या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीड जिल्ह्य़ातील कुसळंब (ता. पाटोदा) येथील शेतकरी रामहरी जाधव यांनी मधुमक्षिकांच्या संगोपनातून पर्यावरण आणि आíथक क्रांती साधली आहे. एकटय़ा मधुमक्षिका संगोपनातून वर्षांकाठी सात ते आठ लाख रुपयांचा नफा जाधव कमवितात. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जागृती झाल्याने तेथील शेतकरी हमखास मधुमक्षिकांच्या पेटय़ांची मागणी करतो. मात्र मराठवाडय़ात जागृतीच्या अभावाने शेतीतील उत्पन्नही घटले आहे. बीड जिल्ह्य़ात साधारण दोन जणांनी मधुमक्षिका पालन केलेले आहे. त्यात कुसळंबचे जाधव एक आहेत.

शेतात झाडावर वास्तव्याला आलेले मोहोळ निर्दयीपणे उठवून मधुमक्षिकांनी साठवलेला मध पळवण्यात सगळेच तरबेज असतात. पण मोहोळ टिकले तरच शेती टिकेल आणि मोहोळाकडे लक्ष्मी म्हणून पाहावे असे सांगणाऱ्या बीड जिल्ह्य़ातील कुसळंब (ता. पाटोदा) येथील शेतकरी रामहरी जाधव यांनी मधुमक्षिकांच्या संगोपनातून पर्यावरण आणि आíथक क्रांती साधली आहे. एकटय़ा मधुमक्षिका संगोपनातून वर्षांकाठी सात ते आठ लाख रुपयांचा नफा जाधव कमवितात. अकरा एकर शेतीतील डाळिंबाचे उत्पन्न मधुमक्षिकांच्या परागीकरणाच्या प्रक्रियेमुळे वाढले असल्याचा दावा त्यांनी केला. डाळिंब शेती, मधुमक्षिका पालन, शेततलावातील मत्स्यपालन अशा आधुनिक पर्यायांमुळे त्यांच्या जीवनात अर्थसमृद्धी आली आहे..

मधुमक्षिकांचे महत्त्व

झाडावर बसणारे मोहोळ हे पर्यावरणाचे किती प्रभावी वाहक आहे. आपण शेतात जे पीक घेतो त्यात नर आणि मादी असे दोन प्रकार असतात. पिकातील नराच्या फुलांतून परागकणाचे वहन होऊन ते मादी फुलावर बसते आणि त्यांच्या संगमातूनच फळ तयार होते. केवळ फळच नाही तर तेलबिया आणि शेतीतील कुठलेही पीक परागीकरणाशिवाय तयार होत नाही. हे परागीकरण दोन प्रकारे होत असते. एक हवेच्या माध्यमातून आणि दुसरे मधुमक्षिकांच्या माध्यमातून. शेतात विशेष करून फळबाग किंवा तेलबियांचे पीक असेल तर मधुमक्षिकांच्या परागीकरणातून उत्पन्नात दुपटी-तिपटीने वाढ होते. मात्र जागृतीच्या अभावामुळे शेतीतील मोहोळाकडे विशेष लक्ष दिले जात नाही. शेतीतील उत्पादनवाढ आणि मध व परागनिर्मिती असा दुहेरी फायदा मधुमक्षिकांमुळे होतो. त्यामुळे मधुमक्षिका संगोपन हा शेतीपूरक आणि जोडधंदा म्हणून पाहिले पाहिजे. इस्राईल या देशात मधुमक्षिकांना मोठे महत्त्व आहे. इस्राईल सरकारने प्रत्येक शेतकऱ्याने शेतात मधुमक्षिका पालन केले पाहिजे, असा कायदा केलाय. कारण तसे केले तर कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होतो. त्यामुळे इस्राईलमध्ये मोठय़ा प्रमाणात मधुमक्षिकांमध्ये संशोधन झालेले आहे. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने मेलीफेरा जातीची मधुमक्षिका इस्राईलमधून आयात केलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जागृती झाल्याने तेथील शेतकरी हमखास मधुमक्षिकांच्या पेटय़ांची मागणी करतो. मात्र मराठवाडय़ात जागृतीच्या अभावाने शेतीतील उत्पन्नही घटले आहे. बीड जिल्ह्य़ात साधारण दोन जणांनी मधुमक्षिका पालन केलेले आहे. त्यात कुसळंबचे रामहरी जाधव एक आहेत.

मधुमक्षिका संगोपन आणि अर्थक्रांती :

रामहरी बबन जाधव यांचे बी.एस्सी. अ‍ॅग्रीपर्यंत शिक्षण झालेले आहे. त्यामुळे त्यांना शेतीतील जाण होती. शेतीत वेगळे काहीतरी करण्याची धडपड उराशी बागळून पाच ते सहा वर्षांपूर्वी त्यांनी मधुमक्षिकापालन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राज्य शासनाची मराठवाडा विकास पॅकेज योजना कार्यान्वित होती. या योजनेच्या माध्यमातून त्यांनी मधुमक्षिका संगोपनाचे प्रशिक्षण घेतले आणि त्यांना योजनेतून संगोपनासाठी पन्नास पेटय़ा मिळाल्या पुढे त्यांनी अडीचशे पेटय़ा वाढवल्या. याच दरम्यान, जाधव यांनी नॅशनल बी बोर्ड येथे मधुमक्षिका संगोपनाचे प्रशिक्षण घेतले. तसेच मध संचालनालय महाबळेश्वर, कृषी विज्ञान केंद्र बारामती येथेही प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणामुळे त्यांना मधुमक्षिकांचे पर्यावरणीय महत्त्व, त्यातून साधली जाणारी अर्थक्रांती आणि संगोपनाची कला शिकायला मिळाली. सुरुवातीलाच त्यांनी अडीचशे पेटय़ांवर संगोपन सुरू केले. मात्र कालांतराने रासायनिक फवारण्यांचा अतिरेक, फुलोरा असलेल्या पिकांचा अभाव आणि दुष्काळामुळे त्यांच्या पेटय़ा कमी होत गेल्या. आज त्यांच्याकडे जरी ३८ पेटय़ा आहेत तरी त्यांचे उत्पन्न वर्षांकाठी सात ते आठ लाख रुपये मिळते. स्वत:च्या अकरा एकर डाळिंबाच्या परागीकरणासाठी जाधव यांना मधुमक्षिका संचाचा फायदा होता. पण याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातून त्यांच्या पेटय़ांना अनेकदा मागणी असते. त्यामुळे भाडेतत्त्वावर दोन हजार रुपयांप्रमाणे पेटी देऊ करतात. पिकांना कळी येण्याच्या आणि परागीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान म्हणजे एक ते दोन महिने अनेक शेतकरी त्यांच्याकडून भाडय़ाने पेटय़ा घेऊन जातात. याबरोबर सर्वात महत्त्वाचे उत्पन्न आहे ते मधाचे. महाबळेश्वर येथे कृषी विभागाच्या साहाय्याने वर्षांतील दोन महिने पेटय़ा स्थलांतरित केल्या जातात. महाबळेश्वर येथे हिरडा आणि जांभूळ मोठय़ा प्रमाणावर असल्याने तेथून मधही विपुल प्रमाणात मिळतो. शिवाय परागीकरणाचा फायदा तेथील शेतीला होत असल्याने महाराष्ट्रातून कितीही पेटय़ा आल्या तरी त्या स्वीकारल्या जातात. या दोन महिन्यांच्या काळात हजार किलोपर्यंत मध मिळून त्याला साडेतीनशे रुपयांपर्यंत भाव मिळतो. म्हणजे साधारण दोन महिन्यांच्या काळातच साडेतीन ते चार लाख रुपये मिळतात. तोच कुसळंब येथे महिन्याला दोनशे ते तीनशे किलो मध हाती येतो आणि दोनशे रुपयांपर्यंत भाव मिळतो. त्यातून दीड-दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. शिवाय पाच हजार रुपयांप्रमाणे पेटय़ा तयार करून विक्रीही केल्या जातात. जेव्हा मधमाश्या पोळी तयार करतात तेव्हा त्यात मधाची घरे वेगळी असतात आणि परागाची घरे वेगळी असतात. हा पराग अत्यंत महाग दराने विक्री होतो. सौंदर्य प्रसाधनांसाठी परागचा वापर केला जातो. मध, पराग, पेटी विक्री आणि भाडेतत्त्वावरील पेटी यामुळे वर्षांकाठी सात ते आठ लाख रुपये निव्वळ नफा मधमाश्या पालनामुळे मिळत असल्याचे जाधव यांनी सांगितले. ज्या शेतात पीक आहे तिथे झाडाखाली संगोपनाचा संच असतो. जाधव यांच्याकडे ३८ पेटय़ा असून प्रत्येक पेटीमध्ये १० फ्रेम आहेत. पिवळ्या पट्टीची गांधनमाशी आणि ब्लॅक बिटर या पक्ष्यापासून माश्यांचे संरक्षण करावे लागते. एवढीच तसदी घेतली आणि फुलोऱ्यासाठी सतत स्थलांतर केले की आपोआप नफा मिळतो, असे जाधव सांगतात. याबरोबरच अकरा एकरात जाधव यांची डाळिंबशेती आहे. गतवर्षी अल्पभावामुळे फायदा झाला नसला तरी यंदा मात्र चाळीस लाखांपर्यंत उत्पन्न जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलीय. उत्पन्नात मधमाश्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे जाधव सांगतात.

रासायनिक फवारण्यांमुळे मधुमक्षिकांची हानी

सध्या मोठय़ा प्रमाणावर रासायनिक फवारण्या केल्या जातात. यामुळे जमिनीचा पोत नाहीसा होऊन विषयुक्त उत्पादन हाती येते. याचा मानवी शरीरावरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे. कपाशीचे पीक मोठय़ा प्रमाणावर असल्याने फवारण्याही वाढल्या आहे. रासायनिक कीटकनाशकांचा मधमाश्यांच्या संख्येवर परिणाम होत आहे. फवारणी केलेल्या क्षेत्रातून जर मधमाशी गेली तर तिचे वास्तव्य ती विसरून जाते आणि मृत होते. मधमाश्यांचे कार्य हे अत्यंत नियोजनबद्ध रीतीने चालू असते. सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर त्यांचे काम सुरू होते. कोणी काय करावे, हे ठरलेले असते. परागकण कोणी आणायचे, पाणी कोणी आणयचे, काहींकडे वसाहतीच्या बांधकामाचे काम असते. शून्य ते अठरा दिवस वयोगटातील मधमाश्या या वसाहतीच्या संरक्षणासाठी असतात. एका पेटीत आणि एका पोळ्यात केवळ एकच राणीमाशी असते, जी दिवसाला अडीच हजारांपर्यंत अंडी घालते. मधुमक्षिका या खऱ्या अर्थाने शेती संपन्न करणाऱ्या असूनही आपल्याकडे जागृतीअभावी त्यांना दुय्यम लेखले जाते. शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून ४० टक्के अनुदानावर मधमाश्या पालनाच्या पेटय़ा उपलब्ध आहेत. परंतु कृषी विभागाकडून प्रशिक्षण मिळत नसल्याने याचे महत्त्व शेतकऱ्यांना समजलेले नाही. जाधव यांच्या कुसळंब गावाच्या अडीच किलोमीटर परिसरात त्यांच्या मधमाश्या संचार करीत असतात, त्यामुळे तिथे मोठय़ा प्रमाणावर शेतीत परागीकरण होते. परिसरातील अनेक शेतकरी प्रभावित होऊन मधुमक्षिका संगोपनाकडे वळत आहेत.

 vasantmunde@yahoo.co.in

Web Title: Honey farming in droughtful beed
First published on: 29-04-2017 at 00:39 IST