शंभर टक्के ठिबक सिंचनाखालील गाव अशी या गावाची ओळख कोल्हापूर जिल्ह्य़ाला झाली आहे. गावातील तरुणाई एका नवविचाराने भारून निघाली नि त्याला कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांतील अभ्यासकांचे योगदान मिळाले की गावाचे सोने कसे होते, याचा वस्तुपाठही येथे पाहायला मिळतो. कारभारवाडीत हेच दिसून आले. गाव दत्तक घेणारी इफ्को, कृषी विभागजैन इरिगेशन आणि आत्मा यांच्या मदतीच्या हातांमुळे कारभारवाडीचा कारभार खरंच सुधारला, वधारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुबलक आणि बारमाही पाण्याची सोय. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा म्हणजे काय, याचा प्रखर अनुभव कोल्हापूर जिल्ह्य़ाला नाही. तिन्ही त्रिकाळ पाण्याच्या उपलब्धतेमुळे पाण्याचा बेसुमार वापर होऊ लागला. पाण्याची किंमत अनेकांना कळलीच नाही. ‘रात्री शेतात जायचे, पाणीपुरवठा सुरू करायचा नि थेट सकाळीच इंजिनाचे बटन बंद करायचे’ अशा शब्दांत इथल्या पाणी पद्धतीची हेटाळणी होऊ लागली. बांधावर उभे राहून दगड भिरकावयाचा आणि ‘डुबूक’ आवाज आल्यावरच समाधानी होत पाणीपुरवठा थांबवायचा, अशी आणखी एक पद्धत टीकेला कारण ठरली. पाणी वापरावर चोहोबाजूंनी टीकेचे मोहोळ उठल्याने काही गावांत यावर गांभीर्याने चर्चा झाली. यात अग्रेसर गाव ठरले ते कारभारवाडी. याच गावाने पाणी आधुनिक, शास्रोक्त पद्धतीने कसे वापरायचे याचा मूलमंत्र दिला आहे. शंभर टक्के ठिबक सिंचनाखालील गाव अशी या गावाची ओळख कोल्हापूर जिल्ह्य़ाला झाली आहे. गावातील तरुणाई एका नवविचाराने भारून निघाली नि त्याला कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांतील अभ्यासकांचे योगदान मिळाले की गावाचे सोने कसे होते, याचा वस्तुपाठही येथे पाहायला मिळतो. कारभारवाडीत हेच दिसून आले. गाव दत्तक घेणारी ‘इफ्को’, कृषी विभाग,  जैन इरिगेशन आणि आत्मा यांच्या मदतीच्या हातांमुळे कारभारवाडीचा कारभार खरंच सुधारला, वधारला.

कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या पश्चिमेकडे करवीर तालुक्यातील सडोली खालसापकी कारभारवाडी एक छोटेसे गाव. गावात फक्त ७१ कुटुंबे. लोकसंख्या ४०४ आणि सर्वच शेतकरी अल्पभूधारक. २ गुंठय़ांपासून २ एकरांपर्यंत शेती असणारे गावात १३१ शेतकरी. गावात भरपूर पाणी, घरटी जनावरे. दूध व्यवसायावरच गावाचा संसार चालतो. जनावरांसाठी उसामध्ये आंतरपिके घेतली जातात. त्यामुळे सरासरी २३-२३ टनांची उसाची उत्पादकता होती.

गावात कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्था आहे. या संस्थेवर २०११ साली तरुण वर्गाची सत्ता आली. राजकारण बाजूला आणि बडय़ा पुढाऱ्यांपासून दूर राहून या मंडळींनी संस्थेचा कारभार अतिशय सचोटीने केला. अल्पावधीत ही संस्था नफ्यात आली. यामुळे सभासदांचा संचालकांवरील विश्वास वाढला. याच काळात इफ्कोने कारभारवाडी गाव तीन वर्षांसाठी दत्तक घेतले. शासनाच्या कृषी विभागामार्फत आत्माच्या शेतीशाळा येथे होऊ लागल्या. परिणामी, सरासरी २३ टन उत्पादन असणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचे वेध लागले. त्यांच्यात मानसिक परिवर्तन झाले. पहिल्यांदा उसातील मका हे खादाड आंतरपीक शेतकऱ्यांना बंद करायला लावले. त्या ठिकाणी अधिक फायदा देणारी पण इतर पिके, जी जमिनीचा पोत सांभाळतात, ऊसपिकाला मारक ठरत नाही, अशी भाजीपाला, भुईमूग, फुलशेती किंवा अन्य पिके शेतकरी घेऊ लागले. बदलाची ही पहिली पायरी होय.

इफ्को, कृषी विभाग, जैन इरिगेशन यांनी या गावातील लोकांचा उत्साह वाढविला. सुरुवातीला आंबा, चिकूची रोपे बांधावर लावण्यास दिली. खताच्या माध्यमातून एकरी ४ हजारांच्या निविष्ठा शेतकऱ्यांना दिल्या. ठिबक सिंचनाचे महत्त्व गावाला पटले. येथूनच गावातील परिवर्तन खऱ्या अर्थाने नजरेत भरू लागले. यानंतर संपूर्ण गाव ठिबक सिंचनाखाली आला. एकरी २३ टनांवरची उत्पादकता पहिल्याच वर्षी दुप्पट झाली. संपूर्ण एका गावाचे इंच न इंच पाण्याखाली असलेले कोल्हापूर जिल्ह्य़ातील कारभारवाडी पहिले गाव ठरले. गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे अल्पावधीत अनेक चांगले उपक्रम राबविले. बीज प्रक्रिया, उसाची रोपे तयार करणे, आधुनिक पद्धतीने ऊस लागण असे अनेक प्रयोग केल्याने हे बदल झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

जमिनीची सुपीकता कायम राखणे आणि कमी खर्चाच्या तंत्रज्ञानातून उत्पादनवाढीचे प्रयोग करणे यावर गावकऱ्यांचा जोर आहे. अनेक बदल सामूहिक प्रयत्नांतून केले जात आहेत. त्यासाठी  इफ्कोचे  मुख्य विभागीय व्यवस्थापक डी. बी. भोर, व्हिजन बुणगे, आत्माचे उपसंचालक अनिल गलितकर, गावातील इफ्को ग्राम समन्वयक नेताजी पाटील, विक्रम साळोखे, सुभाष पाटील, कमल एकनाथ पाटील, सुशीला भिवजी पाटील, सुवर्णा राजेंद्र पाटील, राधाबाई साळोखे, विद्या साळोखे यांचे प्रयत्न बदलास कारणीभूत ठरले. आता  गावात कृषी ग्रंथालय सुरू केले आहे. गावात सेंद्रिय खताची उपलब्धता व्हावी, यासाठी इफ्कोने गावकऱ्यांना ५० युनिट गांडूळखत तयार करण्यासाठी दिले आहेत. याशिवाय १० बॅटरी बॅकअप पंप दिले आहेत. याशिवाय ५० हायड्रोफोनिक युनिट चारानिर्मितीसाठी दिले आहेत. यामुळे दूधउत्पादनात वाढच होईल, असा लोकांना विश्वास आहे.

महिला सबलीकरणाचा उपक्रम गावकऱ्यांनी हाती घेतला आहे. गावातील प्रत्येक महिलेला तिच्या इच्छेप्रमाणे गावातच वेगवेगळा व्यवसाय, उद्योग सुरू करता येईल, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ऊस रोपवाटिका, मशरूमपासून ते विलायती भाजीपाला, फुलशेती असे नवे प्रयोग गावात करण्याचा येथील कारभारवाडीच्या कारभारी मंडळींचा निर्धार आहे. त्याला इफ्को, जैन इरिगेशन, आत्मा आणि कृषी विभागाची साथ राहणार आहे.

dayanandlipare@gmail.com

मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farming development in kolhapur
First published on: 28-01-2017 at 00:39 IST