नागपूर: मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला शहरातील मेडिकल, मेयो, डागा या तीन शासकीय रुग्णालयांमध्ये १२ तासांमध्ये ७० बाळे जन्मली. यात मुलींचा टक्का अधिक होता. तर खासगी रुग्णालयातील बालकांचा जन्म बघता शहरात सुमारे १५० बालकांचा जन्म झाला.
मेडिकल, मेयो, डागा या शासकीय रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या बाळांमध्ये ३९ मुली, ३१ मुलांचा समावेश आहे. या सगळ्या कुटुंबियांनी नववर्षाच्या पर्वावर बाळाच्या आगमनाची चाहूल लागल्याचा आनंद रुग्णालयात वर्तवला.
हेही वाचा – नागपुरात गुढीपाडव्याला बाजारात उत्साह, ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी
मुलगी असो वा मुलगा… बाळाच्या जन्माचा आनंद मोठा आहे. दरवर्षी नववर्षाला बाळाच्या जन्माचा आनंद आम्ही साजरा करू, अशा भावना मराठी नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या पर्वावर जन्माला आलेल्या बालकांच्या माता-पित्यांनी व्यक्त केल्या. डागा रुग्णालयात सोमवारी मध्यरात्रीनंतर साडेबारा वाजता बाळ जन्माला आले. तर मेयोतही याच दरम्यान आले. मेडिकलमध्ये मात्र मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी बाळ जन्माला आले. मेडिकलमध्ये पहिल्या बारा तासांत २३ प्रसुती झाल्या. यात मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहिल्या बारा तासांत सर्वाधिक प्रसुती डागा रुग्णालयात झाल्या. पहिल्या बारा तासांत २७ प्रसुती झाल्या. मेयो रुग्णालात पहिल्या बारा तासांत २० मुले जन्माला आली, हे विशेष.
हेही वाचा – काँग्रेसच्या गडात भाजपची कसोटी, पश्चिम नागपूरमध्ये कडव्या झुंजीचे संकेत
खासगी रुग्णालयात दिवसाला ३० ते ३५ बालकांचा जन्म
नागपुरात मेयो, मेडिकल आणि डागा रुग्णालयात पहिल्या बारा तासांत ७० अपत्य जन्माला आली. यात ३९ मुली आहेत. ३१ मुले आहेत. दर दिवसांची आकडेवारी बघत खासगी नर्सिंग होममध्ये दिवसाला तीस ते पस्तीस मुले जन्माला येतात. यातही पन्नास टक्के मुली असतात. यावरुन मेयो-मेडिकल आणि डागातील बाळांच्या जन्मांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास शहरात ३९ मुली जन्माला आल्या. पहिल्या बारा तासांत मुलींच्या जन्माचा टक्का वाढला आहे.