्हणतात.

शेती करीत असताना या पाणलोट क्षेत्राचा विचार करणे आणि त्याला अनुसरून शेतीचे नियोजन करणे लाभदायक ठरते. भूपृष्ठावरील प्रत्येक जलाशयास व प्रत्येक जलप्रवाहास त्याचे स्वतंत्र पाणलोट क्षेत्र असते. असे प्रत्येक लहान प्रवाहाचे स्वतंत्र पाणलोट क्षेत्र, एकत्र आल्यावर त्याचे मोठे एकत्रित पाणलोट क्षेत्र तयार होते व असे अनेक प्रवाह एकत्र येऊन जेव्हा ते एखाद्या नदीस मिळतात तेव्हा त्याचे नदीखोरे तयार होते.

पाणलोट क्षेत्र विकासाचा विचार करताना त्या पाणलोट क्षेत्राचे सर्व गुणधर्म तपासणे आवश्यक आहे. या गुणधर्मामध्ये आकारमान, आकार, उतार, जमिनीवरील आच्छादन, प्रवाहघनता, जमिनीचा उपयोग, जलअंत:सरण, मातीचा प्रकार, भूगर्भ, मातीची खोली, पर्जन्यमान, पर्जन्यकाळ, पर्जन्यघनता, वारंवारता, वितरण यांचा समावेश होतो. यांपैकी काही गुणधर्माचा सविस्तर विचार करता येईल.

आकारमान – पाणलोट क्षेत्रातील किती पाणलोटाची व्यवस्था करावयाची आहे. हे त्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात ठरते. त्याचप्रमाणे पाण्याचा निचरा करावयाचा झाल्यास त्यासाठी मोठे पाणलोट क्षेत्र सोईचे असते. परंतु पाणलोट क्षेत्र जसजसे विस्तारत जाते तसतशी त्याच्या भूगर्भाची रचना, मातीचा आकार, उतारा इत्यादी गुणधर्मातील भिन्नताही वाढत जाते.

आकार – पाणलोट क्षेत्राच्या आकाराचा परिणाम त्याच्या निर्गम मार्गापाशी येणाऱ्या पाणलोटाच्या परिणामावर होतो. पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाणलोटाचे प्रमाण हे त्याच्या लांबी व रुंदी यांच्या गुणोत्तराशी संबंधित असते. ते लांबीशी व्यस्त प्रमाणात तर रुंदीशी सम प्रमाणात असते. पाणलोट क्षेत्राची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा जास्त असेल तर निर्गम मार्गाजवळ पाणी येण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे पाणी खोळंबून राहण्यास व जमिनीत मुरण्यास वाव मिळतो व निर्गम मार्गाशी कमी पाणी येते. हीच परिस्थिती उलट असेल तर म्हणजे रुंदी लांबीपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण पाणलोट क्षेत्रातील पाणलोट निर्गम मार्गाजवळ लवकर येतो. त्यामुळे ते कमी प्रमाणात अडविले जाते व जमिनीत कमी मुरविले जाते.

उतार – पाणलोट क्षेत्रातील सर्वोच्च बिंदूची उंची आणि उताराच्या दिशेने असलेली जास्तीत जास्त लांबी यावरून त्या पाणलोट क्षेत्राचा सरासरी उतारा कळतो. पाणलोट वाहून जाण्यास जास्त वेळ लागला तर पाणी जमिनीत जास्त प्रमाणात मुरते व पाणलोट कमी होतो. तेव्हा तीव्र उताराच्या पाणलोट क्षेत्राच्या निर्गम मार्गाजवळ येणारा पाणलोट हा तेवढय़ाच क्षेत्रफळाच्या सपाट पाणलोट क्षेत्रातील पाणलोटापेक्षा जास्त असतो.

मातीचा प्रकार- हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यावर जमिनीची जलधारणशक्ती, निचरा व जलअंत:सरणाचे प्रमाण अवलंबून असते.

पर्जन्यमान – पर्जन्यमान म्हणजे भूपृष्ठावर पडणारे पावसाचे पाणी, ते मिलिमीटरमध्ये मोजले जाते. पृष्ठभागाच्या ठरावीक क्षेत्रावर जितक्या जाडीचे पावसाचे पाणी ठरावीक कालावधीत पडते, ते त्या संपूर्ण क्षेत्राचे त्या कालावधीचे पर्जन्यमान समजले जाते.

पर्जन्यकाळ – पर्जन्यकाळ कमी असेल तर जास्तीत जास्त पाणी जमिनीत शोषले जाते व भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाणलोटाचे प्रमाण कमी होते. पर्जन्यकाळ जर जास्त असेल तर जमीन संपृक्त होत जाऊन तिची पाणी शोषण्याची क्षमता कमी कमी होत जाऊन संपुष्टात येते.

पर्जन्य घनता – पर्जन्य घनता म्हणजे ठराविक काळात पडलेले पर्जन्यमान. याची गणना साधारणपणे दर ताशी मि.मी अशी केली जाते. एका विशिष्ट तासात पडलेले एकूण पर्जन्यमान  म्हणजे त्याची त्या तासातील पर्जन्य घनता.

पाणलोट क्षेत्राचे वर्गीकरण 

  • अतिलहान पाणलोट क्षेत्र – १० हेक्टपर्यंत
  • लघू पाणलोट क्षेत्र – २०० हेक्टपर्यंत
  • उपपाणलोट क्षेत्र – ४००० हेक्टपर्यंत
  • नदीखोरे – अमर्याद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2016 12:41 am

Web Title: concept of the catchment area
Next Stories
1 पेरणी : खरीप कडधान्ये
2 शेतकऱ्यांना लखपती करणारा ‘वैजनाथ’!
3 ‘नॉलेज सेंटर’चा मळा फुलतोय
Just Now!
X