शेतकरी असल्याचा अभिमान आणि प्रत्यक्ष शेती करण्याची आवड असली की, महागाईच्या काळातही शेती परवडू शकते. शेतीत जितका खर्च आणि कष्ट कराल तितका नफा होतो, अशी चर्चा प्रत्यक्षात उतरविण्याचा यशस्वी प्रयत्न उस्मानाबाद जिल्ह्यातील टाकळी येथील युवक शेतकऱ्याने केला आहे. सध्या एक सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या युवकाने ‘साहेबांची शेती’ अशी ओळख निर्माण केली आहे, त्याला कारणही तसेच. दुष्काळात आणि आता दररोज पाचशे रुपयांचे टँकर भाडय़ाने आणून डािळबाची जगवलेली बाग लाखमोलाची ठरली आहे. पहिल्या बहरात खर्चवजा जाता निव्वळ नफा मिळविणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यास पुढील दोन महिन्यानंतर किमान सात ते आठ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळून त्याच्या कष्टाचे चीज होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठवाडय़ात सर्वाधिक दुष्काळी दाहकतेचा पट्टा असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील टाकळी येथील सूर्यकांत खटके या शेतकऱ्याच्या जिद्दीने दुष्काळी दाहकतेशी दोन हात करीत डािळबाची बाग जगवली. बागेनेही त्यांना आता तारले असून सहा जणांच्या कुटुंबासाठी डािळबाची शेती लाखमोलाची ठरली आहे. सोलापूरच्या जिल्हा कोषागार कार्यालयात अपर कोषागार अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या सूर्यकांत खटकेंचा शेतीशी असलेला जिव्हाळा कायम राहिल्याने बाग सध्या बहरात आहे. येत्या दोन महिन्यात एक हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेल्या डािळबापासून त्यांना किमान दहा लाख रुपये उत्पन्न मिळेल, असा विश्वास खटके यांना आहे.

सूर्यकांत खटके हे उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झाले. काही दिवस उस्मानाबादमध्येही ते कार्यरत होते. सध्या सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयात अपर कोषागार अधिकारी पदावर ते कार्यरत आहेत. एक अधिकारी आणि प्रगतशील शेतकरी म्हणून टाकळी पंचक्रोशीत त्यांची ओळख. ‘साहेबांची शेती’ पाहण्यासाठी अनेकजण टाकळीत दाखल होतात. त्यांची भेट घेऊन आवर्जून त्यांच्या यशाचे गमक तरुण शेतकरी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. खटके यांच्याकडे वडिलोपार्जति साडेबारा एकर शेती आहे. एक भाऊ मुंबईत शिक्षक असून दोन विवाहित बहिणी आहेत. त्यामुळे आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा एकूण सहा जणांचा उदरनिर्वाह आणि शेतीचा कारभार पाहण्याची जबाबदारी सूर्यकांत खटके यांच्यावर येऊन पडली. नोकरी करीत शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सूर्यकांत गावच्या शेतीत काही ना काही करीत असतात.

जून २०१३ मध्ये अडीच एकर क्षेत्रावर डािळबाची लागवड करण्याचा मनोदय त्यांनी १७ जून २०१३ रोजी लगेच प्रत्यक्षात आणला. बुलढाणा जिल्ह्यातील अनासपूर येथून तीन महिने वय असलेली एक हजार रोपे त्यांनी खरेदी केली. प्रतिरोप २५ रुपयांप्रमाणे २५ हजार रुपये किमतीची सुपर भगवा या जातीचे डािळब रोपे शेतात लावली. दहा बाय दहा अंतर ठेवून या रोपांची लागवड करण्यात आली असून याच दिवसात जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे बाग जगली. पंधरा ते वीस रोपांचे नुकसान झाले होते. परंतु त्या ठिकाणी दुसरे रोप आणून लावण्यास खटके यांनी मागेपुढे पाहिले नाही.

सुपर भगवा या जातीच्या डािळबास एक वर्षांत फळधारणा होते. परंतु प्रत्यक्षात अठराव्या महिन्यात डािळब बाजारपेठेत जाते. वर्षांतून तीन बहार मिळतात. परंतु झाडाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक ते दोनच बहार खटके घेत आहेत. बाग लागवडीनंतर खटके यांनी पाटाने वाहून जाणाऱ्या पाण्याऐवजी बागेत ठिबक सिंचनाची सोय केली. त्यासाठी त्यांना ४० हजार रुपये खर्च आला. ती आजही वापरात आहे. वर्षभरात सरासरी ६० हजार रुपये कीटकनाशक फवारणी आणि दहा ते पंधरा हजार रुपये मजुरांवर खर्च होतात. बागेची लागवड झाल्यानंतर खटके यांनी सहाशे फूट खोल कूपनलिका घेतली होती. परंतु पाणी अत्यंत कमी आहे. त्यामुळे मागील ४० दिवसांपासून ते दररोज १२ हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे टँकर आणून डािळबाची बाग जगवित आहेत. एका टँकरला पाचशे रुपये भाडे ते देतात. दिवसातून एक-दोन, कधी-कधी तीन टँकरही लागतात. परंतु बाग जगविण्याची जिद्द त्यांच्यातील भविष्यातील यशापर्यंत पोहोचवीत आहे.

डािळबाच्या प्रत्येक झाडाला सरासरी ६० ते ७० फळे लागतात. मात्र सुपर भगवा जातीच्या डािळबाच्या झाडाची वाढ वेगात होते, फळधारणेचा कालावधीही कमी आणि एखादा बहार नाही घेतला तर पुढच्यावेळी दुप्पट ते तिप्पट डािळबाची फळे झाडाला लगडतात. सध्या डािळबाचे साडेपाच फूट उंचीवर आहे. एका झाडाला १०० ते १२५ फळे लगडलेली आहेत. जुलच्या पहिल्या आठवडय़ात हा माल बाजारपेठेत पाठविला जाणार आहे. किमान २० टन माल झाला तर १० लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न खटके यांना अपेक्षित आहे. त्यातील औषध फवारणी, मजुरांची मजुरी आणि पाण्याच्या टँकरचा खर्च वजा केला तर किमान सात ते आठ लाख रुपयांचा निव्वळ नफा खटके यांना मिळणार आहे.

शेतकऱ्यांकडूनच प्रेरणा – खटके

सोलापूर, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर या भागात डािळबाची मोठय़ा प्रमाणात शेती आहे. तेथील शेतकऱ्यांचे अनुभवही सकारात्मक आहेत. कामानिमित्त या भागात जाता आले. दरम्यान डािळबाची शेती पाहण्यात आली. या भागात इतक्या चांगल्या प्रकारे शेती व्यवसाय होतो तर आपल्या मराठवाडय़ात का नाही? असा प्रश्न पडला. मराठवाडय़ात डािळबाची शेती कमी आहे. तरीही प्रयोग म्हणून अडीच एकरावर डािळबाची लागवड केली. जानेवारी महिन्यात एक लॉट गेला. त्यातून अडीच लाखाचे उत्पन्न मिळाले. सुरुवातीला खर्च अधिक झाला. कूपनलिका, ठिबक सिंचन, औषधे, मजुरीवर झालेला खर्च वजा जाता निव्वळ नफा ७५ हजारच झाला. मात्र आता जुल महिन्यातील पहिल्या आठवडय़ात दुसरा भाग जाईल. त्यामध्ये मात्र औषधे आणि मजुरीचा खर्च वजा जाता आठ लाखाचा निव्वळ नफा होईल. शेतकऱ्यांकडूनच मिळालेल्या प्रेरणेतून केलेला हा प्रयोग यशस्वी झाला, असे सूर्यकांत खटके यांनी सांगितले.

ravindra.keskar@rediffmail.com

मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pomegranate farming
First published on: 03-06-2017 at 01:07 IST