15 October 2019

News Flash

तीन त्रिकोणांची कहाणी

रवींद्रनाथ टागोरांची ‘नष्टनीड’ ही एक अप्रतिम लघुकादंबरी आहे.

dw-45जीवन आणि कला एकमेकांत अतिशय बेमालूमपणे मिसळले गेलेले असतात. जीवनातील अनुभवांतून कलेची निर्मिती होत असते आणि निर्माण झालेल्या कलाकृतीत जीवनाचे प्रतिबिंब पडलेले असते. कलाकृतीत जीवनाचे प्रतिबिंब शोधण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो आणि या प्रयत्नाचे अपुरेपणदेखील नेहमीच जाणवत राहते. विख्यात बंगाली चित्रपट दिग्दर्शक सत्यजित राय यांच्या ‘चारुलता’ चित्रपटाशी संबंधित आणि तिच्यात गुंतल्या गेलेल्या व्यक्तींची ही लोकविलक्षण कहाणी..

रवींद्रनाथ टागोरांची ‘नष्टनीड’ ही एक अप्रतिम लघुकादंबरी आहे. एका विवाहित स्त्रीच्या मनात परपुरुषाविषयी आकर्षण निर्माण झाल्यामुळे तिच्या जीवनाचे सुरक्षित घरटे कसे उद्ध्वस्त होऊन जाते, याचे चित्रण करणारी ही कथा रवींद्रनाथांच्या कथासंभारातील एक अमोल रत्न आहे. भूपती हा एक श्रीमंत, जगण्यासाठी काही करण्याची आवश्यकता नसलेला, वेळ घालविण्यासाठी इंग्रजी वर्तमानपत्र काढणारा सुशिक्षित, पण फारसा बुद्धिमान नसणारा मध्यमवयीन गृहस्थ आहे. आपल्या वर्तमानपत्राच्या नादात असल्यामुळे घरी एक तरुण, सुंदर पत्नी आहे याकडे त्याचे फारसे लक्ष नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीच्या-चारुलताच्या जीवनात केवढे एकाकीपण आले आहे याचीही त्याला कल्पना नाही. त्याची पत्नी त्याच्याहून वयाने खूप लहान आहे. एकदा त्याचा धाकटा आतेभाऊ अमल त्याच्याकडे राहावयास येतो. या थट्टेखोर, लेखन-वाचनाची आवड असलेल्या समवयस्क दिराशी असलेले चेष्टामस्करीचे दीर-भावजयीचे नाते हा चारुच्या जीवनातील एकमेव विरंगुळा असतो. त्याच्याशी साहित्यावर चर्चा करता करता चारुला स्वत:मधील लेखकाचा शोध लागतो. तिचे स्त्रीत्व चहुअंगांनी बहरून येते. पण पाहता पाहता नात्याची सीमा कधी ओलांडली जाते हे चारुच्या ध्यानात येत नाही. आपण अमलच्या प्रेमात पडलो आहोत हे तिला जेव्हा जाणवते तेव्हा तिला प्रचंड धक्का बसतो. अमलसाठीही ही नवी जाण तेवढीच क्लेशदायक ठरते. पती, पत्नी आणि ‘तो’ हा चिरंतन त्रिकोण त्याच्या साऱ्या कंगोऱ्यांसह पुन्हा कार्यरत होतो. अशावेळी कुणीतरी समजूतदारपणा दाखविणे आवश्यक असते. अमल मुकाटय़ाने पती-पत्नीच्या आयुष्यातून दूर होतो. नंतर जेव्हा भूपतीला साऱ्या गोष्टींचा उलगडा होतो तेव्हा त्याच्या ध्यानात येते की आपल्या संसाराचे घरटे विस्कटून गेलेले आहे व पुन्हा ते पूर्ववत उभारता येणे शक्य नाही..

एका विस्कटलेल्या घरटय़ाची आणि त्यातील अभागी जीवांची ही कहाणी रवींद्रनाथांनी अत्यंत काव्यात्मतेने, सहृदयतेने, तन्मयतेने आणि तरीही शक्य तितकी अस्सल कलावंताच्या अलिप्ततेने ‘नष्टनीड’ या कथेतून सांगितली होती.

‘अलिप्ततेने’ असे मुद्दामच म्हटले, कारण या कथेमागे रवींद्रनाथांच्या आयुष्यातील एका ठसठसत्या जखमेचा संदर्भ आहे. रवींद्रनाथ हे त्यांच्या आई-वडिलांचे चौदावे आणि सर्वात लहान पुत्ररत्न. त्यांचे एक भाऊ  ज्योतींद्रनाथ त्यांच्यापेक्षा सुमारे तेरा वर्षांनी मोठे होते. ज्योतींद्रनाथांनी लग्न करून कादंबरीदेवीला घरी आणले तेव्हा ती अजून तारुण्यात आलेली नव्हती. तिची आणि तिच्या समवयस्क रवींद्रनाथांची छान मत्री जमली.  ज्योतींद्रनाथ वयाने खूप मोठे असल्यामुळे त्यांच्याशी ज्या गोष्टी बोलता येत नसत त्या कादंबरीदेवी आपल्या दिराशी बोलू शकत असे. त्यांच्या दोघांत नात्याचा एक सुंदर बंध निर्माण झाला. या नात्याचे स्वरूप नेमके काय होते, हे शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. पण दोन व्यक्तींच्या अत्यंत खाजगी नात्याविषयी आपण फक्त अंदाजच बांधू शकतो. पुढे १८८३ साली रवींद्रनाथ २२ वर्षांचे असताना त्यांचे लग्न झाले. टागोरांचे चरित्रकार प्रभातकुमार मुखोपाध्याय यांच्या मते हे लग्न ‘sudden and unexpected होते. या लग्नानंतर चारच महिन्यांनी कादंबरीदेवीने आत्महत्या केली. (‘The reasons are shrouded in mystery, but that there was some family misunderstanding, it can not be doubted.’ – प्रभातकुमार मुखोपाध्याय)

कादंबरीदेवीच्या आत्महत्येचा रवींद्रनाथांना फार मोठा धक्का बसला. पुढे अनेक वर्षांनी, १९१७ साली, अमिया चक्रवर्ती  यांना लिहिलेल्या एका पत्रात टागोरांनी आपल्या भावना अशा व्यक्त केल्या आहेत- ‘Once, when I was about your age, I suffered a devastating sorrow, similar to yours now. A very close relative of mine committed suicide, and she had been my life’s total support, right from childhood onward. And so with her unexpected death it was as if the earth itself receded from beneath my feet, as though the skies above me all went dark. My universe turned empty, my zest for life departed.’ कादंबरीदेवीने त्यांच्या जीवनावर एवढा प्रभाव टाकला होता, की त्यांच्या अनेक कवितांतून तिच्याविषयीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आढळतात. रवींद्रनाथ आणि कादंबरीदेवी एकमेकांच्या प्रेमात पडले होते असे निश्चित म्हणता येत नाही; पण त्या दोघांत नाजूक बंध निर्माण झाले होते- हे, आणि कादंबरीदेवी व दोघे भाऊ या तिघांत नात्याचा एक त्रिकोण निर्माण झाला होता, असे अनुमान नक्कीच काढता येते. कादंबरीदेवीने आत्महत्या का केली, हे गूढच आहे. टागोर कुटुंबाचा कोलकात्यामध्ये दबदबा असल्याकारणाने ही घटना फारसा गवगवा न होता दाबून टाकली गेली. ‘नष्टनीड’ लिहीत असताना या जुन्या आठवणींची सावली टागोरांच्या मनावर पडलेली सतत जाणवते. चारुलताचे व्यक्तिचित्र त्यांनी आपल्या वहिनीसारखेच रंगविले आहे. तरुण, सुंदर, प्रेमळ, साहित्य व संगीत यांची आवड असणारी.. (सुनील गंगोपाध्याय यांच्या ‘प्रथम आलो’ या कादंबरीत त्यांनी रवींद्रांच्या जीवनातील या कुसुमकोमल कालखंडाचे अत्यंत उत्कट आणि काव्यात्म चित्रण केले आहे.) अर्थात आपण चरित्र लिहीत नाही, कादंबरी लिहीत आहोत याचे भान असल्यामुळे आणि प्रत्यक्षातील व्यक्ती दुखावल्या जाण्याची शक्यता असल्यामुळे टागोरांनी ‘नष्टनीड’ कथेतील नावे आणि काही संदर्भ बदलले आहेत. पण मूळ आशयसूत्र तेच आहे.

टागोरांच्या या कादंबरीवर चित्रपट तयार करण्यासाठी सत्यजीत राय यांनी पटकथा लिहिण्यास सुरुवात केली त्यावेळी या कथेत टागोरांच्या आत्मचरित्राचे प्रतििबब पडले आहे असे त्यांनाही वाटू लागले. कादंबरीदेवी, ज्योतींद्रनाथ आणि रवींद्रनाथ या तीन व्यक्तींशी चारुलता, भूपती आणि अमल या व्यक्तिरेखांचा घनिष्ठ संबंध आहे असेही त्यांना जाणवले. याला कारण- त्याच सुमारास राय यांच्या हाती ‘नष्टनीड’चे एक जुने हस्तलिखित पडले होते. या लेखनाच्या मार्जिनमध्ये टागोरांनी अनेक ठिकाणी ‘हेकीट’ (Hecate) असे लिहून ठेवलेले त्यांना आढळले. टागोर कादंबरीदेवीला या टोपणनावाने हाक मारीत. ‘हेकीट’ ही ग्रीक पुराणातील एक देवता. ती ‘जादू’ किंवा ‘किमये’ची देवता समजली जाते. या हस्तलिखितात टागोर यांनी काढलेले कादंबरीदेवीचे रेखाचित्रही होते, असे राय यांनी त्यांचा चरित्रकार Andrew Robinson याला सांगितले होते. ही गोष्ट टागोरांवरील आणि ‘नष्टनीड’मधील चारुलतावरील कादंबरीदेवीचा प्रभाव स्पष्ट करते. प्रत्यक्ष जीवनातील एका त्रिकोणामधून कलेतील एका संस्मरणीय त्रिकोणाची निर्मिती झाली होती.

नियतीचे खेळ विलक्षण असतात. अत्यंत योगायोगाची गोष्ट म्हणजे कलेतील या त्रिकोणामधून पुन्हा एकदा प्रत्यक्ष जीवनात एक नवा त्रिकोण निर्माण झाला आणि त्यामुळे तीन व्यक्तींची आयुष्ये काही कालावधीसाठी तरी ढवळून निघाली.

चारुलतेचे हे अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व पडद्यावर कोण साकार करू शकेल असा विचार जेव्हा राय यांच्या मनात आला तेव्हा त्यांच्यासमोर फक्त एकच नाव होते.. माधवी मुखर्जी! हे नाव त्यांनी का ठरवले, हे समजण्यासाठी थोडा पूर्वेतिहास पाहणे आवश्यक आहे.

* * *

१९६० च्या सुमारास राय ‘महानगर’ हा नरेंद्रनाथ मित्र यांच्या कथेवर आधारित चित्रपट निर्माण करीत होते. या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी त्यांना बंगाली नाटक आणि सिनेमातील उदयोन्मुख कलाकार माधवी मुखर्जी ही योग्य वाटली आणि त्यांनी तिला बोलावणे पाठविले.

माधवी मुखर्जीचा जन्म १० फेब्रुवारी १९४२ रोजी झाला. तिच्या बालपणीच तिच्या आई-वडिलांचे बरेच मतभेद झाले आणि वडिलांनी पत्नी व दोन मुलींचा त्याग करून दुसरे लग्न केले. माधवीचे लहानपण फार हलाखीत गेले. वयाच्या सहाव्या वर्षांपासून ती रंगभूमीवर बालकलाकार म्हणून काम करू लागली. एका नाटकात नृत्य कर, दुसऱ्यात गाणे म्हण, तिसऱ्यात लहानशी भूमिका कर.. असे करता करता ती आघाडीची बालकलाकार बनली.परंतु जगण्यासाठीच्या या संघर्षांत तिचे बालपण कोमेजून गेले. तिला शालेय शिक्षणही घेता आले नाही. मात्र, जगाच्या शाळेत ती खूप काही शिकली.

वयात आल्यानंतर माधवीला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. तपन सिन्हा यांचा ‘Tonsil ’’ हा तिची नायिकेची भूमिका असलेला पहिला चित्रपट. ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांनी तिच्या नाटकातील काही भूमिका पाहिल्या होत्या. त्यांनी तिला आपल्या ‘बाईशे श्रावण’ या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी निवडले. तिच्या दृष्टीने ही फार मोठी संधी होती आणि तिने तिचे सोने केले. ही dw-46अवघड भूमिका माधवीने लीलया पेलली. चित्रपट खूप यशस्वी वगरे झाला नाही, पण माधवीच्या भूमिकेचे कौतुक झाले. तिच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे हे होते, की तिच्या कामाची दखल सत्यजीत राय यांनीदेखील घेतली आणि तिला त्यांचे बोलावणे आले.

एके दिवशी सकाळी राय यांचा मॅनेजर अनिल चौधरी माधवीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला. त्याने तिला राय यांचा पत्ता दिला व त्यांनी भेटण्यास बोलावले आहे असे सांगितले. एवढा मोठा दिग्दर्शक आपल्याला बोलावणे धाडतो आहे यावर तिचा विश्वासच बसेना. अनिलची पाठ वळते- न वळते तोच ती आईला म्हणाली, ‘‘राय मला त्यांच्या सिनेमात भूमिका देतील? अशक्य! त्यांच्याकडे जाणे म्हणजे रिक्षाचे भाडे वाया घालविण्यासारखे आहे.’’ अनिल दारातच होता, तेव्हा त्याच्या कानावर हे शब्द पडले आणि परत येऊन त्याने रिक्षाचे भाडे स्वत: देण्याची तयारी दाखविली. ओशाळून माधवीने त्याची माफी मागितली आणि रायना भेटायला येण्याचे कबूल केले.

राय त्यावेळी ‘३, लेक टेम्पल रोड, कोलकाता’ या पत्त्यावर राहत होते. रविवारी सकाळी जेव्हा माधवी त्यांना भेटण्यास निघाली तेव्हादेखील राय आपल्याला त्यांच्या चित्रपटात काम देणार नाहीतच याबद्दल तिची खात्री होती. पण यानिमित्ताने या महान कलावंताची भेट तरी होईल याचा आनंद तिला वाटत होता. राय यांच्या घरी गेल्यावर सत्यजित आणि त्यांची पत्नी विजया यांनी तिचे स्वागत केले. मात्र, त्यांनी कामाबद्दल कसलेही प्रश्न विचारले नाहीत. इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्यावर राय तिला म्हणाले, ‘‘मी आता ‘अभिजान’ सिनेमाच्या शूटिंगसाठी जातो आहे. काही दिवसांनी मी तुला निरोप पाठवीन.’’ तिला या प्रकारचे बोलणे ऐकण्याचा अनुभव होता. अनेक दिग्दर्शक तोंडावर नकार देत नसत. ‘‘पुन्हा केव्हा भेटू?’’ असे विचारल्यावर ते म्हणत, ‘‘मी तुला फोन करीन ना!’’

पण राय हे सामान्य दिग्दर्शकांसारखे नव्हतेच. एके दिवशी त्यांनी माधवीला पुन्हा बोलावून घेतले आणि ‘महानगर’ची पटकथा तिच्या हाती ठेवत ते म्हणाले, ‘‘या चित्रपटातील नायिकेची भूमिका मी तुला देत आहे. सध्या तू ही पटकथा काळजीपूर्वक वाच. चित्रीकरण जेव्हा सुरू होईल तेव्हा मी तुला कळवेन.’’ माधवी चकितच झाली. काही दिवसांपूर्वीची एक आठवण तिच्या मनात जागी झाली.

काही दिवसांपूर्वी तिला आणखी एक श्रेष्ठ दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्याकडून बोलावणे आले होते. घटक त्यावेळी ‘कोमल गांधार’ या नावाचा चित्रपट तयार करीत होते. त्यांनी तिला काही प्रश्न विचारले आणि चित्रपटातील नायिकेची भूमिका तिला देऊ केली. पण काही दिवसांनंतर त्यांचा विचार बदलला. ‘‘हे पाहा मुली,’’ ते म्हणाले, ‘‘मी तुला नायिकेची भूमिका देऊ शकत नाही. पण दुसरी एक महत्त्वाची भूमिका आहे- ती तू कर. मान्य?’’

‘‘मान्य नाही.’’ माधवीने ताबडतोब उत्तर दिले होते. ऋत्विक आश्चर्यचकित झाले. नवोदित अभिनेत्रीकडून एवढा स्पष्ट नकार त्यांनी अपेक्षिला नव्हता. त्यांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आपला निर्णय बदलला नाही. ‘महानगर’च्या वेळीही असे काही होईल अशी शंका माधवीला वाटत होती. पण सुदैवाने तसे काही घडले नाही. राय निर्णयाचे पक्के होते. एक उपचार म्हणून त्यांनी तिची स्क्रीन टेस्ट घेतली आणि शूटिंग सुरू झाले.

आपला अभ्यास पक्का असावा म्हणून माधवीने अनेक वेळा ती पटकथा वाचून काढली. नायिका आरतीच्या व्यक्तिमत्त्वात शिरण्याचा ती आटोकाट प्रयत्न करीत होती. तिच्या मनात काही प्रश्न होते. शूटिंग सुरू झाल्यावर ते आपण राय यांना विचारू असा तिने विचार केला होता. पण प्रत्यक्ष चित्रीकरण होताना शंका विचारण्याचे तिला कधीच धाडस झाले नाही. राय यांचा दराराच एवढा होता. खरे तर भीती वाटावी असे त्यांचे वागणे कधीच नसे. मात्र, त्यांचा धाक प्रत्येकाला वाटत असे.

‘महानगर’चे चित्रीकरण सुरू झाले आणि पहिल्याच दिवशी माधवीसमोर एक अडचण निर्माण झाली. सकाळपासून तिचा एक डोळा दुखत होता आणि त्यात मधूनमधून पाणी येत होते. तिला वाटले की सत्यजीत राय आता चिडतील. पण राय आणि त्यांचे छायाचित्रकार सुब्रतो मित्रा यांनी तिला सांभाळून घेतले. त्यांनी त्या दिवशीचे चित्रण अशा कोनातून केले, की माधवीचा पाण्याने भरलेला डोळा पडद्यावर दिसलाच नाही. माधवीचे समोरचे दोन दात काहीसे मोठे आहेत, त्यामुळे तिने दंतवैद्याकडून ते नीट करून घ्यावेत अशी सूचना राय यांनी केली. मात्र, माधवी आणि तिच्या आईने त्याला ठाम नकार दिला. रायनी त्यांचे स्वातंत्र्य मान्य केले आणि सुब्रतो मित्रांना ते दात बेढब दिसणार नाहीत अशा प्रकारे चित्रण करण्यास सांगितले. चित्रीकरणाच्या दरम्यान तिला राय यांचे वागणे जवळून पाहता आले. ते किती मोठे दिग्दर्शक आहेत हे तिला ठाऊक होते. आता तिला त्याची प्रचीती आली. माणूस म्हणूनही ते किती मोठे आहेत याचाही तिला प्रत्यय आला.

२७ सप्टेंबर १९६३ या दिवशी ‘महानगर’ प्रदíशत झाला. लोकांना हा चित्रपट आवडला. जाणकारांनी त्याची खूप स्तुती केली. माधवीच्या कामाचीही बरीच प्रशंसा झाली. देशात आणि परदेशातदेखील चित्रपटाचे चांगले स्वागत झाले. प्रसिद्ध समीक्षक रॉजर इबर्ट याने या चित्रपटातील माधवीच्या कामाबद्दल लिहिले- ‘‘ She is beautiful, deep and wonderful actress who simply surpasses all ordinary standards of judgement.’’

‘महानगर’मधील माधवीचे काम राय यांनाही अतिशय आवडले होते. ही गोल चेहऱ्याची, टपोरे, भावपूर्ण डोळे असलेली मुलगी श्रेष्ठ अभिनेत्री आहे हे त्यांच्यातील दिग्दर्शकाने जाणले. त्यामुळे ‘नष्टनीड’वर जेव्हा त्यांनी चित्रपट काढण्याचे ठरविले तेव्हा चारुलताच्या भूमिकेसाठी त्यांना दुसऱ्या कोणत्याच नावाचा विचार करावासा वाटला नाही. माधवीचे सौंदर्य हे घरंदाज आणि शालिन होते. कादंबरीदेवीसारखेच. ती या भूमिकेला न्याय देईल याची रायना खात्री होती. त्याप्रमाणे त्यांनी माधवीला बोलावून घेतले आणि तिच्या हाती ‘चारुलता’ची पटकथा ठेवली. पटकथा वाचल्यावर माधवीची खात्री झाली की, ही आयुष्यात एखाद्या वेळीच येते अशी संधी तिला मिळालेली आहे. तिने साऱ्या शक्ती एकवटून ही भूमिका जिवंत करण्याचा निश्चय केला. चित्रीकरण सुरू होण्याआधी राय यांनी या पटकथेचे वाचन केले. या वाचनाने माधवी अतिशय भारावून गेली. तिने तिच्या आठवणी ‘My Life, My Love’ या लहानशा पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत. या आठवणींत तिने लिहिले आहे- ‘Charulata’s personality, in all its emotional and psychological complexity, emerged with considerable clarity in Ray’s unique reading. It was unique in that it was not reading per se. It was a combination of reading,
directions, acting, mime and suggestions about how to incorporate, internalize, period elements of feelings, gestures, manners and customs or for that matter how to walk, move, lie down or just sit.’

राय यांच्या वाचनातून कथा जाणून घेणे हा अविस्मरणीय अनुभव होता. माधवी हळूहळू चारुलताच्या व्यक्तिमत्त्वाशी एकरूप होऊ लागली. चारुलताच बनली. चारुला अमलच्या संगतीत जसा स्वत:मधील लेखिकेचा शोध लागला तसा माधवीला स्वत:मधील अभिनेत्रीचा शोध राय यांच्या संगतीत लागला. आणि या काळातच कधीतरी तिला समजले की, ती राय यांच्या प्रेमात पडली आहे.

dw-47माधवीला धक्काच बसला. तिच्या अंतर्मनाचा कल तिला मान्य होत नव्हता. सत्यजित राय हे तिच्यापेक्षा एकवीस वर्षांनी मोठे होते. जवळजवळ दुप्पट वयाचे. ही एकवीस वर्षांची कोवळी तरुणी या अनुभवाने भांबावून गेली होती. हे प्रेम आहे, आकर्षण आहे, की आपल्याला केवळ त्यांच्याविषयी अत्यंत आदर वाटतो आहे, हे तिला समजत नव्हते. पण हळूहळू आजूबाजूच्या लोकांची कुजबुज तिच्या कानी येऊ लागली. लोक वेगवेगळे अर्थ काढीत होते. कलावंतांच्या असल्या ‘रहस्या’मध्ये लोकांना फार रस असतो. आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला खाद्य पुरवील असे बरेच काही येथे घडत होते.

‘चारुलता’चे चित्रीकरण झपाटय़ाने पार पडले. सप्टेंबर १९६४ मध्ये तो चित्रपट प्रदíशत झाला आणि त्याने साऱ्यांनाच जिंकून घेतले. ‘सत्यजित राय यांची ही सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे!’ असे या चित्रपटाविषयी म्हटले जाऊ लागले. (आजही अनेक समीक्षक तसेच मानतात.) या चित्रपटातील माधवी मुखर्जीने साकारलेली चारुलताची भूमिका ही तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम भूमिका म्हणून मानली जाते. राय यांच्या किमयेने या हिऱ्याला पलू पडले होते व तो असामान्य तेजाने चमकू लागला होता.

या भूमिकेतील अभिनयाच्या यशाचे सारे श्रेय माधवीने सत्यजित राय यांना दिले आहे. ‘मी फक्त एवढेच म्हणू शकते की, त्यांनी मला संमोहित करून माझ्याकडून ती भूमिका करवून घेतली. (He had cast a spell on me.) दिग्दर्शक आणि कलाकार यांच्यामध्ये आदर्श अशी एकरूपता घडल्याशिवाय हे शक्य नव्हते.

‘चारुलता’नंतर राय यांनी ‘कापुरुष ओ महापुरुष’ या चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली. या चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या दोन कथा सांगितल्या होत्या. त्यापकी ‘कापुरुष’ हा भाग प्रेमेंद्र मित्रा यांच्या लघुकथेवर आधारित होता. या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी राय यांनी पुन्हा माधवीचीच निवड केली. ही कथा पुन्हा एकदा दोन पुरुष आणि एक स्त्री यांच्यातील नात्याच्या त्रिकोणाचीच होती. फरक एवढाच होता की, लग्न झाल्यावर अनेक वर्षांनी भेटलेल्या आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराबद्दल आज नायिकेच्या मनात मुळीच प्रेम उरलेले नव्हते. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सारे युनिट दार्जिलिंगजवळच्या एका गावात जाऊन राहिले होते. आपल्या युनिटची काळजी घेणे हे राय यांचे कामच होते. पण ते माधवीकडे जास्तच लक्ष देत आहेत असा अर्थ काढला जाऊ लागला. आता तर अफवा पसरविणाऱ्या लोकांना अधिकच जोर चढला. पाठीमागे बोलणारे लोक आता उघड उघड बोलू लागले. अर्थात राय यांच्यासमोर बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती. पण आपले शेरे माधवीच्या कानी जातील याची दक्षता लोक घेऊ लागले. राय आणि त्यांची पत्नी विजया यांच्या संसारात माधवी विष कालवते आहे असा आरोप करण्यापर्यंत काहीजणांची मजल गेली. चित्रीकरण संपता संपता माधवीने एक निर्णय घेतला. यानंतर राय यांच्या चित्रपटात काम करावयाचे नाही. चित्रपट प्रदíशत झाला. माधवीच्या कामाची सर्वानी प्रशंसा केली. दुसरा चित्रपट तयार करण्यापूर्वी रायनी माधवीला त्यातील भूमिकेबद्दल विचारले तेव्हा तिने त्यांना सरळ नकार दिला. रायना धक्काच बसला. पण ते काही बोलले नाहीत.

* * *

राय आणि माधवी खरेच एकमेकांत गुंतले होते काय? या प्रकरणात गुंतल्या गेलेल्या तीन व्यक्तींपकी सत्यजीत राय हे तर वीस वर्षांपूर्वीच मरण पावले आहेत. उरलेल्या दोघींनी आत्मचरित्रे लिहिली आहेत. सत्यजीत राय यांनी विपुल आत्मपर आणि आठवणीवजा लेखन केलेले असले तरी त्यांनी या घटनांचा कधीही उल्लेख केलेला नाही. पण ते माधवीत गुंतले आहेत असे अनेकांना वाटत होते. अगदी त्यांच्या पत्नीलादेखील. अमेरिकेत सांताक्रूझ, कॅलिफोíनया येथे दिलीप आणि दयानि बसू या दाम्पत्याने ‘सत्यजीत राय फिल्म अँड स्टडी सेंटर’ची स्थापना केली आहे. या सेंटरतर्फे राय यांच्या चित्रपटांच्या मूळ  प्रिंट्रचे  restoration करण्याचे मोलाचे कार्य ते करीत असतात. याशिवाय राय यांची पुस्तके, त्यांच्यावरील पुस्तके, राय यांनी लिहिलेली अनेक दुर्मीळ हस्तलिखिते, त्यांनी काढलेली रेखाचित्रे यांचाही संग्रह येथे केलेला आहे. भारताबाहेर असलेले राय यांच्या संदर्भातील हे सर्वात मोठे अभ्यास केंद्र आहे. अमेरिकेत राय यांच्या चित्रपटांचे महोत्सव आयोजित करून या श्रेष्ठ कलाकृतींची ओळख अमेरिकन रसिकांना करून देण्याचे त्यांचे व्रत आहे.

१९९९ साली त्यांनी माधवी मुखर्जी हिची एक दीर्घ मुलाखत घेतली होती. या मुलाखतीचे वैशिष्टय़ म्हणजे ही मुलाखत फोनवर घेण्यात आली. बसू यांनी माधवीला प्रश्न विचारले आणि त्यांची मनमोकळी उत्तरे तिने दिली. या मुलाखतीचे पुस्तक तयार करताना तिच्या इच्छेप्रमाणे त्यांनी लेखनाला आत्मचरित्रात्मक रूप दिले. हे लेखन तिच्याकडून प्रमाणित करून घेऊन बसूंनी ते ‘My Life, My Love’ या नावाने प्रकाशित केले.

मी अमेरिकेत गेलो असताना मला या स्टडी सेंटरची माहिती मिळाली. मी त्यांना मेल पाठवून सेंटरला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. ‘मी सत्यजीत राय यांच्यावर पुस्तक लिहिले आहे,’ असे मी मेलमध्ये कळविले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बसूंचा फोन आला. त्यांनी मला अवश्य येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार मी स्टडी सेंटरला भेट दिली. त्यावेळी बसू यांनी माधवीचे पुस्तक मला भेट दिले. राय यांच्या जीवनातील या ‘अप्रसिद्ध’ प्रकरणाची माहिती मला त्यांच्याकडूनच मिळाली.

‘My Life, My Love’ या पुस्तकात माधवीने सत्यजीत राय यांच्यावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. मात्र, राय यांच्याविषयी तिला वाटणाऱ्या आकर्षणाचे स्वरूप तिने अस्पष्ट व धूसर ठेवले आहे. ‘He had cast a spell on me’ अशा सूचक शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कदाचित प्रेमाच्या साक्षात्काराच्या गूढ रहस्याचा तिलाही उलगडा झाला नसावा. तिने यासंदर्भात एके ठिकाणी लिहिले आहे : ‘प्रतिसाद न मिळालेले प्रेम हेदेखील शेवटी प्रेमच असते.’ यावरून जसा तिचा समजूतदारपणा दिसतो, तशीच तिच्या मनातील खंतही दिसते. मात्र, तिने राय यांच्याशी असलेले संबंध का तोडून टाकले, याबद्दल सविस्तर लिहिले आहे. तिच्या मते, तिने हा निर्णय घेण्याचे कारण राय यांची पत्नी विजया हे होते. हे कारण माधवीने राय यांनाही कधी बोलून दाखविले नाही. ‘He seemed disappointed however, he never tried to talk me out of my decision. That was the way Ray was : gentle, sensitive and respectful. I did not divulge to him my reason for not working with him. He might have guessed it. It was because of Mrs. Ray. If he did, dw-48he was right!’ विजया राय यांचे नाव विनाकारण बदनाम होते आहे आणि या प्रकरणात त्यांना त्रास होतो आहे, हे दिसल्यामुळेच माधवीने सत्यजीत रायसोबत ‘कापुरुष ओ महापुरुष’ चित्रपटानंतर काम न करण्याचा निर्णय घेतला.

विजया राय यांच्याबद्दल माधवीच्या मनात खूप आदर होता. ती त्यांना आदराने ‘बाऊदि’ असे म्हणत असे. चारुलताची भूमिका वठवीत असताना तिला विजया राय यांची चांगलीच मदत झाली होती. बंगाली उच्च वर्गातील खानदानी, ऐश्वर्यसंपन्न स्त्रिया साडी कशी नेसतात, प्रसाधन कसे करतात, कसे बोलतात, चालतात, हे त्यांनीच तिला शिकविले होते. ‘चारुलता’मधील झोपाळ्यावर बसून गाणे म्हणण्याचा जो प्रसंग आहे त्यात गाणे कसे म्हणायचे, कसा अभिनय करायचा, हेही त्यांनीच माधवीला शिकवले. माधवी म्हणते, ‘त्यांना दुखावणे मला शक्य नव्हते.’ (माधवीला कपडय़ावर कशिदा काढणे येत नव्हते. ‘चारुलता’च्या सुरुवातीच्या दृश्यात कशिदा काढीत असलेले तिचे हात दिसतात. हे हात प्रत्यक्षात विजयाबाईंचे होते. या चित्रपटात विजया राय एवढय़ा गुंतल्या होत्या, की तो तयार झाल्यावर सलगपणे पाहताना कुणाच्याही ध्यानात न आलेली एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्या सत्यजीतना म्हणाल्या, ‘‘चारुलता ही गर्भश्रीमंत घराची मालकीण आहे. पण चित्रपटभर ती कानात कर्णफुलांचा एकच जोड घालते, गळ्यात एकच हार घालते, हे चुकीचे आहे!’’)

मी जसजसा या त्रिकोणात गुंतत गेलो तसतसा तो मला अधिकच गूढ वाटू लागला. मला कळले की, विजया राय यांनीसुद्धा त्यांचे आत्मचरित्र ‘Manik and I’ या नावाने लिहिले आहे. भारतात आल्यावर मी ते मागवून घेतले. सुमारे ६०० पृष्ठांचे हे दीर्घ आणि तपशीलवार आत्मचरित्र आहे. प्रस्तुत लेखाच्या विषयासंदर्भात मात्र त्यात अगदीच त्रोटक नोंद आहे. ‘चारुलता’ आणि ‘कापुरुष’ तयार होत असतानाच्या दिवसांबद्दल विजया राय यांनी लिहिले आहे. त्यावरून या प्रकरणामुळे त्या बऱ्याच व्यथित झाल्या असाव्यात असे दिसते. पण जे घडले ते घडून गेले, आता त्याबद्दल ऊहापोह करण्यात काय अर्थ आहे, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र, काही गोष्टी स्पष्ट करणे त्यांनाही आवश्यक वाटते. माधवीचे नाव न घेता त्यांनी जो उल्लेख केला आहे यावरून सत्यजीत राय काही काळ तरी माधवीच्या आकर्षणात गुंतले होते असे निश्चित दिसते. त्या लिहितात :

‘१९६५ आणि १९६६ ही वष्रे माझ्यासाठी एका दु:स्वप्नासारखी होती. माणिकने (सत्यजीत यांचे घरातील नाव) मला खूप दुखावले. माझा नवरा हा काही संत नव्हता. रक्तामांसाचा तो एक जिवंत माणूस होता. आणि अनेक पुरुषांप्रमाणे तोदेखील दुसऱ्या स्त्रीच्या नात्यात गुंतला होता.

dw-49‘एखाद्या दुर्दैवी अपघातासारखे हे प्रकरण सुदैवाने अल्पजीवी ठरले. आम्ही यानंतर पुन्हा एकमेकांजवळ येण्याचा प्रयत्न केला व त्यात यशस्वी झालो. त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी मला खूप आनंद दिला. त्यामुळे त्या आठवणी पुन्हा उगाळणे योग्य नव्हे. ते नेहमी म्हणत, ‘शेवटी सारे चांगलेच होईल.’ त्यांच्या उक्तीप्रमाणेच सारे घडले. या घटनेनंतर त्यांनी कधीही दुसऱ्या स्त्रीकडे अशा नजरेने पाहिले नाही. एखाद्या राणीसारखे मला वागविले. पण त्या काळात मी ज्या वेदना सहन केल्या त्यांचे वर्णन मी करू शकत नाही.’

एवढेच लिहून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला आहे. मात्र यावरून काही गोष्टी स्पष्ट होतात. राय हे काही काळ तरी माधवीच्या आकर्षणात गुंतले होते आणि त्याच्या वेदना विजयाबाईंना होत होत्या. या वेदना माधवीलाही दिसल्या होत्या. एक संवेदनशील स्त्री असल्यामुळे ती दुसऱ्या स्त्रीचे दु:ख केवळ अलिप्तपणे पाहू शकत नव्हती. विशेषत: तिला हे दु:ख आपल्यामुळे होते आहे हे जेव्हा माधवीच्या ध्यानात आले तेव्हा आपण होऊन ती सत्यजीत राय यांच्यापासून दूर गेली. मात्र, हे सहजासहजी झाले नाही. याची मोठी किंमत तिला द्यावी लागली. एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे कर्तव्य या झगडय़ाचा तिच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. तिला औदासिन्य आले. एके दिवशी रात्री तिने झोपेच्या शंभरेक गोळ्या घेतल्या. तिला तातडीने दवाखान्यात न्यावे लागले. ती जगेल की नाही याची डॉक्टरांना शाश्वती नव्हती. dw-50पण ती जगली. ती लिहिते, ‘यानंतर राय यांच्या चित्रपटात काम करावयाचे नाही, हा माझा निर्णय अधिकच पक्का बनला.’

माधवीने त्यानंतर रायबरोबर काम केले नाही. इतकेच नव्हे तर त्यांना भेटणेही तिने टाळले. बíलन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘चारुलता’ व ‘महानगर’ दाखविण्यात येणार होते. या महोत्सवाचे राय आणि माधवीलाही निमंत्रण आले होते. माधवी गेली नाही. राय यांच्या प्रत्येक नव्या चित्रपटाच्या पहिल्या खेळाला ते माधवीला निमंत्रण पाठवीत. पण माधवी कधीच गेली नाही. अपवाद फक्त दोन प्रसंगांचा : माधवीने ज्यावेळी लग्न केले त्यावेळी आपल्या विवाहाची पत्रिका देण्यासाठी ती स्वत: राय यांच्या घरी गेली होती. त्यानिमित्ताने आयोजित समारंभाला सत्यजीत आणि विजया राय दोघेही उपस्थित राहिले होते. दुसरा प्रसंग- राय यांच्या ‘आगंतुक’ या शेवटच्या (ठरलेल्या) चित्रपटाच्या पहिल्या खेळाचे निमंत्रण आल्यावर ती आवर्जून त्याला गेली होती. राय यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. तशाही स्थितीत त्यांनी तो चित्रपट पूर्ण केला होता. माधवीला हे ठाऊक होते. ती गेली आणि तो चित्रपट पाहताना तिच्या डोळ्यात पाणी आले. यानंतर काही महिन्यांतच राय यांचा मृत्यू झाला. आपली ही शेवटचीच भेट आहे असे माधवीच्या अंतर्मनाला जाणवले असेल काय?

माधवीला सत्यजीत राय यांच्याशी संबंध तोडल्याची खरी सजा वेगळीच मिळाली. या तीन चित्रपटांनी तिला जगातील मान्यवर अभिनेत्रींत स्थान मिळाले होते. यानंतर या तोडीचे चित्रपट तिला मिळाले नाहीत. पुढील तीस वर्षांत तिने सुमारे नव्वद चित्रपटांत काम केले, पण तीन-चार वगळता बहुतेक चित्रपट सामान्य दर्जाचे आणि गल्लाभरू होते. तिच्या अभिनयाचा कस लागेल अशी एखाद् दुसरीच भूमिका तिला मिळाली. सत्यजीत राय यांच्याबरोबर ती काम करीत राहिली असती तर..

पण आयुष्यात अशा ‘जर-तर’ला काहीच अर्थ नसतो.
विजय पाडळकर

First Published on February 8, 2016 12:02 pm

Web Title: satyajit ray charulata
टॅग Satyajit Ray