News Flash

हरभरा उत्पादनाचे नवे तंत्रज्ञान

पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, हरभऱ्यावर शेतकरी भर देतो आहे.

चिंचोली बल्लाळनाथ गावातील बालाजी जाधव यांच्या शेतातील हरभऱ्याचे पीक.  

रब्बी हंगामात यावर्षी दरवर्षीच्या मानाने हरभऱ्याचा पेरा मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. मराठवाडा व विदर्भात याचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागातील शेतकऱ्यांचीही भर पडली आहे. उसाच्या शेतीत लागणारे भरपूर पाणी व बेभरवशाचा भाव यामुळे शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन व रब्बी हंगामातील हरभऱ्यावर मोठय़ा प्रमाणावर भर देतो आहे. गेली काही वष्रे या दोन पिकांचे उत्पादन घेतले तर अन्य कोणत्याही उत्पादनापेक्षा चांगले पैसे मिळत होते. अर्थात यावर्षी हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकला जात असल्यामुळे बाजारपेठेने हेही गणित बिघडवून टाकले आहे. पाऊस नसल्यामुळे सोयाबीन, हरभऱ्यावर शेतकरी भर देतो आहे.

रब्बी हंगामात एकरी सात ते आठ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत, मात्र हे उत्पादन दुप्पट करण्याच्या जिद्दीने काही शेतकरी मेहनत घेत आहेत. लातूर तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ गावातील बालाजी जाधव हे असेच धडपडे शेतकरी. दोन वर्षांपूर्वी तीन एकर क्षेत्रावर त्यांनी टोकण पद्धतीने हरभरा लावला होता व त्यावर्षी एकरी १५ क्विंटलचा उतारा त्यांना मिळाला होता. गतवर्षी दुष्काळ असल्यामुळे फारशी हालचाल करता आली नाही मात्र यावर्षी जाधव यांनी आठ एकर क्षेत्रावर टोकण पद्धतीने जाकी वाणाचा हरभरा घेतला. टोकण करताना दोन सरीतील अंतर तीन फूट तर दोन रोपातील अंतर एक फूट राहील या पद्धतीने त्यांनी टोकण केले. जमिनीची मागणी लक्षात घेऊन पाणी देत राहिले. आठ एकरसाठी केवळ ६० किलो बियाणे त्यांना लागले. एरवी एक एकरला ३० किलो बियाणे लागते.

बियाणात त्यांची एक क्विंटल ४० किलोची बचत झाली. यातून २१ हजार रुपयांची बचत झाली. प्रारंभी रेण पाईपने पाणी दिले. विहीर व िवधनविहिरीला पुरेसे पाणी असल्यामुळे पाण्याची अडचण नाही. ७ डिसेंबरला त्यांनी लावण केली. आश्चर्याची बाब म्हणजे आता साडेतीन फूट उंचीचा हरभरा असून त्याला मोठय़ा प्रमाणात घाटे आले आहेत. यावर्षी एकरी किमान २० क्विंटल उत्पादन होईल असा त्यांचा अंदाज आहे. त्यांनी नेमकी कोणती मेहनत घेतली की ज्यामुळे त्यांना इतके उत्पादन मिळणार आहे? मांजरा कृषिविज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ सचिन डिग्रसे यांनी जाधव यांना उत्पादन घेताना मार्गदर्शन केले. सर्वसाधारणपणे हरभऱ्यावर प्रारंभापासून जी फवारणी करावी लागते त्यासंबंधी कृषी विद्यापीठाने जी शिफारस केली आहे ती कीड नियंत्रणासाठी पाच टक्के िलबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी, क्विनॉलफॉस २५ ईसी, १ हजार मिली किंवा इमामेक्टीनबेन्झोएट ५ एसजी १५० गॅ्रम किंवा डेल्टामेथीन १ टक्का. विद्यापीठाच्या शिफारशीऐवजी बालाजी जाधव यांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ परिवाराने तयार केलेले एन्झाईम वापरल्यामुळे हरभऱ्याची विक्रमी वाढ झाली व सुरुवातीच्या काळात किडीचा प्रादुर्भाव कमी झाला. कृषिविज्ञान केंद्राच्या सल्ल्यानुसार एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा उपयोग करून िलबोळी अर्क व ओलेक्स (एमामेक्टीन बेंझोएट) चा वापर केला त्यामुळे घाटेअळीचा प्रादुर्भावही कमी झाला. विद्यापीठाने खत व्यवस्थापनात केलेल्या शिफारशीनुसार हेक्टरी १८:४६:०० हे १२५ किलो वापरण्याचा सल्ला दिला. जाधव यांनी १०:२६:२६ या प्रमाणात ७८ किलो व युरिया ११० किलो याचा डोस दिला. विद्यापीठाच्या शिफारशीनुसार हेक्टरी १८ ते २० क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन अपेक्षित आहे. मात्र बालाजी जाधव यांच्या शेतात ते ४५ ते ५० क्विंटल इतके विक्रमी येईल असा अंदाज आहे.

एन्झाईम आहे तरी काय?

  • ((    लातूर तालुक्यातील ३० वर्षांपूर्वी थायलंड येथील जिवानउन या शास्त्रज्ञाने हवामानातील तापमानात होणारी वाढ रोखण्यासाठी संशोधन सुरू केले. कारण स्वयंपाकघरातील वाया जाणाऱ्या ओल्या कचऱ्यामुळे तो कुजला की मिथेनवायू हवेत जाऊन तापमान वाढत असे. या शास्त्रज्ञाने दीर्घकाळ हा ओला कचरा पाणी व गुळाचा वापर करून कुजवला तर मिथेनऐवजी ओझोन गॅस तयार होतो व या गॅसमुळे पर्यावरणाची होणारी हानी थांबते शिवाय पिकाच्या उत्पादन वाढीस चांगला लाभ होतो हे सिद्ध झाले.
  • ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या कृषी विभागाचे लातूर येथील समन्वयक महादेव गोमारे यांनी गेल्या ३ वर्षांपासून हे एन्झाईम तयार करण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सांगणे सुरू केले. खराब फळे, भाजीपाला विकत घेऊन एका मोठय़ा बॅरेलमध्ये पाणी व गूळ टाकून ते तीन महिने तसेच ठेवले व त्याचा वापर पिकांवर फवारणीसाठी केला तर पिकाची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. जमिनीतील उपलब्ध अन्नाचे रूपांतर उपयुक्त अन्नात करण्यास मदत करते.
  • पिकाच्या पांढऱ्या मुळय़ांच्या संख्येत वाढ होते त्यामुळे जमिनीतून अन्न पीक मोठय़ा प्रमाणात घेते. ओझोनमुळे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेत वाढ होते. दर दहा दिवसाला प्रतिलिटर दोन मिलिलिटर एन्झाईम पाण्यात टाकून फवारणी केल्यास त्याचा चांगला लाभ होतो. एक लिटर एन्झाईम तयार करण्यास पाच रुपये खर्च येतो. बाजारात सध्या बायोझाईन नावाने याच पद्धतीचे औषध विकले जात असून त्याची किंमत ८०० ते १२०० रुपये प्रतिलिटर अशी आहे. एन्झाईमचा वापर पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी शेततळय़ात केला असता बाष्पीभवनही कमी होते असा दावा गोमारे यांनी केला आहे.
  • अतिशय कमी गुंतवणुकीत होणारा हा प्रयोग शेतकऱ्यांनी अजमावून पाहण्याची गरज आहे. लातूर परिसरात सुमारे १ हजार शेतकरी याचा वापर करत आहेत व त्यांना चांगले परिणाम दिसून येत असल्याचे गोमारे म्हणाले.

pradeepnanandkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 12:29 am

Web Title: green chickpeas production
Next Stories
1 पडीक जमिनीचे सेंद्रिय शेतीमुळे ‘सोने’
2 शेळीचे दूध दुर्लक्षितच..
3 गोवंश कोण ठरवणार?
Just Now!
X