Happy Diwali 2024 : दिवाळीचा सण आपल्याकडे मोठ्या थाटामाटात, उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा केला जातो. हा सण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र फराळ, सजावट, खरेदीची लगबग पाहायला मिळतेय. खऱ्या अर्थाने वसुबारसपासून दिवाळीचे वातावरण पाहायला मिळते. पण, आपण नरक चतुर्दशीपासून दिवाळी सणाला सुरुवात करतो. हिंदू पंचांगानुसार यंदा नरक चतुर्दशी गुरुवारी म्हणजे ३१ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.

नरक चतुर्दशीला कारीट फळ का फोडले जाते?

अभ्यंगस्नानानंतर कारीट फोडण्याची परंपरा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आढळते. हे फळ नरकासुर या राक्षसाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान केल्यानंतर घराबाहेरील तुळशीजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने कारीट चिरडले जाते. काही ठिकाणी अभ्‍यंगस्‍नानाच्‍या आधी कारीट फोडण्याची प्रथा पाळली जाते. कारीट या कडू फळाच्या रूपात नरकासुराचा प्रतीकात्मक वध करीत सारी कटुता, दुष्टता नाहीशी करावी, अशी प्रार्थना केली जाते.

Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीनिमित्त WhatsApp स्टेटस, फेसबुकला शेअर करण्यासह तुमच्या प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा!

हिंदू पौराणिक कथांनुसार पूर्वी प्राग्ज्योतिषपुरात नरकासुर नावाचा एक असुर राजा राज्य करीत होता. या राजाला भूमातेकडून वैष्णवास्त्र प्राप्त झाले होते आणि त्यामुळे तो फार बलाढ्य झाला होता. त्यानंतर शक्तीच्या जोरावर तो देव, माणूस, स्त्रिया सर्वांना त्रास द्यायचा. अशी एक आख्यायिका सांगितली जाते की, नरकासुराने अनेक राजांच्या सोळा हजार राजकन्यांना धरून आणत त्यांना बंदीखान्यात ठेवले. त्यात काही राजांनाही त्यांनी बंदी बनवले आणि अगणित संपत्तीची लूट केली. नरकासुराच्या या वागणुकीने सर्वत्र हाहाकार उडाला होता.

मग इंद्राने कृष्णाची प्रार्थना केली. त्यावर कृष्णाने नरकासुराचा अंत करण्याचे मान्य केले. त्यानंतर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन नरकासुराच्या प्राग्जोतिषपुरावर आक्रमण करीत नरकासुराचा वध केला आणि सर्व राजकन्यांना बंदिवासातून मुक्त केले. नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त झालेल्या राजकन्यांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने त्या १६ हजार राजकन्यांशी विवाह केला.

मात्र, नरकासुराने मरताना कृष्णाकडे, “आजच्या तिथीला जो मंगल स्नान करील, त्याला नरकात पीडा होऊ नये,” असा वर मागितला आणि कृष्णानेही नरकासुराला तसा वर दिला.

त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ म्हणून मानली जाऊ लागली आणि त्या दिवशी लोक सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करीत आनंदोत्सव करू लागले.

काही ठिकाणी नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुरवधाच्या स्मरणार्थ अभ्यंगस्नान करून पायाच्या डाव्या अंगठ्याने कारीट चिरडले जाते. कारीट हे कडू फळ नरकासुरास मारण्याचे प्रतीक मानले जाते. या कारीट्याचा रस जिभेला लावण्याचीही प्रथा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात काही ठिकाणी नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराची शेणाची आकृती करून तिच्यावर घरातील सर्व केरकचरा टाकला जातो. त्या ढिगावर (पूर्वी एक पैसा) रुपया ठेवला जायचा. त्यानंतर जी अंत्यज व्यक्ती ते सर्व उचलून नेईल, तिला बक्षीस दिले जाते. अशा प्रकारे महाराष्ट्रात नरक चतुर्दशीदिनी वेगवेगळ्या प्रथा पाळल्या जातात.