News Flash

समृद्धीचे कलात्मक स्वागत – तोरणलक्ष्मी आणि अष्टमंगल चिन्हे

तोरणामुळे घरच्या सजावटीची शोभा वाढते.

बांधिले गं मी तोरण…

रांगोळी, फराळ, फटाके, अभ्यंगस्नान, कंदील यांसह विविध प्रकारची तोरणे दिवाळीतला उत्साह वाढवत असतात. तोरणामुळे घरच्या सजावटीची शोभा वाढते. घराचे मुख असलेले दार नेहमी सुशोभित असले पाहिजे ही भावना ‘तोरण’ संकल्पनेच्या मागे आहे.

दिवाळी हा भारतातील सर्वाधिक उत्साहाचा सण. अभ्यंगस्नान, फराळ, फटाके, कंदील, रोषणाई, रांगोळ्या यांच्या बरोबरीने विविध प्रकारची तोरणे दिवाळीची शोभा वाढवीत असतात. या तोरणांचे प्रकार तरी किती? दोराला जास्त दिसणारे झेंडू आणि आंब्याच्या पानांचे तोरण, झेंडूचे भरगच्च तोरण, लीली-झेंडू-झिपरी-झर्बेरा-चमकदार बॉलचे महागडे तोरण, लोकरीचे तोरण, काचमणी तोरण, कृत्रिम फुलांचे तोरण, कपडय़ाचे गुजराती तोरण, लाइटचे तोरण इत्यादी. दार हे घराचे मुख आहे आणि ते नेहमी सुशोभित असले पाहिजे ही भावना ‘तोरण’ संकल्पनेच्या मागे आहे.

दरवाज्याला बांधायचे तोरण आज आपल्या परिचयाचे आहे. परंतु प्राचीन भारतात या ‘मालाबंधन’ तोरणाव्यतिरिक्त आणखीही तोरणाचे प्रकार प्रचलित होते. हलायुध कोशात असे म्हटले आहे की ‘दारासमोर उभारलेल्या दोन स्तंभांवर नाना वस्त्रे आणि रत्ने यांची अलंकृत धनुष्याकृती कमान म्हणजे तोरण.’ त्याचप्रमाणे ‘पुष्पमाळांनी सजवलेले दोन स्तंभयुक्त नगराचे प्रवेशद्वार म्हणजे तोरण’ असाही उल्लेख तेथे मिळतो. अल्पजीवी पुष्पमालांपेक्षा चिरस्थायी पाषाणाच्या कलाकृती करण्याकडे कल वाढू लागला तेव्हा तोरणाची रूपरेषा बदलली. त्याची काही उदाहरणे आपल्यासमोर ठेवीत आहे.

सांचीचे तोरण –

सांचीच्या विख्यात स्तूपांच्या सभोवती महाकाय स्तंभांवर तीन तीन कोरीव पट दिसतात. एकाप्रकारे ही सुशोभित प्रवेशद्वारे आहेत. या रचनेला शिल्पशास्त्रात तोरण म्हणतात. या पटांवर मुख्यत: बुद्धचरित्र कोरलेले आहे. अनेक यक्ष-यक्षिणी, व्याल, वृक्ष यांची सजावट या तोरणावर दिसते. पूर्वी कथा सांगण्यासाठी कापडी अथवा चामडय़ाच्या पट्टीवर चित्रे काढली जात आणि खलित्याप्रमाणे तो पट गुंडाळून ठेवीत. प्रत्येक पटाच्या टोकावर दिसणारी गुंडाळी ही खलित्यासारखी कोरलेली आहे. अशा आगळ्या पद्धतीत सांचीचे तोरण साकारले आहे.

साहित्यातील काही उल्लेख –

कालिदास रचित ‘कुमारसम्भवात’ सातव्या स्वर्गामध्ये शिव-पार्वती विवाह प्रसंगी तो असे म्हणतो की ‘फडफडणारे रेशमी ध्वज, पुष्पमाला आणि सोनेरी तोरणांमुळे हिमालयाचे धाम स्वर्गाची प्रतिकृती भासत आहे’. मानसार आणि मयमत या वास्तुग्रंथांतही  तोरणाचे उल्लेख सापडतात. व्याल, मकर, पुष्पलता इत्यादींचे अंकन द्वाराच्या तोरणावर असावे आणि मध्यभागी शिव, लक्ष्मी इत्यादी देवता कोराव्यात असे निर्देश या ग्रंथांत सापडतात.

काही ऐतिहासिक तोरणे-

बाराव्या शतकात आंध्र प्रदेशातील वरंगळ या काकातीयांच्या राजधानीच्या सीमेवर तेथील राजांच्या विजयाच्या आनंदाप्रीत्यर्थ कीर्तितोरणे उभारली गेली. त्यातील एखादे अजूनही तिथे आहे. मध्य प्रदेशातील ग्यारसपूर येथे देखील असेच एक ‘हिंदोला’ तोरण आहे. याला हिंदोला म्हणण्याचे कारण असे की झोपाळ्याच्या खांबांच्या चौकटीप्रमाणे या तोरणाचे रूप दिसते. कमानीवर दशावतार कोरलेले आहेत. या कमानी मागे मात्र आज मंदिराचे भग्नावशेष आहेत. माउंट अबू येथील जैन मंदिरात अचंबित करणारी शिल्पे आहेत. तिथे अनेक नक्षीदार तोरणे आजही आहेत. जैन धाटणीच्या नव्याजुन्या सर्व मंदिरात अशी तोरणे पाहायला मिळतात.

गोव्यातील माटोळी –

गोव्यात फोंडय़ाच्या आसपास काही देवळांबाहेर तसेच गावसीमेवर कार्तिक पौर्णिमेच्या आसपास धान्य, फळे, भाज्या, कंद, रानफुले, भाताच्या लोंब्या इत्यादी वापरून सुंदर कमानी उभारतात. या कमानीला ‘माटोळी’ म्हणतात. हासुद्धा तोरणाचा एक प्रकार आहे. कार्तिक पुनवेला देवांची पालखी गावागावांतून फिरते. त्यांच्या स्वागतासाठी भूमीच्या वरदानाने प्राप्त झालेल्या वैभवाची आरास तोरण रूपाने उभारतात.

सार रूपाने सांगायचे तर मांगल्य, समृद्धी इत्यादी संकल्पना तोरणातून प्रतीत होतात. या संकल्पनांशी दिवाळी आणि तिची अधिष्ठात्री देवता लक्ष्मी यांचे घनिष्ट नाते आहे. दिवाळी हा स्नेह आणि समृद्धी यांचा उत्सव. या पाश्र्वभूमीवर तोरण आणि लक्ष्मी यांचा वास्तुशास्त्र आणि शिल्पशास्त्रात कसा संबंध आहे ते पाहू.

येई लक्षुमी बैस बाजे,
अमुचे घर तुला साजे

तिन्ही सांजेला दिवे लागण झाली की, ‘घरातली पीडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो’ ही ओवी जवळ जवळ सगळ्या मराठी मुला-माणसांच्या, लेकी सुनांच्या, जुन्या जाणत्यांच्या ओठी आपोआप येते. पण ही भावना मात्र अगदी वैदिक काळाइतकी किंवा त्याहून जुनी असावी. ‘(हे लक्ष्मी,) भूक, तहान आणि मलिनतास्वरूपी अलक्ष्मी या तुझ्या मोठय़ा बहिणीचा मी नाश करतो. दारिद्य््रा आणि समृद्धीच्या अभावाला माझ्या घराच्या बाहेर लोटून दे. सुगंधाचे आगार असणाऱ्या, मिळविण्यास कठीण असणाऱ्या, नित्य पोषण करणाऱ्या, गोमयाने सुपीक झालेल्या भूमीसारख्या, सर्व भूतांवर अधिराज्य करणाऱ्या त्या लक्ष्मीचे (हे अग्ने) माझ्यासाठी आवाहन कर.’ ही वाणी ऋग्वेदातील श्रीसूक्तात उमटली आहे. शंकराचार्यापासून पुरंदरदासांपर्यंत अनेक संतांनी, कवींनी लक्ष्मीला लोककल्याणासाठी आळविले. जैन परंपरेत र्तीथकरांच्या मातेला जी शुभचिन्हे स्वप्नात दिसतात त्यामधील लक्ष्मीचे दर्शनसुद्धा एक शुभचिन्ह आहे. किंबहुना सुखी, समृद्ध जीवनाचे मूर्तिमंत स्वरूप अशा लक्ष्मीची आळवणी कोणत्या ना कोणत्या रूपात जगभर अनादिकालापासून चालू आहे.

नाण्यावरील लक्ष्मीची कहाणी –

सुरुवातीला कृषिप्रधान अर्थव्यवस्थेला पोषक असे लक्ष्मीचे स्वरूप जनमानसात रूढ झाले. लक्ष्मी म्हणजे धरित्री असून तिच्यावर वर्षांव करणारे हत्ती म्हणजे मेघ असल्याची रूपकात्मक शिल्पे आपल्याला सांची, भरहुत येथील शिल्पांमध्ये आढळतात. ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात गांधार प्रदेशात राज्य करणाऱ्या अ‍ॅझिलिसेस नावाच्या एका ग्रीक राजाने गजलक्ष्मीची अशीच प्रतिमा असणारी चांदीची नाणी घडविली होती.

चौथ्या-पाचव्या शतकातील गुप्त साम्राज्यात वाढत्या व्यापाराचा आणि वित्तीय देवाणघेवाणीचा परिणाम म्हणून नाण्यांचे महत्त्व वाढले असावे. कदाचित त्यामुळे त्यांच्या नाण्यांवर धनवर्षांव करणाऱ्या लक्ष्मीच्या प्रतिमा दिसू लागल्या. नवलाची गोष्ट म्हणजे, बाराव्या-तेराव्या शतकात पृथ्वीराज चौहानाचा पराभव करणाऱ्या मुहम्मद बिन साम याने लोकमानसाचा आणि नाण्यांच्या लोकमान्यतेचा विचार करून नाण्यांवर लक्ष्मीच्या प्रतिमा उमटविल्या.

लोककला- स्थापत्यातील स्थान

लोककलांच्या क्षेत्रातही या देवतेला महत्त्वाचे स्थान मिळाले. मांगल्य आणि समृद्धी सदैव आपल्या घरीदारी नांदावी यासाठी गृहिणी रांगोळीत लक्ष्मीची पावले, कमळे, गोपद्म आवर्जून काढतात.  भित्तिचित्रे आणि मधुबनी चित्रांसारख्या लोककलांमध्ये विविध आकार आणि रंगांमध्ये लक्ष्मी प्रकट होते. राजे-महाराजांनी राजप्रासादात आणि मंदिर स्थापत्यातही लक्ष्मीला अगत्याने स्थान दिले.

मानसार, मयमत इत्यादी वास्तुग्रंथांमध्ये लक्ष्मीची देवळे आणि प्रतिमा यांचे सांगोपांग वर्णन सापडते. लोककल्याणास्तव आणि नगराच्या उत्कर्षांसाठी तिची स्थापना करावी असे दाखले मिळतात. वेरुळची अजस्र गजलक्ष्मी आणि अनेक मंदिरांतून आढळणारी लक्ष्मीशिल्पे स्थापत्यातील लक्ष्मीचे महत्त्व दर्शवितात. सर्वसंगपरित्याग केलेल्या बौद्धभिक्षूंच्या गुफांवरील आणि जैन साधूंच्या मठ मंदिरांतील लक्ष्मीच्या प्रतिमा, तिची सर्वमान्यता, आवश्यकता यांच्यावर मूकभाष्यच करतात.

लक्ष्मी, यक्षराज आणि विघ्नराज

दिवाळीच्या अमावास्येला लक्ष्मीपूजनाचे आगळे महत्त्व आहे. पण त्या रात्री केवळ लक्ष्मीपूजन अभिप्रेत नसून लक्ष्मी-कुबेरपूजन करावे असा शास्त्रनिर्देश आहे. कुबेर हा यक्षांचा अधिपती आहे. हलायुधकोश म्हणतो यक्ष हा शब्द ‘यक्ष्यते’ म्हणजे ‘जे पूज्य आहेत’ यावरून येतो. याची दुसरी व्युत्पत्ती अशी सांगितली जाते की ‘यद्वा ईं लक्ष्मीमक्ष्णोति।’ अक्ष्णोति म्हणजे जमा करणे, व्यापून टाकणे, आलिंगन देणे. यातील पहिला आणि शेवटचा अर्थ आपल्या विवेचनासाठी फार महत्त्वाचा आहे. लक्ष्मी/धन जमवणारा आणि लक्ष्मीचा सहचर असा दुहेरी अर्थ यक्ष या शब्दातून प्रतीत होतो. या पाश्र्वभूमीवर नारद पुराणात लक्ष्मीला कुबेरपत्नी म्हटले गेले, किंवा रामायणात कुबेराच्या पुष्पक विमानावर लक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे असा उल्लेख येणे, किंवा स्कंदपुराण आणि महाभारतात तिला कुबेरासह जोडले जाणे याचा संदर्भ संयुक्तिकपणे जोडता येतो.  इसवीसनाच्या चौथ्या शतकात पुराणकरांनी विष्णूबरोबर लक्ष्मीची गाठ बांधण्याअगोदर लक्ष्मी स्वतंत्र अस्तित्व असणारी देवता होती. तिचे कार्य लक्षात घेऊन त्या कार्याशी मिळत्याजुळत्या देवतांच्या सहचरीचा दर्जा तिला वेळोवेळी प्राप्त होत असे. मात्र गेली अनेक शतके लक्ष्मीनारायण ही जोडी स्थिरतेने नांदत आहे.

यक्ष हे धनरक्षक देव, पाणवठय़ाचे अधिकारी देव, झाडांशी निगडित असणारे देव, अरण्याचे देव म्हणून प्रसिद्ध आहेत. महाभारतातील वनपर्वात नल-दमयंतीच्या आख्यानात, दमयंती ज्या व्यापाऱ्यांच्या काफिल्याबरोबर वनातून जात असते त्या काफिल्यावर हत्ती चाल करून येतात. त्या वेळी दाणादाण उडून नुकसान होत असताना व्यापारी म्हणतात की ‘का बरे हे विघ्न आमच्या वाटय़ाला आले? यात्रेला निघतेवेळी आम्ही मणिभद्र यक्षाची, कुबेराची किंवा विघ्नकर्त्यांची पूजा केली नाही का?’ या विधानावरून मणिभद्र यक्षाचे आणि कुबेराचे रक्षकत्व अधोरेखित होते. हे दोन्ही यक्ष ‘श्री’ सूक्तात उल्लेखिले गेले आहेत. याबरोबर, विघ्नकारक देवता आणि विघ्न निवारणासाठी त्यांची पूजा हा आणखी एक पैलू प्रकाशात येतो.

विनायक आणि यक्ष –

आज आपण ज्याला विघ्नेश्वर, विघ्नराज, विनायक या नावाने ओळखतो तो गणेश एक काळ या विघ्न निर्माण करणाऱ्या देवतांमध्ये गणला जात असे. गणपतीला ज्येष्ठराज म्हटले आहे. ज्येष्ठा ही लक्ष्मीची मोठी बहीण असून ती मलीन, अमंगळ आणि दु:खी आहे. अशा ज्येष्ठेचा गणेश अधिपती आहे. यावरून त्याच्या विघ्नकारक प्रकृतीची कल्पना येऊ  शकते. याज्ञवल्क्यस्मृतीतील गणपतिकल्पात असे स्पष्ट म्हटले आहे की कार्यात विघ्न उत्पन्न झाले असता त्याच्या शांत्यर्थ विनायकाची पूजा करावी. विनायकामुळे जे जे उत्पात घडतात त्यामध्ये व्यापाऱ्यांना लाभ होत नाही असा उल्लेख आहे. मानवगृसूत्रातही विनायकाच्या पीडेमुळे व्यापाऱ्यांचे मार्ग रोखले जातात किंवा नष्ट होतात असा उल्लेख आढळतो. तो त्रास टाळण्यासाठी शान्तिकर्म करावे असा निर्देश आहे. ‘दुर्जनं प्रथमं वंदे’ या उक्तीनुसार विनायकांना अग्रपूजेचा मान मिळाला. हा विघ्नराज पुढे मंगलमूर्तीमध्ये परिणत झाला कारण तो भयकर्ता आणि भयहर्ता दोन्ही भूमिका वठवू लागला. असे झाल्याने ज्येष्ठेचा संग सोडून त्याने लक्ष्मीची कड घ्यायला सुरुवात केली.

विनायक देवता यक्ष श्रेणीतील आहेत असे डॉ. आनंदा कुमारस्वामी इत्यादी तज्ज्ञांचे मत आहे. यक्षांची शिल्पे आणि गणेशाची शिल्पे यात खूप सारखेपणा आढळतो. मोठे पोट, जाडजूड परंतु आखूड हातपाय, बसण्याची ढब यात कमालीचे साम्य आहे. इतकेच नव्हे तर यक्ष रक्तवस्त्रधारी आणि पिंगट डोळ्यांचे आहेत असे ब्रह्मवैवर्त पुराण सांगते. असेच वर्णन गणेशाचेसुद्धा असल्याने त्यातून गणेशाची यक्ष प्रकृती प्रकट होते. कालांतराने विनायकांचे उन्नयन होऊन ते विघ्ननाशक बनले आणि  त्यांना लोकप्रियता प्राप्त झाली.

बदलत्या मानसिकतेचे दर्शन

वरील संदर्भ लक्षात घेता आजमितीला लक्ष्मीपूजन करताना उत्तरेत कुबेराऐवजी गणेश पूजनाची प्रथा रुजली आहे ते स्वाभाविक वाटते. राजस्थानातील आभानेरी या ठिकाणी नवव्या शतकातील एक शिल्प सापडले, जे सध्या अंबर वस्तुसंग्रहालयात आहे. त्यात मध्यभागी द्विहस्ता गजलक्ष्मी असून तिच्या उजवीकडे चतुर्भुज गजानन तर डावीकडे ऋद्धीसह कुबेर आहे.  कालगतीप्रमाणे या शिल्पाचा काही भाग खंडित झाला आहे. तरीसुद्धा रचनेतच सौंदर्य असल्याने त्याची मोहकता या परिस्थितीतही जाणवते. हे शिल्प दरवाजाच्या ललाटपट्टिकेवर कोरलेले होते ही आपल्या विषयाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे.

या कलाकृतीला समरांगण सूत्रधार ग्रंथाचा संदर्भ जोडता येईल. या ग्रंथांत सौम्यमुखी लक्ष्मी आणि कुबेर यांचे शिल्प प्रत्येक द्वारावर आणि स्तंभांवर असावे असा उल्लेख आढळतो. यक्ष उपासना क्षीण झाल्यावर कुबेराचे महत्त्व आपोआप कमी होऊन लक्ष्मी ही वित्तीय क्षेत्राची एकछत्र साम्राज्ञी बनली असावी. कुबेराच्या प्रतिमा अर्वाचीन काळी अभावानेच आढळतात. गणेशाची लोकप्रियता मात्र उतरोत्तर वाढत गेल्याने त्याला उत्तरेत आणि महाराष्ट्रात तोरण पट्टीवर धृवपद मिळाले. आभानेरीचे हे शिल्प कुबेर-गणेश संक्रमणाचे एक द्योतक आहे असे मला वाटते.

ओरिसा, बंगाल, आसाम येथील शाक्त प्रभाव आणि दक्षिणेत श्रीवैष्णवांच्या लक्ष्मीभक्तीमुळे तोरणावर लक्ष्मीशिल्पे बहरत गेली. तोरणलक्ष्मीचे आवाहन करायला आता आपण सज्ज झालो आहोत.

तोरणलक्ष्मीचा आविर्भाव –

अ‍ॅलिस बोनर नावाच्या एका स्विस चित्रकार आणि शिल्पी महिलेने जगाला तोरणलक्ष्मी या रूपाची नव्याने ओळख करून दिली.  १९२९ मध्ये प्रख्यात नर्तक उदय शंकर यांच्या संपर्कात त्या आल्या आणि भारतीय नृत्य व कला यांनी भारावून १९३५ साली भारतात कायमच्या राहायला आल्या. वेरुळची शिल्पे पाहत असताना भावसमाधीत त्यांना असे जाणवले की त्या शिल्पांना काही लय आहे. त्यांचे अवयव एका विशिष्ट आकृतिबंधामध्ये रचलेले आहेत. याबद्दल त्यांनी अनेक ठिकाणी बोलण्यास सुरुवात केली. पुढे १९५७ साली पं. सदाशिव रठ शर्मा यांनी शिल्पप्रकाश या ग्रंथाची बोनरबाईंना ओळख करून दिली आणि त्यांना त्यांच्या जिज्ञासेचे उत्तर मिळाले.

ओरिसा म्हणजे पूर्वकालीन उत्कल प्रांत कलाकुसरीच्या बाबतीत अग्रगण्य आहे. कोणार्कचे जगद्विख्यात सूर्यमंदिर शिल्पकलेतील अनमोल रत्न आहे. तसेच, पुरीचे जगन्नाथ मंदिर, लिंगराज मंदिर, वैतालदेऊळ इत्यादी अनेक मंदिरे कौशल्यपूर्ण मूर्तिकलेने शृंगारलेली आहेत. या मंदिरांची प्रेरणा तेथील आगमिक धर्मप्रणालीत आहे असे म्हटले तर चूक ठरणार नाही. सौर, शाक्त, शैव आणि वैष्णव पंथाची मंदिरे तत्तत् सांप्रदायाच्या नियमानुसार आणि आवश्यकतेनुसार बनविलेली आहेत. वास्तुशास्त्रात प्रचलित असणारा वास्तुमंडलाचा साचा इथे उपयोजित केलेला नसून, तंत्र मार्गातील गूढ यंत्रांनुसार काही मंदिरांची उभारणी झाली आहे. तेथील रामचंद्र कौल भट्टारक या स्थपतीने शिल्पप्रकाश नावाचा एक स्वानुभवसंपन्न स्थापत्यग्रंथ लिहिला. यात त्यांनी शक्तिमंदिरे कशी बांधावीत याचे सांगोपांग विवरण आहे. मंदिराच्या प्रत्येक अवयवाचे वर्णन, रेखाटन त्यात आढळते. या अद्भुत ग्रंथांत तोरणलक्ष्मीचा विषय त्यांनी मांडला आहे. शिल्पप्रकाशात अशी अनेक यंत्रे-आकृतिबंध आहेत ज्यांच्या मदतीने शिल्पी त्या देवदेवता साकारू शकतो. सोबतचे तोरणलक्ष्मीचे यंत्र हे त्यातील एक यंत्र आहे.

आपल्याकडे ज्या प्रकारे द्वारावर विघ्नहर्त्यां गणेशाची किंवा इष्टदेवतेची प्रतिमा लावतात, त्यानुसार शक्तिमंदिराच्या द्वारावर तोरणलक्ष्मी साकारावी असे त्यांचे म्हणणे आहे. शिल्पप्रकाशाच्या पहिल्या प्रकाशात श्लोक क्र. १७२ ते १९४ तोरणलक्ष्मी निर्माणविधीचे आहेत.

स्थपती सांगत आहेत की, ‘वत्सा, मी तुला द्वाराच्या मध्यभागी असणाऱ्या यंत्राचे निर्मळ ज्ञान देतो. द्वाराच्या (वर) मध्यभागी तोरण (सजावटीचा भाग) असून त्याच्या मध्ये याची स्थापना करावी. तोरणावर दोन प्रकारच्या तोरणलक्ष्मी योजाव्यात. त्यापैकी एक आहे गजलक्ष्मी आणि दुसरी शुभलक्ष्मी. (याचे कारण असे की) लक्ष्मी सर्व सौभाग्य प्रदान करते.’ यानंतरच्या श्लोकात यंत्राचे वर्णन आहे आणि त्या यंत्राच्या रेखांप्रमाणे लक्ष्मीचे अवयव कसे घडवावेत याची क्लृप्ती सांगितलेली आहे. वर्णनाच्या शेवटी असे म्हटले आहे की या यंत्रानुसार किंवा शिल्पशास्त्राच्या नियमाप्रमाणे गजलक्ष्मी किंवा शुभलक्ष्मी करून तिची स्थापना केल्यास ती वास्तू मंगलमय होते.

गजलक्ष्मी – ही लक्ष्मी आपल्याला सुपरिचित आहे. ‘दिग्गजांनी सुवर्णकुम्भामधून ओतलेल्या निर्मळ व सुखदायक गंगोदकाच्या धारांनी जिची गात्रं चिंब झालेली आहेत, अशा जगज्जननीला, अखिलविश्वनायकाच्या गृहस्वामिनीला, क्षीरसागराच्या पुत्रीला मी प्रात:काळी वंदन करतो.’ आद्यशंकराचार्याच्या कनकधारा स्तोत्रात तिचे असे मनमोहक वर्णन आढळते. सर्व राजकार्यात ही यश देणारी असून ती ऐश्वर्याचे दिमाखदार प्रतीक आहे.

शुभलक्ष्मी- वरील वर्णनात हत्ती नसतील तर त्या लक्ष्मीला शुभलक्ष्मी असे म्हणतात. हीसुद्धा सौभाग्यवृद्धी करणारी आहे. वरील दोन्ही लक्ष्मी कधी चार तर कधी दोन हातांच्या आढळतात.

लक्ष्मीबरोबर शंखनिधी आणि पद्म्निधी हे कुबेराचे निधी कधी मानवी स्वरूपात तर कधी केवळ शंख आणि कमळ या स्वरूपात दाखवितात. ते देवीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला असतात असे बृहत्तंत्रसार सांगते. विष्णुधर्मोत्तर पुराणात ‘हस्तिद्वयं विजानीहि शंखपद्मवुभौ निधी’ असे सांगून लक्ष्मीच्या बाजूला असणाऱ्या दोन हत्तींना निधींचे स्वरूप मानले आहे.

ओदिशाच्या बहुतेक सर्व मंदिरांत गर्भगृहाच्या तुळईवर गजलक्ष्मी स्थानापन्न झालेली दिसते. तसेच, कर्नाटकातील चालुक्य राजवटीत बांधलेल्या शैव, शाक्त आणि जैन मंदिरातसुद्धा गजलक्ष्मीची प्रतिमा गर्भगृहाच्या तुळईवर आढळते. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट राज्यांनी बांधलेल्या मंदिरातही गजलक्ष्मीला दरवाजावर अधिष्ठित केलेले दिसून येते. आजही अनेक जुन्या इमारतींच्या प्रवेशद्वारावर तोरणलक्ष्मी सुहास्य वदनाने आपले स्वागत करीत असते.

अष्टमंगल चिन्हे

शिल्पशास्त्रात मांगल्याची जी चिन्हे सांगितली आहेत त्यात आठ चिन्हे अधिक महत्त्वाची असून त्यांना अष्टमंगल चिन्हे म्हणतात. ग्रंथानुसार आणि पंथानुसार त्यांच्या यादीत फरक पडतो. मयमत ग्रंथानुसार जी अष्टमंगल चिन्हे आहेत त्याचा आपण विचार करू.

१. छत्र – छत्र हे राजसत्ता, अधिकार आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. राजसिंहासनावर छत्र असणे हे अत्यंत मानाचे लक्षण समजले जाई. सम्राटाच्या हातावर छत्रचिन्ह असते असे हस्तसामुद्रिक ग्रंथ सांगतात.

२. ध्वज – युद्धात किंवा यात्रेत दुरूनच व्यक्तीची ओळख व्हावी यासाठी ध्वज वापरत असत. आतासारखे याचे स्वरूप त्रिकोणी नसून एका लांब दंडावर एखादा प्राणी किंवा एखादे झाड इत्यादी चिन्ह घडविले जात असे. यवत येथील भुलेश्वर मंदिरातील महाभारताच्या युद्धाच्या शिल्पात असे ध्वज दिसतात. तसेच, अशोकस्तंभावरील सिंह, बैल, हत्ती अशा प्रकारचा ध्वज सूचित करतात.

विष्णूला गरुडध्वज म्हटले जाते. त्यामुळे मंदिराबाहेर गरुडस्तंभ असल्यास हे वैष्णव मंदिर आहे हे लक्षात येते. मध्य प्रदेशात बेसनगर येथे ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकातील वासुदेव मंदिराचा गरुडस्तंभ मिळाला असून त्यावरील शिलालेखात त्याचा उल्लेख गरुडध्वज असा आहे. तूर्त या स्तंभावरील गरुड ‘उडून’ गेला आहे. पण खांबावरील शिलालेखामुळे त्या खांबाचे प्रयोजन कळून येते.

मयमतात मात्र भूमीपर्यंत टेकणाऱ्या ध्वजाचे वर्णन असून, सूती आणि क्षौम वस्त्राच्या लडय़ांनी त्याला सजवावे असे म्हटले आहे. कदाचित जैन मंदिरांच्या लांबच लांब ध्वजांप्रमाणे हा ध्वज असावा. आजच्या काळात ब्रँड किंवा लोगोशी ध्वजाची तुलना होऊ  शकते.

३. पताका – उत्सवप्रसंगी लहान त्रिकोणी, चौकोनी आकाराची रंगीबेरंगी कपडे अथवा कागदापासून केलेली तोरणे म्हणजे पताका. उत्सवी वातावरण, आनंद यांचे प्रतिनिधित्व पताका चिन्ह करते.

४.  श्री (वत्स) – पुराणात श्रीवत्स म्हणजे विष्णूच्या छातीवरील हलक्या रंगाचे दक्षिणावर्ती केश असल्याचे म्हटले आहे. कोणी याला कौस्तुभ म्हणतात तर कोणी भृगूच्या लत्ताप्रहाराने उमटलेले लांच्छन समजतात. महाभारताच्या शान्तिपर्वात विष्णू शिवाची स्तुती करताना म्हणतो की माझे श्रीवत्स हे तुझ्या त्रिशुळाच्या आकाराचे होवो. डॉ. अरविंद जामखेडकरांचे असे मत आहे की प्राकृत भाषांमध्ये ‘सिरी वच्छ लंछण’ असे शब्द जैन आणि बौद्ध वाङ्मयात श्रीवक्ष्य लांच्छन या अर्थी वापरले जातात.  जैन आणि बौद्धांत हे महापुरुष लक्षण मानतात. संस्कृत वाङ्मयात सिरी वच्छचे श्रीवत्स झाले असावे. लांच्छन याचा अर्थ लक्षण असा आहे. श्रीवत्साचा मूळ आकार डोके, दोन हात, आणि दोन पाय असणाऱ्या प्राकृत मानवाकृतीप्रमाणे आहे. परंतु पुढे पुढे त्याचे त्रिशुळाच्या आकारात किंवा वेलीच्या आकारात रूपांतर झाले. काही ठिकाणी तर मुकुट घातलेल्या लहान मुलाप्रमाणे त्याचा आकार आढळतो. तात्पर्य इतकेच आहे, की हे महापुरुष लक्षण असून समृद्धी आणि प्रजावृद्धीशी जोडलेले आहे. शिलालेखांमध्ये स्वस्ति किंवा सिद्धम् इत्यादी शब्दांनी लेखाची सुरुवात होत असे. या शब्दांऐवजी काही लेखात श्रीवत्स चिन्ह आढळते.

५. दुंदुभी – नगाऱ्यासारखे हे एक वाद्य असून युद्धात शत्रूचे मनोबल डळमळीत करण्यास ते वाजवीत असत असा अथर्ववेदात उल्लेख आहे. इतकेच नव्हे तर रथांच्या शर्यतीत उत्साह वाढविण्यासाठी दुंदुभी वाजवीत. वाजपेय यज्ञात सतरा दुंदुभी यज्ञवेदीच्या जवळ ठेवून वाजवीत असत असाही उल्लेख आढळतो. तसेच ज्या वेळी श्रीकृष्णाचे वडील वसुदेव जन्माला आले तेव्हा स्वर्गातील दुंदुभी वाजल्या. त्यामुळे त्यांचे एक नाव ‘आनकदुंदुभी’ असे ठेवले गेले.

६. कुंभ – कुंभ हे चिन्ह अनेक अर्थानी महत्त्वाचे आहे. यज्ञासाठी पवित्र तीर्थाचा जलसंचय यात व्हावा अशी भावना काही मंत्रातून प्रकट होते. अनेक देवतांच्या जवळ अमृतघट, रत्नघट इत्यादी घटविशेष दिसतात. कुबेराजवळील नवनिधी घटाच्या रूपात दाखविले जातात.

नवरात्रात घटस्थापनेला असाधारण महत्त्व आहे. घट किंवा कुंभ हे स्त्रीच्या गर्भाशयाचे प्रतीक आहे. नवरात्र हा सुफलनाचा उत्सव आहे. त्यामुळे तिथे घट/गरबा असणे हे स्वाभाविक आहे. हेच प्रतीक अनेक शिल्पांमध्ये वापरले जाते. घटातून येणारी कमळे मुकुलित, प्रफुल्ल आणि क्षीण या स्वरूपात असल्यामुळे बाल्य, यौवन आणि जरा या अवस्थांचे दर्शन होते. किंबहुना घट हे आयुष्याशी निगडित असे चिन्ह असल्यामुळे त्याला अष्टमंगल चिन्हात स्थान दिले गेले आहे.

७. दीप – दीप हे जीवन धारण करणाऱ्या अग्नीचे प्रतीक आहे. जगात सर्वत्र कोणत्या ना कोणत्या रूपात मंगलमयतेशी, दिव्यत्वाशी आणि ज्ञानाशी दीपाचा संबंध आहे. तिन्हीसांजेला ‘शुभंकरोति’ प्रार्थना दिव्यापाशी करून लक्ष्मीला आवाहन करण्याची पद्धत माझ्या बालपणी तरी अस्तित्वात होती. दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या वेळी एका ताटात पणत्या ठेवून दीपलक्ष्मी म्हणून त्यांचे पूजन करतात. लक्ष्मी आणि दिव्यांचा अशा प्रकारे अन्योन्य संबंध आहे.

८. नंद्यावर्त – तगरीच्या फुलाला नंद्यावर्त म्हणतात. तगरीच्या वळलेल्या पाकळ्यांवरून नंद्यावर्ताची आकृती स्फुरली असावी. साधारणत: तगरीच्या फुलाच्या पाकळ्या डावीकडे वळलेल्या असतात. याला अनुसरून जैनांचे नंद्यावर्त डावीकडे म्हणजे उलटय़ा स्वस्तिकाप्रमाणे असते.

स्वस्तिकाची आकृती नंद्यावर्ताचा प्राथमिक आकार आहे. या आकृतिबंधाप्रमाणे घर आणि नगराच्या रचना कराव्यात असे वास्तुग्रंथांत उल्लेख आहेत. स्वस्तिक हे स्थिरता आणि मांगल्याचे सर्वमान्य प्रतीक आहे.

वरील चिन्हांखेरीज बौद्ध आणि जैन अष्टमंगल चिन्हे येणेप्रमाणे आहेत. स्वस्तिक, श्रीवत्स, नंद्यवर्त, वर्धमानक, भद्रासन, कलश, माशांची जोडी आणि आरसा ही जैनांची प्रतीके आहेत. छत्र, सुवर्णमत्स्य, शंख, कलश, कमळ, श्रीवत्स (न सुटणारी गाठ), ध्वज आणि धम्मचक्र हे चिन्हे बौद्धांची आहेत. आजकाल फेंगशुईच्या वस्तूंवर ही चिन्हे सहज पाहायला मिळतात.

जीवनात मंगलमयता यावी ही पुरातन भावना आहे आणि तिचे प्रकट स्वरूप म्हणजे दारावरील तोरणलक्ष्मी आणि अष्टमंगल चिन्हे होत. समृद्धी आणि उत्कर्षांच्या कल्पनांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. आज राजेरजवाडे नसतील, दरबार नसतील, चोवीस तास मिळणाऱ्या पाण्यामुळे कळशा आणि घडे मोडीत निघाले असतील, विजेच्या लखलखाटापुढे समयांचा प्रकाश फिका वाटत असेल आणि कदाचित संगणक, मोबाइल फोन, गाडी, ही चिन्हे आज समृद्धीची प्रतीके म्हणून मान्यता पावली असतील. पण अजूनदेखील गृहिणीला लक्ष्मीची उपमा दिली जाते. आपल्या देशाचा झेंडा आपल्याला मानाचा विषय वाटतो. यशाची दुंदुभी निनादत राहावीशी वाटते. त्यामुळे या चिन्हांमागची भावना अजून जिवंत आहे आणि लाक्षणिक रूपाने ती भारतीय लोकजीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिली आहेत.

चंद्रशेखर खांडाळेकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 12:06 pm

Web Title: toran toranlaxmi and ashtamangal symbols
Next Stories
1 मालिकांची चाळीस वर्षे
2 ‘तणकटा’ची लाट दणकट
3 आनंदवन समाजभान अभियान
Just Now!
X