20 November 2017

News Flash

डॉक्टरचा शेतीतील अचंबित करणारा प्रवास

जालना जिल्हय़ातील खरपुडी गावातील सुरेश कुलकर्णी हे पेशाने वकील.

प्रदीप नणंदकर | Updated: April 8, 2017 12:14 AM

डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी शेतात घेतलेल्या पेरूचे उत्पादन. 

वैद्यकीय व्यवसाय भरभराटीत सुरू असताना वडिलांना शेती विकून टाका, आम्हाला त्याकडे बघण्यास वेळ नाही व आवडही नाही असे सांगणाऱ्या जालना येथील डॉ. सुयोग कुलकर्णी या तरुणाने आपला व्यवसाय बंद करून गेल्या तीन वर्षांपासून शेती करण्यास सुरुवात केली. तीनच वर्षांत मराठवाडा डाळिंब उत्पादक संघाचे अध्यक्षपद त्याने मिळवले व मराठवाडय़ातील फळबाग उत्पादकांना तो मोफत मार्गदर्शन करत आहे. शेती सोडून पर्यायी व्यवसाय शोधा असे वर्षांनुवष्रे शेती करणारी मंडळी सांगत असताना स्वत:चा व्यवसाय बंद करून शेतीत रमण्याचे कारण काय? खरेच शेती फायद्याची ठरते का? या प्रश्नांची उत्तरे आपण समजून घेऊ या.

जालना जिल्हय़ातील खरपुडी गावातील सुरेश कुलकर्णी हे पेशाने वकील. वकिली करत त्यांनी आपली शेती विकसित केली. दोन मुलांपकी एक मुलगा वकील तर एक डॉक्टर झाला. दोघांचेही विवाह झालेले असून दोघेही आपापल्या व्यवसायात मग्न होते. शेतीची आवड मुलांना नसल्यामुळे सुमारे ५० एकर शेतीची देखभाल सुरेशरावच करत. आम्हाला शेतीतील काही कळत नाही, आवडही नाही त्यामुळे तुम्ही जमते तितके दिवस शेती करा व नंतर ती विकून टाका इतक्या स्पष्ट शब्दांत मुलांनी सांगितल्यामुळे आपण असेपर्यंतच शेती आहे हे सुरेशरावांच्या लक्षात आले होते.

फेब्रुवारी २०१२ मध्ये सुरेशराव सपत्नीक केरळच्या सहलीवर निघाले. आपल्या डॉक्टर मुलाला शेतीतील दैनंदिन कामगारांचे पसे देण्यासाठी तू चक्कर मार असे सांगून ते गेले. मुलगा सुयोग संध्याकाळी शेतावर जाण्याचा विचार करत असतानाच प्रगतशील शेतकरी राधेश्याम मंत्री हे उपचारासाठी आले होते. त्यांच्याशी गप्पा मारताना आपण शेतावर जाणार असल्याचे सुयोगने त्यांना सांगितले तेव्हा तुमच्यासोबत मीही तुमच्या शेतावर येतो असे मंत्री म्हणाले. विहीर, ठिबक सिंचन, डाळिंबाची बाग पाहून मंत्रींनी सुयोगला सांगितले की, डॉक्टरी व्यवसायापेक्षा तुम्ही शेतीत लक्ष दिले पाहिजे. मंत्रींनी शेतीबद्दलचे लागणारे सर्व प्रकारचे मार्गदर्शन मी करेन असे सांगितले. त्यांच्यासोबतच्या चच्रेतून सुयोग शेतीकडे आकृष्ट झाला.

वडील परतल्यानंतर त्याने वडिलांना मी पूर्णवेळ शेती करू की डॉक्टरी व्यवसाय करू, असा प्रश्न विचारला. मुलाचा हा प्रश्न ऐकून सुरेशरावांनी मी कष्टाने शेती विकसित केली आहे. हा व्यवसाय तू पुढे चालवलास तर मला आनंदच होईल असे सांगितले अन् त्यानंतर सुयोगने वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. तीनमजली रुग्णालयाची इमारत भाडय़ाने देऊन पूर्णपणे शेतीत लक्ष घालणे सुरू केले. अत्याधुनिक शेतीबद्दलची माहिती विविध भागांतील शेतकऱ्यांना भेटून घेण्याचे सुयोगने ठरवले. डाळींब, मोसंबी, संत्री, सीताफळ, चिकू, पेरू, िलबू अशी फळे महाराष्ट्रात कोणत्या भागात अधिक प्रमाणात घेतली जातात याचा अभ्यास केला. सोलापूर जिल्हय़ात डाळिंबाचे मोठे उत्पादन होते. तेथील शेतकऱ्यांबरोबर संवाद वाढवत त्याने आपल्या शेतातील डाळिंबावर विविध प्रयोग केले.

पुण्यातील कृषी प्रदर्शनात त्याने व्हीएनआर ग्रुपच्या पेरूची माहिती मिळवली.  पांढरा पेरू व गुलाबी पेरू या पेरूच्या प्रमुख जाती आहेत. महाराष्ट्रात सध्या सुमारे ३५ हजार हेक्टरवर पेरूचे उत्पादन घेतले जाते व देशातील एकूण फळाच्या उत्पादनात पेरूचा वाटा सहा टक्के आहे. पुणे, नगर, नाशिक, सातारा, जळगाव, औरंगाबाद या जिल्हय़ांत पेरूचे उत्पादन होते.

३०० ग्रॅम ते १२०० ग्रॅम वजनाचा एक पेरू असतो. किमान दोन वेळा चांगला बहर घेता येतो. महाराष्ट्रात बारामती येथील सदाभाऊ कदम यांनी २०१३ साली याची सातशे झाडे लावलेली होती. सुयोगने त्यांच्या बागेची पाहणी केली व त्यांच्या सल्ल्यानुसार २०१४ साली तीन एकरावर १६ फूट बाय ८ फूट अंतरावर पेरूची लागवड केली. तेव्हा एका रोपाला १३८ रुपये इतका खर्च लागला होता. हा पेरू खोबऱ्याच्या चवीचा आहे शिवाय गोड आहे. रोप लावणीनंतर १८ महिन्यानंतर उत्पादन मिळते. दरम्यानच्या काळात वर्षभर आंतरपीक घेता येते. किमान ३० वष्रे या झाडाचे आयुष्य आहे. एका झाडाला चांगल्या प्रकारची २५ फळे येतात. त्यातील दोन-चार खराब झाली तरी उरलेल्या २० फळांचे वजन किमान १५ किलो मिळते. सरासरी ७० रुपये किलो भाव मिळाला व एकरी साडेसहा टन उत्पादन झाले. मुंबईबरोबरच जालन्याच्या स्थानिक बाजारपेठेतही पेरूला चांगली मागणी असल्याचे सुयोगने सांगितले.

या पेरूच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी व हलक्या प्रतीची जमीन चालते. इतर फळांपेक्षा पेरूला कमी पाणी लागते शिवाय पाण्याचा ताण पडला तरी हे झाड मरत नाही. १६ फूट बाय ८ फूट अंतरावर लागवड केली तर एकरी ३४०, १२ फूट बाय ८ फूट अंतरावर लागवड केल्यास ४५० व ८ फूट बाय ६ फूट अंतरावर लागवड केल्यास एकरी ९०७ रोपे लागतात. फळे झाडावर किती ठेवायची हे ठरवून अन्य फळे तोडून टाकावी लागतात. फळधारणा झाल्यानंतर महिनाभराच्या अंतराने प्रत्येक फळाला प्लास्टिक आवरण घालावे लागते. वर्षभरात एकदा फळ घेतले तर डिसेंबर ते मार्च हा कालावधी उत्पादनासाठी चांगला असतो. हवेतील तापमान व आद्र्रताही उत्तम असते. दरवर्षी उत्पादकतेचा व पॅकिंगसह येणारा खर्च हा १३ रुपये किलो येतो. ७० रुपयांचा भाव मिळाला तरी किमान ५० रुपये एका किलोला नफा मिळतो. सहा टन उत्पादन झाले तरी ३ लाख रुपये एका एकरात वर्षांला उत्पादन होते. पेरूच्या झाडाचे आयुष्य हे किमान ३० वष्रे आहे त्यामुळे त्याची देखभाल नीट केली तर तीस वष्रे चांगले उत्पादन मिळू शकते.

उत्पादनावर लक्ष केंद्रित करत असतानाच बाजारपेठेचा अभ्यास करून अधिकाधिक नफा कसा मिळेल याचा विचार कायम करावा लागतो. वातावरणाच्या बदलांमुळे उत्पादकतेवर काय परिणाम होतात याचाही अभ्यास करून त्यावर वेळीच उपाययोजना करावी लागते असे सुयोगचे म्हणणे आहे. डॉक्टरी पेशा सोडून कोणतीही चूक केली नाही. उलट शेतीत काही वेगळे करण्याचा आनंद घेत असल्याचे सुयोगने सांगितले.

pradeepnanandkar@gmail.com

First Published on April 8, 2017 12:14 am

Web Title: farming by doctors