अहमदनगर जिल्ह्यात बोरबन (ता. संगमनेर) येथील आनंदराव गाडेकर यांची २५ एकरांवरील डाळिंब, द्राक्षे, सीताफळ, पपई, आंबा व अन्य विविध पिकांची शेती दिशादर्शक आहे. टंचाईच्या स्थितीतही पाण्याच्या काटेकोर वापरातून तब्बल १५ हजार झाडे जगविण्यात त्यांना यश आले आहे. शेतीतील अभ्यास, अनुभव, यश स्वतपुरते मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शनातून त्यांनी किफायतशीर शेतीचे धडे दिले आहेत. कृषी विभागाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेत त्यांनी शेतीत नेत्रदीपक यश मिळविले आहे, शेतीतील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून राज्य शासनाने त्यांना वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका शेती व दुग्धव्यवसायामुळे देशाच्या पटलावर आला. याच तालुक्यात बोरबन या छोटय़ा गावात आनंदराव गाडेकर यांची एकत्रित २५ एकर शेती आहे. गाडेकर यांनी नोकरीच्या मागे न लागता पूर्णवेळ वडिलोपार्जति शेती करण्याचा निर्णय घेतला, वडिलोपार्जति बारा एकर शेती क्षेत्र आज तब्बल २५ एकरांपर्यंत पोचले आहे.

बोरबनसारख्या डोंगराळ भागात गाडेकर यांनी १९९० मध्ये तुटपुंज्या पाण्यावर डाळींब लागवड करण्याचा निर्णय घेतला. १२ बाय ८ फूट अंतरावर डाळींबाची ६ हजार झाडे व ९ बाय ५ फुट अंतरावर द्राक्षांची ५ हजार झाडांची लागवड केली. सीताफळ व इतर फळझाडांची लागवडही केली आहे. डोंगराच्या कुशीत असलेल्या या ठिकाणी मोठय़ा नियोजनातून बहरलेली फळशेती जणू कृषी पर्यटनाचे केंद्रच बनले आहे. सर्व मिळून एकूण १५ हजारांपर्यंत झाडे आहेत.

दृष्टिक्षेपात फळशेती

डाळिंब – ६००० झाडे आहेत. ८० ते १०० टन उत्पादन मिळते. मुंबई, नाशिक, जयपूर व दिल्ली बाजारपेठेत विक्री होते. प्रतिकिलो सरासरी ३० ते ८० रुपये दर मिळतो. उच्च प्रतिच्या मालाची युरोप येथे निर्यात केली जाते. द्राक्ष- सुमारे ५००० झाडे. एकूण क्षेत्रातून ४० ते ५० टन उत्पादन मिळते. जयपूर, दिल्लीच्या बाजारपेठेत विक्री केली जाते. प्रति किलो ४० ते ८० रुपये व सरासरी ६० रुपये दर मिळतो. उच्च प्रतीच्याच मालाची निर्यात युरोप येथे केली जाते. सीताफळ – सुमारे ३५०० झाडे. एकूण क्षेत्रातून ३२ टन उत्पादन मिळते. नाशिक, मुंबई बाजारपेठेत विक्री. प्रति किलो सरासरी २० रुपये ते ८० रुपये व सरासरी ५० रुपये दर मिळतो. गुणवत्तेनुसार दरात वाढही होते.

आंबा – केसर व हापूस आंब्याची एकूण सुमारे १०० झाडे. मात्र उत्पादनक्षम ५० झाडे आहेत, त्यापासून सुमारे ५००० किलो उत्पादन मिळते. शेतीवरूनच विक्री होते, किलोला ग्रेडनुसार सरासरी ५० रुपये व प्रतवारीनुसार दर मिळतो. नारळ – कोकणातील सुमारे १०० झाडे आहेत, त्यापासून ५ हजार नारळाचे उत्पादन मिळते. छोटे व्यापारी शेतावर येऊन १० रुपये प्रति नारळ दराने खरेदी करतात.

गाडेकर यांच्या शेतीची वैशिष्टय़े-

  • फळशेतीत मार्गदर्शक ठरलेल्या गाडेकर यांनी शेततळ्यात मत्स्यपालन केले. त्यात रोहू, कटला, मृगळ आदींचे २५ पेटय़ा मत्स्यबीज सोडले आहे.
  • २५ एकरांतील शेतीत रासायनिक खताचे प्रमाण अत्यंत कमी आहे. १०० टनाचा गांडूळ प्रकल्प असून, हे खतही उपयुक्त ठरते.
  • मत्स्यपालनातून उत्पन्नाची भर दरवर्षी पडते.
  • सुमारे १ कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यातून संपूर्ण शेतीला पाणी पुरविण्यात येते. २५ एकर शेतीसाठी ठिबकचा वापर असून, काटेकोर नियोजनातून पाणी देण्यात येते.
  • बांधावर बांबू, पेरू, बोर, कडुलिंब, चिकू, चिंच, नारळ यांचीही लागवड आहे. अंदाजे ४०० विविध फळझाडांची लागवड आहे, त्यापासूनही उत्पन्नात भर पडली आहे.
  • यांत्रिकीकरणातून मजूर टंचाईवर मात केली असून फवारणीसाठी ब्लोअर, पावडर स्प्रे करण्यासाठी यंत्र, आंतरमशागतीसाठी विविध अवजारे उपयोगात आणली आहेत.

डाळिंब आणि द्राक्ष युरोपात

उजाड माळरानावर बहरलेल्या डाळिंब आणि द्राक्षांचा गोडवा थेट युरोपमध्येल पोचला आहे. डाळिंब व द्राक्ष निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मुंबई येथील निर्यातदाराच्या मदतीने त्यांनी डाळिंब व द्राक्षांची निर्यात थेट युरोपात केली आहे. बोरबन गावच्या उजाड माळरानावरील फळांचा गोडवा युरोपीय देशात पोचल्याचा आनंद गाडेकर कुटुंबीयांना आहे.

कुटुंबाची मदत

भाऊ तानाजी, भावाची पत्नी सुजाता यांची शेतीत, तर पत्नी मंदाकिनी यांची शेती सांभाळण्यात मोठी साथ मिळाली. गाडेकर यांची दोन मुले कृषी पदवीधर तर मुलगी अभियांत्रिकीमध्ये पदवीधर आहेत. मुलेही शेतीत मदत करतात.

सेंद्रिय शेतीवर भर

रासायनिक खतांचा वापर कमी करा असा सल्ला देणाऱ्या गाडेकर यांनी द्राक्षे, डाळिंब, व इतर फळांसह सर्व पिकांना सेंद्रिय, गांडुळ खतांच्या वापरावर भर दिला. यात जीवामृत, अमृतपाणी यांचा वापर ते करतात. १०० टनाचा गांडुळखत प्रकल्प त्यांच्याकडे आहे.

शासनाच्या योजनांचा लाभ

गाडेकर यांनी फळबाग लागवड, ठिबक, ट्रॅक्टर, शेततळे, गांडुळखत प्रकल्प, यांत्रिकीकरण अशा विविध योजनांचा लाभ घेतला आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेत शेती किफायतशीर केली आहे, याकामी त्यांना उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी किशोर आहेर आदींचे मार्गदर्शन मिळाले.

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका शेती व दुग्धव्यवसायामुळे देशाच्या पटलावर आला. याच तालुक्यात बोरबन या छोटय़ा गावात आनंदराव गाडेकर यांची एकत्रित २५ एकर शेती आहे. गाडेकर यांनी नोकरीच्या मागे न लागता पूर्णवेळ वडिलोपार्जति शेती करण्याचा निर्णय घेतला, वडिलोपार्जति बारा एकर शेती क्षेत्र आज तब्बल २५ एकरांपर्यंत पोचले आहे.

गणेश फुंदे

shirdisio@gmail.com