मराठवाडय़ात बालाघाटच्या डोंगरांची मोठीच मोठी रांग आहे. नांदेड, परभणी, लातूर, बीड अशा जिल्ह्य़ात या डोंगररांगा आढळतात. दरवर्षी उन्हाळ्यात हे डोंगर उजाड दिसतात पण चांगला पाऊस झाला तर या डोंगरांवर, पडीक जमिनीवर मोठय़ा प्रमाणात सीताफळे येतात. उन्हाळ्यात निष्पर्ण झालेली झाडे पावसाळा संपताना एकदम हिरवीगार आणि सीताफळांनी लगडलेली दिसू लागतात. दसरा उजाडतो तेव्हा या भागातली सीताफळे बाजारात येऊ लागतात. वर्षांनुवष्रे हे चित्र पाहायला मिळते. निम्म्या मराठवाडय़ाच्या डोंगराळ भागात हे पीक सगळीकडे बहरून येते. त्यावर अक्षरश: हजारो लोकांचे अर्थकारण अवलंबून आहे. गेल्या तीन वर्षांत पावसाने ताण दिला त्यामुळे बालाघाटचे सीताफळ दिसलेच नाही. यंदा जोरदार पाऊस झाल्याने उन्हाळ्यात वाळून गेलेल्या सीताफळांच्या झाडांना चांगलाच बहर आला आहे. छोटय़ा गावातून, तांडय़ावरून ही सीताफळे आणून तालुक्याच्या ठिकाणी विकली जातात तर कुठे रस्त्यावरच अशा सीताफळांचा ढीग विक्रीसाठी असल्याचे चित्र दिसू लागते. अनेक तरुण सीताफळांचे ढीग घेऊन बसलेले असतात. जाणारी, येणारी वाहने थबकतात आणि सीताफळांचा भाव करून ती विकत घेतात. ही सीताफळे पिकलेली नसतात, घरी आणल्यानंतर ती पिकवली जातात. मुखेड-लोहा-कंधारपासून ते गंगाखेड, अहमदपूर, केज-धारूर अशा बालाघाटच्या डोंगररांगांनी वेढलेल्या तालुक्यांमध्ये हजारो टन सीताफळ निघते. कोणतीही मशागत करायची गरज नाही, पाणी घालण्याची गरज नाही. केवळ पावसाच्या पाण्यावर येणारे हे फळ आहे. सकाळीच ते झाडावरून तोडून लगेचच बाजारात विक्रीसाठी आणले जाते. किमान एक महिना तरी हा हंगाम चालतो. हे सीताफळ शेतातले किंवा शास्त्रोक्तलागवडीचे नाही, तर माळरानावरचे आणि पडीक जमिनीवरचे आहे. जी झाडे आहेत ती वर्षांनुवष्रे नसर्गिकपणे उगवलेली आहेत.

आता हा सीताफळाचा हंगामही बदलू लागला आहे. काही व्यापारी थेट खरेदीसाठी गावपातळीपर्यंत धडक मारू लागले आहेत. कधीकाळी टोपले भरून जर सीताफळे असतील तर त्यासाठी  फक्त चाळीस-पन्नास रुपये मिळत. आता दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंतचा भाव एका टोपल्यासाठी मिळू लागला आहे.

आता सीताफळ या पिकाबाबतही मोठी क्रांती झालेली आहे. जाणीवपूर्वक सीताफळाची लागवड करणारे शेतकरी आधी नव्हते. ज्या पद्धतीने संत्री, मोसंबी, चिकू, पेरू, आंबा या फळ पिकांच्या बागा आढळतात त्या तुलनेत सीताफळाची लागवड कमी आढळते. या फळ पिकात मोठी मजल मारली ती बार्शी तालुक्यातील गोरमाळे या गावच्या नवनाथ कसपटे यांनी. डोंगराळ भागात सरसकट आणि सर्वत्र आढळणारे जे सीताफळ होते ते बालानगर या नावाने ओळखले जायचे. गोरमाळे येथील कसपटे यांनी ‘एन.एम.के.-१’ हे नवे सीताफळाचे वाण विकसित केले. ‘बालानगर’मध्ये बिया जास्त असतात. हे फळ लवकर पिकते. त्यामुळे तोडल्यानंतर ते लवकर विक्रीसाठी बाजारात आणावे लागते. जास्त दूपर्यंतच्या बाजारपेठेत न्यायचे तर हे सीताफळ आधीच पिकण्याची भीती आहे. अशा वेळी कसपटे यांनी विकसित केलेले ‘एन.एम.के.-१’ हे वाण शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरले. या वाणात बिया कमी आहेत. सीताफळात पन्नास टक्के गर आहे. दुसऱ्या सीताफळात तो तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत आढळतो.

फक्त माळरानावर येणाऱ्या या फळाने आता मोठीच मजल मारली आहे. या संदर्भात कसपटे सांगतात की, तीस वर्षांपूर्वी या फळाकडे मी वळलो. २००३ पर्यंत काही ठिकाणी शेतात शेतकरी या फळपिकाची लागवड करताना दिसायचे. बारा-तेरा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फक्त पंचवीस हजार हेक्टर क्षेत्र सीताफळाच्या लागवडीखाली होते. आता हे क्षेत्र ६५ हजार हेक्टपर्यंत जाऊन पोहोचले आहे. हा बदल कसा झाला असे विचारले असता कसपटे यांनी ‘एन.एम.के.-१’ या वाणाच्या सीताफळाच्या लागवडीखाली क्षेत्र गेल्या ५ वर्षांत वाढल्याचे सांगितले. ‘नवनाथ मल्हारी कसपटे’ या नावातील इंग्रजी अद्याक्षरावरूनच हे नाव त्यांनी या वाणाला दिले आहे. कसपटे यांनी २०११ साली हे वाण विकसित केले. त्याआधी सीताफळ विकास व संशोधन संस्था त्यांनी स्थापन केली होती. या संस्थेचे नेतृत्व दीर्घकाळ त्यांनी केले. त्यांच्यामुळेच सीताफळ या पिकाच्या उत्पादनापासून ते बाजारपेठेपर्यंतच्या प्रवासाला गती मिळाली. सध्या अखिल भारतीय स्तरावर कसपटे हे सीताफळ उत्पादकांच्या संघाचे नेतृत्व करीत आहेत.

बार्शी-लातूर रोडवर पांगरी नावाचे गाव आहे. या गावापासून मधल्या रस्त्याने पाच किलोमीटर अंतरावर कसपटे यांचा मळा लागतो. या मळ्यात त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोगही दिसून येतात. पाहिल्यानंतर कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल कारण कसपटे यांच्या शेतात सीताफळाच्या तब्बल ३२ जाती पाहायला मिळतात.  प्रत्येक प्रकाराची वेगळी रांग आहे आणि या प्रकाराच्या नावाचा फलक तिथे लागलेला आहे.

सध्या कसपटे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आदी ठिकाणच्या सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात आहेत. ‘एन.एम.के.-१’ या आपण विकसित केलेल्या वाणाचे रूप आकर्षक आहे. पाहताक्षणीच ग्राहकाची ते घेण्याची इच्छा होते. फळ झाडावरून काढल्यानंतर मार्केटिंगसाठी पाठवण्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्याला कितीही दिवस लागले तरीही हे फळ लवकर पिकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. बालानगर या सीताफळाच्या एक किलोत चार-पाच सीताफळे बसतात. तर ‘एन.एम.के.-१’ ही दोन-तीनच फळे एका किलोत बसतात.’ अशी माहिती या वेळी कसपटे यांनी दिली. या नव्या विकसित वाणाच्या सीताफळाला भावही चांगला लागतो हेही त्यांनी आवर्जून सांगीतले. मंगळवारीच कसपटे यांची सीताफळे मुंबईच्या बाजारात दाखल झाली होती आणि एका कॅरेटला तेराशे रुपयापर्यंतचा भाव त्यांना मिळाला आहे. कधीकाळी डोंगरमाथ्यावर बेवारस अवस्थेत वाढणाऱ्या या फळपिकाची यशोगाथा आता सातासमुद्रापार जाण्याच्या दिशेने आहे.

पहिले पेटंट मिळण्याची शक्यता

‘एन.एम.के.-१’ या वाणाला आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्जा मिळावा यासाठी कसपटे यांचे प्रयत्न आहेत. कसपटे यांच्या शेताची बंगळुरूच्या नॅशनल रिसर्च सेंटरच्या तज्ज्ञांनीही पाहणी केली होती. त्यामुळे काही दिवसांतच सीताफळातला पहिले पेटंट मिळण्याची शक्यता आहे.

aasaramlomte@gmail.com