लोकसत्ता दिवाळी अंक २०१७

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमिताभ बच्चन यांचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर मी असं म्हणेन की, जाणिवा जिवंत असलेला कलाकार आहे तो. आणि तुमच्या जाणिवा जर जिवंत असतील, तर तुम्हाला मरण नाही. समाजात अशी अनेक माणसं असतात, की जी भूतकाळात जगत असतात. पण अमिताभ हा वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार करून जगणारा माणूस आहे.

देशाच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचा परिणाम हा लेखकांवर होत असतो, कवींवर होत असतो.. तसं पाहिलं तर सगळ्यांवरच होत असतो आणि मग त्याचे पडसाद चित्रपट, नाटक, कविता यांत उमटत असतात.

माझ्या वाचनात आणि पाहण्यात आले त्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतरचा साधारणपणे १५ वर्षांचा काळ नेहरूंचा होता. नव्याने स्वातंत्र्य मिळाल्यामुळे सर्वत्र भारावलेपण होतं आणि स्वप्नाळूपणा होता. तोच स्वप्नाळूपणा नाटक, सिनेमा, साहित्यात दिसत होता. उदाहरणार्थ, सिनेमात नायक-नायिका बागेत एकत्र आले की दोन गुलाब एकमेकांच्या जवळ आले असं दाखवलं जायचं.  त्या वेळचे नायक, त्या वेळची गाणी तशीच होती. आणि आई हा भाग तर त्यात असायचाच. पण त्या वेळचा आईला संबोधण्याचा, तिची भूमिका दाखविण्याचा भाग आज जसं दाखवला जातो त्यापेक्षा वेगळा होता.

१०६० नंतर गोष्टी झपाटय़ाने बदलू लागल्या. भारत-चीन युद्ध झालं, नेहरू आणि त्यांच्यापोठोपाठ लालबहाद्दूर शास्त्रींचं निधन झालं आणि मग ६६ साली इंदिरा गांधींचा राजकीय पटलावर उदय झाला. तोपर्यंत स्वतंत्र भारताच्या स्वप्नाळूपणाबाबत लोकांचा भ्रमनिरास व्हायला सुरुवात झाली होती. परंतु त्यांना पर्याय दिसत नव्हता. पण एक संताप तयार होत होता, तो व्यक्त करण्याची साधनं ही साधारणपणे साहित्यामध्ये होती. कवींच्या लेखणीत होती. पत्रकारितेत यायला लागली होती. त्याच ६६ नंतरच्या काळात भारतामध्ये प्रादेशिक शक्ती उदयाला येऊ लागल्या होत्या. एक बंडखोरी या पातळीवर ते सगळं वर येणं सुरू झालं होतं.. काँग्रेसच्या विरोधात. तोपर्यंत लेखकांचा, कवींचा ‘टोन’ बदलायला लागला होता.

अशा वेळी ‘ज्याचे’ दहा-बारा चित्रपट सलग ओळीने पडले आहेत अशा एका अभिनेत्याला- फक्त त्यातल्या ‘आनंद’ या चित्रपटातल्या बाबू मोशायचा एक इसेन्स (अर्क) पाहून, सलीम-जावेद जोडीने त्याला ‘जंजीर’ नावाचा चित्रपट दिला. खरं तर तो शेवटचा पर्याय होता. त्या वेळेला देव आनंद वगरे सगळे मोठे नायक होते. राजेश खन्ना होता. परंतु या जोडगोळीचं एक ठाम मत होतं, की ’हा’ याला न्याय देऊ शकेल. कारण याच्या व्यक्तिमत्त्वात एक संताप आहे. ते वाक्य पाहा- ‘जब तक बैठने को ना कहां न जाय शराफत से खडे रहो. ये पुलीस स्टेशन है. तुम्हारे बाप का घर नही.’ असं वाक्य भारतीय प्रेक्षकांनी याआधी कधी ऐकलं नव्हतं. तो काळ जर तुम्ही पाहिलात तर तो बंडखोरीचा होता. त्यामुळेच सगळं प्रकरण पिताजीवरून बापावर आलं होतं. एखाद्याचा बाप काढणे हा प्रकार पडद्यावर नव्हता. हे जे स्थित्यंतर आहे ते समाजकारणातलं आहे, राजकारणातलं आहे.

आपल्या देशाची एकूणच जडणघडण जशी बदलत गेली- त्याला एका अर्थाने घडी विस्कटणं म्हणू या- पण ती बदलत असताना, तो बदल एका लेखक जोडगोळीला- खासकरून जावेद साहेबांना दिसला आणि त्याचं त्यांनी शब्दांत रूपांतर केलं.. ‘‘ये तुम्हारे बाप का घर नही,’’ असं थेट संवाद बोलणारा नायक तुम्ही डोळ्यांसमोर आणा, की हेच वाक्य देव आनंदच्या तोंडी आहे किंवा राजेश खन्नाच्या तोंडी आहे.. पटणारच नाही ते.

आपण नेहमी म्हणतो, की लता मंगेशकरांनी भारताचं संगीत बदललं. म्हणजे असं पाहा, साधारणपणे मुस्लीम घराण्यांचा एक आवाज होता.. त्यात शमशाद बेगम असतील किंवा नूरजहाँ असतील.. आज तुम्ही विचार करून बघा, की ‘तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा’ हे गाणं शमशाद बेगम किंवा नूरजहाँच्या आवाजात आहे. पचतच नाही ते. जशी लता मंगेशकरांनी संगीत नावाची गोष्ट बदलली किंवा त्याचा ‘टोन’ बदलला, तसा अमिताभ बच्चन यांनी इंडस्ट्रीतला ‘टोन’ बदलला,  तिचा आकृतिबंध बदलला.

मला वाटतं, ‘जंजीर’ हा एक असा क्रांतिकारी चित्रपट आहे, की ज्यात समाजाचं अख्ख प्रतििबब एका भूमिकेत उतरलं आणि त्यांनी ते निभावलं. एखादी गोष्ट तात्पुरती असते, एखादी कालातीत असते. मला वाटतं, बच्चननी ज्या गोष्टी निर्माण केल्या त्या कालातीत आहेत. आता त्याच जोडगोळीचं म्हणजे सलीम-जावेद यांचं पाहा.

साधारणत: ७९च्या काळात गिरणी संप झाला. त्यातून सव्वा लाख गिरणी कामगार उद्ध्वस्त झाले. घरंदारं उद्ध्वस्त झाली. त्या गिरणी कामगारांची काही मुलं पोलिसांत गेली, तर काही गुन्हेगारीच्या वळणाला लागली. आणि त्याच काळात मोठय़ा प्रमाणावर गँगस्टरिझम- टोळ्यांची गुंडगिरी- सुरू झाली आणि त्याला एक वलय निर्माण झालं.  याही काळाचं प्रतििबब दाखविणारे पुन्हा जावेदसाहेबच आहेत. त्यांचा ‘अर्जुन’ नावाचा एक चित्रपट होता. तो एका गिरणी कामगाराच्या मुलाचा. त्या वेळी एक नवी गोष्ट घडली आपल्यासमोर. म्हणजे त्या सिनेमात एक गाणं होतं. त्यातील काही शब्द सोडा. ते विनोदीही वाटू शकतात, की ‘ममय्या केरोकेरो केरो मम्मा.’ पण त्यानंतर येणाऱ्या ओळी महत्त्वाच्या आहेत- ‘दुनिया माने बुरा तो गोली मारो.’

नंतर मग गुंड पकडले जाणे,  त्यांना तुरुंगात पाठवणे, टोळीयुद्धात मारले जाणे,  त्यांचा एन्काउंटर होणे..  अनेक गोष्टी घडत गेल्या. ते वलयही संपले आणि तो अध्यायही समाप्त झाला. ‘अर्जुन’ हा चित्रपट आल्यावर बऱ्याच काळानंतर  मी जावेदसाहेबांना फोन केला होता. म्हटलं, की ‘तुमच्यातला कवी सामाजिकदृष्टय़ा कसा जागा आहे ते मला आज कळलं. कारण आज मी एक चित्रपट पाहून आलो तुमचा. ज्याचं दिग्दर्शन तुमच्या मुलानं केलंय, परंतु गाणी तुम्ही लिहिली आहेत.’ या ‘दिल चाहता है’ चित्रपटातील गाणी लिहिणारे पुन्हा जावेद अख्तरच आहेत. त्यातलं एक गाणं होतं- ‘कोई कहे कहता रहे.. हम लोगों की ठोकर में हैं जमाना.’ त्या ‘ठोकर में’चा अर्थच ‘फxx यू’ असा आहे. जसे कवी म्हणून जावेद साहेब काळानरूप असे बदलत गेले, तसेच काळानुरूप बदलत गेले अमिताभ बच्चन! नंतर जरी बच्चन यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या असल्या तरी ‘सिंघम’ सारखा चित्रपट पाहिला की वाटतं, इथे बच्चन पाहिजे होता. वय हे सतत तेच ठेवणं तुमच्या हातात नाहये, पण बच्चन यांची ही खासियत आहे. ही बंडखोरीची जी गोष्ट आहे, तीच बच्चन यांची ताकद आहे!

बच्चन यांची ताकद अशा बऱ्याच प्रकारची आहे. बच्चन यांचा सर्वात मोठा जो गुण आहे तो म्हणजे हा अभ्यास करून काम करणारा माणूस आहे. समोर कोणी काही तरी संवाद लिहिलेत, म्हणून जाऊन काही तरी बरळायचं, असं त्यांचं नाही. मला कोणाला कमी लेखायचं नाही. धर्मेद्र, जितेंद्र यांचाही एक खूप मोठा काळ आहे. अमिताभच्या आधी इतका अभ्यास करून काम करणारे नट आहेत तरी कोण? अमिताभच्या काळातच संजीवकुमार होते. किंवा त्याआधी तुम्हाला दिलीपकुमार दिसतील, बलराज साहनी दिसतील, मोतीलाल दिसतील… ते पाहिलं की तुमच्या लक्षात येईल, की हेही भूमिकेचा अभ्यास करत. भूमिका पचवून साकार करणं कशाला म्हणतात! ते त्या सर्वानी केलंय. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, की दरवेळेला आई मरणं आणि दरवेळेला आईसाठी रडणं, हे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवीत राहणं, हे साधंसोपं काम नाहीये.

प्रत्येक वेळेला त्याच प्रकारचे संवाद, पण वेगळ्या पद्धतीने म्हणणं याला एक अभ्यासच  लागतो ना? ते समजून-उमजून ती गोष्ट करणं ही अमिताभ यांची खासीयत आहे. म्हणूनच आजही आजच्या सुपरस्टार्सना तुम्ही विचारलं, की अमिताभ बच्चन यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, तर ते हेच सांगतील, की अमिताभ बच्चन यांच्या ताकदीचा अभिनेता झाला नाही. आपण कोणत्याही गोष्टीला ‘फिल्मी’ म्हणतो. पण ते इतकं सोपं नाहीये.

एके दिवशी माझ्या घरी शाहरूख खान आला होता. आम्ही बोलत बसलो होतो. त्या वेळेला त्याचा कुठला तरी चित्रपट येत होता. तो मला तो लॅपटॉपवर दाखवत होता. असा तास-दीड तास झाला आणि मध्येच तो अचानक उठला. म्हणाला,  ‘राज, मला निघायला हवं. मला सेटवर जायचंय.’ म्हटलं, ‘अरे काय झालं?’ तर तो म्हणाला, ‘माझं शूटिंग चालू आहे.’ ‘मोहब्बते’चं शूटिंग चालू होतं तेव्हा. म्हणाला, ‘‘काही नाही, पण बच्चनसाहेब पोहोचले असतील तिथं. वेगळाच माणूस आहे तो. मी पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर काम करतोय.’’ म्हटलं, ‘का, काय झालं?’ तर तो सांगू लागला, की एका आठवडय़ापूर्वी आमच्या दोघांमधला एक सीन होता. त्यात बोलता बोलता मी काही तरी दोन-तीन वेगळे संवाद म्हटले. गोषवारा तोच, पण प्रत्यक्ष संवाद वेगळे होते. ते ऐकल्यावर अमिताभ थांबले. ‘कट’ करायला सांगितलं आणि अमिताभनी विचारलं, ‘तू अ‍ॅडिशन घेतलीय की तू विसरलायस?’ तो म्हणाला, ‘माझे संवादसुद्धा त्यांना पाठ होते! समोरचा काय अभिनय करेल, त्याचे काय संवाद आहेत, ते कशा पद्धतीने येऊ शकतात समोर, हे ओळखून काम करणे ही गोष्ट मला वाटतं खूप महत्त्वाची आहे. अभ्यास आहे त्यात.’

‘शक्ती’मध्येसुद्धा एक वडिलांचा आणि मुलाचा सीन आहे. अमिताभ त्या सीनच्या संवादांची तालीम करीत होते. एकटेच. तर तिथे बाहेर काही तरी गोंगाट सुरू होता. तर दिलीपकुमार ओरडले त्या लोकांवर, की त्याला काम करू देत. हे दिलीपकुमारांनी सांगितलंय. ही काही ‘मायापुरी’तली गोष्ट नाही. जीव ओतून अभिनय करणं, त्याची तयारी करणं हे काय असतं हे दिलीपकुमारांना माहिती होतं. काम करायचं म्हणून एखादं काम करणं यापेक्षा मी अभिनय असा करेन- जो आयुष्यभर प्रेक्षकांच्या लक्षात राहील या ऊर्जेने काम करणं, ही गोष्ट अमिताभ यांच्याकडून शिकली पाहिजे.

परवा मी एकाला सांगत होतो लता मंगेशकरांच्या संदर्भात, की परमेश्वराने ज्यांना जन्म दिलेला असतो ना, त्यांच्या वाटय़ाला जायचं नसतं. आई-वडिलांनी ज्यांना जन्म दिलेला असतो, त्यांच्याच वाटय़ाला जायचं असतं. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, आशा भोसले ही परमेश्वराने दिलेली माणसे.. जरी ते आई-वडलांचं नाव घेत असले तरी! ही परमेश्वराचीच माणसं. अशी माणसं सारखी सारखी जन्माला येत नसतात. त्यांची गुणवत्तेची पातळी नेहमीच वर राहते. याच्यात साधनेचा भाग असतो, की मला काहीतरी नवं दिलं पाहिजे हा ध्यास?  मी आज जे करतो ते चालतं आहे म्हणून मला तेच द्यायचं आहे असं नाही होऊ शकत. आजही तुम्ही त्या माणसातली ऊर्जा पाहा.. पंच्याहत्तराव्या वर्षी तो माणूस ज्या प्रकारची एनर्जी ओततोय ते पाहा आणि आपल्या समाजातील त्याच वयाची माणसे पाहा.. मग समजेल ते.

आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे संस्कार. अमिताभ ज्या वेळेला िहदी बोलतात, तेव्हा ते िहदीच बोलतात. आणि ते त्यांचं िहदी कृत्रिम नसतं. गोड असतं ते. तेच अमिताभ जेव्हा इंग्रजी बोलतात, तेव्हा असं वाटतं की, हा माणूस परदेशात शिकून आलाय. आणि कसं असतं, मूल जन्माला येतं त्याला आपण ‘डिलिव्हरी’ म्हणतो आणि शब्द बाहेर येताना त्यालाही आपण ‘डिलिव्हरीच’ म्हणतो. एवढं कठीण असतं ते. ती संवादाची ‘डिलिव्हरी’ कशी असली पाहिजे याचा विचार करणं, विचार करून कॅमेऱ्यासमोर जाणं, हे अमिताभ यांच्यात आहे.

अनेक चित्रपटांत त्यांची भूमिका कविमनाची दाखवलीय.  ‘कभी कभी’ घ्या, ‘आलाप’ घ्या किंवा ‘सिलसिला’ मधला कवीमनाचा नायक घ्या..  तुम्ही त्यांना कवी म्हणून घेतलं, तर कवी म्हणूनही पटतात. ‘बागबान’मधला लेखक म्हणून घेतलं, तर लेखक म्हणूनही मनाला भावतात. भाषेवर, संवादफेकीवर, कामावर प्रभुत्व असणे हे साधेसोपे काम नव्हे. म्हणजे बघा, समजा आज तुम्ही काव्यवाचनाच्या एखाद्या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन यांना देशभरातल्या सगळ्या कवींना बोलावलं, तर तिथं तुमच्या लक्षात येईल की कविता वाचावी कशी, तर ती वाचावी अशी.. अमिताभ यांच्यासारखी. हे काय आहे? आपण म्हणतो की लतादीदी मोठय़ा, किशोरकुमार मोठे, आशाताई मोठय़ा.. का म्हणतो त्यांना आपण मोठे? तर त्यांच्या गाण्यात एक्स्प्रेशन्स आहेत, अभिव्यक्ती आहे. ती अभिव्यक्ती नटांना आणि नटय़ांना उपयोगी ठरते. ते अमिताभ यांच्यात उपजत आहे. त्यांनी गायलेली गाणी पाहा. तो एक वेगळाच टोन आहे. गायचे प्रयत्न तसे अनेक कलाकारांनी केले. पण समजूनउमजून गाणे, आपली मर्यादा ओळखणे, हे अमिताभ यांच्यात होतं. म्हणजे- आता बघा मी किशोरकुमारलाच आव्हान देतो, असा कुठं आव नाहीये त्यात. त्यांच्या मर्यादा ओळखून त्यांनी गायलेली ती गाणी आहेत. सहज, साधी, सरळ, सोपी. आता हे कुठून येतं, असं तुम्ही म्हणाल; तर त्यांचा तो आवाज!  उदाहरणार्थ- लता मंगेशकर!  त्यांचं एक मोठेपण हे आहे, की त्यांचा बोलण्याचा आणि गाण्याचा आवाज एकच आहे. दुसरं उदाहरण किशोर कुमार. यांचाही बोलण्याचा आणि गाण्याचा आवाज एक आहे. आज मी तुम्हाला असे अनेक गायक दाखवीन, की ज्यांचा बोलण्याचा आवाज वेगळा आहे आणि गाण्याचा आवाज वेगळा आहे. दिली आवाज काढत नाहीत, तो आवाज आहे त्यांचा. या सगळ्या गोष्टींसाठी एक परमेश्वरी कृपा लागते. ती कृपा मागून होत नाही, ती असावी लागते आणि हे सगळे जण ही परमेश्वराची कृपा आहे.

हे खरंच आहे, की चित्रपटात दिग्दर्शकाचा खूप मोठा वाटा असतो. शेवटी चित्रपट हेसुद्धा एक ‘पॅकेज’च आहे. ते काही एकटय़ादुकटय़ाचं काम नाही. पण अमिताभ बच्चन यांचे- वैदर्भीय भाषेत सांगायचं झालं तर- असे अनेक फोकनाड चित्रपट आहेत, की जे अमिताभ यांनी स्वत:च्या खांद्यावर नेऊन यशस्वी करून दाखवले आहेत. तिथं तुम्ही दुसरा नट आणा आणि सांगा, की बाळा, हे आपल्याला जरा इतके इतके मल न्यायचंय.. शक्य आहे का? गुरुवारीच पडतील ते. शुक्रवारदेखील पाहणार नाहीत. आणि आज तांत्रिकदृष्टय़ा ही इंडस्ट्री कितीतरी पुढं गेलेली आहे. पण तांत्रिकदृष्टय़ा तुम्ही कितीही भक्कम झाला असलात, तरी नवीन जे तरुण येताहेत त्यांच्याकडून ते तंत्र समजून घेऊन परत त्याच तडफेने उभं राहणं हे येरागबाळ्याचं काम नाही. आज अमिताभ बच्चनांच्या बरोबरीचे किंवा थोडेसे छोटे, थोडेसे मोठे असे सगळे नट काढा ना, कुठे आहेत ते आत्ता?  ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना अमिताभ बच्चन यांनाच घ्यावंसं का वाटलं? का नाही धर्मेद्र, का नाही जितेंद्र किंवा त्या वेळचे जे स्टार होते ते?.. बरं, तीच गोष्ट शाहरूखने करून पाहिली ना? त्याच्यावरची एक चित्रफीत यूटय़ूबवर आहे. त्यात अमिताभ यांच्या समोर शाहरूख बसलाय. त्यात शाहरूखने जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त केली, की माझी चूक झाली. मी त्या आसनावर बसायला नको होतं. आता त्या कार्यक्रमातला त्यांचा तो जो वावर आहे, ‘परफॉर्मन्स’ आहे, की आलेल्या पाहुण्याला कसं आणायचं, महिलांशी कसं वागायचं, कुणाशी कसं बोलायचं, कुठपर्यंत बोलायचं.. पाहण्यासारखं आहे ते. आता ही गोष्ट कुठून येते, की कुठपर्यंत जावं? त्या मर्यादा ओळखणं हा संस्काराचा भाग आहे. तसे खेळणारे खूप असतात. पण तेंडुलकर एकच होतो ना? याची कारणं काय? सूक्ष्म असतात, अलिप्त असतात, अदृश्य असतात, परंतु असतात ते संस्कार. आज मी तुझ्यावर संस्कार करीत आहे असं काही नसतं जगात. ती सगळी गोष्ट अदृश्य असते. ती पाहिलीत तरच तुम्हाला ती दृश्य स्वरूपात दिसते.

शिवाय कोणाचे संस्कार घ्यावेत हे पण तुम्हाला कळलं पाहिजे ना? वास्तववादी मोकळा असा अभिनय करणारा पहिला माणूस कोणी चित्रपटसृष्टीत असेल, तर तो मोतीलाल. त्यांच्यानंतर बलराज साहनी. काम करताना कळतच नाही हो, की हे काम करत आहेत. तीच गोष्ट दिलीपकुमारांची. मी जेव्हा राजकारणात आलो, तेव्हा अनेक लोक म्हणायचे की हा बाळासाहेबांची कॉपी करतो. त्यांना हे कळायचंच नाही, की ही कॉपी नव्हे; याला संस्कार म्हणतात. तेच संस्कार पुढे घेऊन मग तुमची एक शैली बनत जाते. असं प्रत्येक वेळेला घडत असतं. परंतु तुमच्यावर संस्कार घडत असताना, ते देणारा माणूस हा योग्य असावा लागतो. त्या वेळेला असलेले दिलीपकुमार, राज कपूर किंवा देव आनंद, यांच्यातून अमिताभ दिलीपकुमार यांच्याकडे का आकर्षित झाले? मी बच्चनांचे असे अनेक संवाद दाखवीन, की जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की अरे, हे दिलीपकुमारांसारखं! पण तो संस्कारांचा भाग आहे. हा कॉपीचा भाग नसतो. अमिताभ बच्चन यांनी दिलीपकुमार यांचे चित्रपट शंभर शंभर वेळा पाहिले असतील चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर. तेव्हा तो संस्कार तुमच्यावर होत असतो. तो प्रभाव पडत असतो. त्यातून तुम्ही घडत असता आणि मग त्यातून तुमचं नवीन काही तरी घडत असतं.

आता प्रश्न असा येतो, की मग दिग्दर्शकाचं काय काम? अमिताभ नेहमी सांगतात, की एकदा मी स्वत:ला दिग्दर्शकाच्या हातात दिलं, की मग मी माझा नसतो. तो सांगेल ते करायचं. पण अमिताभ यांनी जे केलं, ते आजही नाही करता येत ना लोकांना! आज कुणीही- अगदी कुणीही- अँथनी गोन्साल्विस करून दाखवावा! एका मुलाखतीत अमिताभनी फार छान शब्द वापरलाय मनमोहन देसाईंबद्दल- ‘ही वॉज अ मॅड जीनियस’!  या मुलाखतीत अमिताभ सांगतात, ‘ज्या वेळी ‘अमर अकबर अँथनी’ करत होतो, त्या वेळी मी त्यांना अनेकदा विचारायचो की, हे तुम्ही काय करताय? पण ते म्हणायचे ‘तुम कुछ मत बोलो.’

आणि पुढं जेव्हा तो चित्रपट प्रदíशत झाला. ‘ब्लॉकबस्टर’ झाला. त्यानंतर मी त्यांना विचारायचं बंद केलं. मग त्यांनी सांगितलं, की हे करायचं; की मी ते करत गेलो.’ या मनमोहन देसाईंनी एका वर्षांत – १९७७ सालात – चार प्रचंड यशस्वी चित्रपट दिले होते. ‘अमर अकबर अँथनी’, ‘धरमवीर’, ‘चाचा भतीजा’ आणि ‘परवरिश’! त्यातले दोन- धरमवीर, चाचा भतीजा- धर्मेद्रचे. दोन अमिताभचे. त्या त्या वेळी, त्या स्पध्रेत टिकून राहणं, हेही महत्त्वाचं आहेच.

मग कोणी म्हणो, की अमिताभनं तेच तेच केलं, वेगळं काही केलंच नाही.. वगरे. पण शेवटी एक गोष्ट आहेच ना, की समाज काय स्वीकारतो! आणि वेगळंही केलंच ना. अमिताभनी ‘आलाप’ केला. ‘जुर्माना’ केला. तो पडला. पण त्याआधी ‘मिली’ केला. ‘मिली’तला अमिताभचा अभिनय तर मुद्दाम पाहण्यासारखा आहे. इथेही त्यांची भूमिका संतप्त युवकाचीच आहे. पण तोही चालला नाही फार. म्हणजे प्रयोग केले नाहीत अमिताभनी असं नाहीये. परंतु ते चालले नाहीत फार. ‘बेमिसाल’ हासुद्धा एक प्रयोग होता. त्यात तर डॉक्टरची भूमिका होती. ‘पा’ आणि ‘पिकू’ आत्ताचे. तेवढय़ा काळात समाज बदलत गेला. प्रयोगही स्वीकारायला लागला, त्याचा प्रेक्षक तयार झाला. त्यामुळे हे नेहमीचे आक्षेप काही खरे नाहीत. आणि मधल्या काळात अमिताभनी स्वत:ची कंपनी (एबीसीएल) काढली. ती आíथकदृष्टय़ा डबघाईला आली वगरे आपल्याला माहितेय. पण स्वत:ची कंपनी काढण्यामागचं कारणही तेच असेल ना.. की मला काही वेगळं करायचंय, वेगळं दाखवायचंय. ही अशी माणसं, वेगळं काही करायला धजावत नाहीत अशातला भाग नसतो.  त्या त्या वेळेला वेगळेपण दिसतंच.  ‘म आझाद हूँ’ नावाचा चित्रपट केलाय अमिताभनं. त्यात एकही मारामारी नाही. त्याचा शेवट तर अमिताभ आत्महत्या करतो असा आहे. त्याचा जो मूळ चित्रपट आहे, त्याचं नाव होतं ‘मीट जॉन डो’. पण िहदीत अमिताभचा नाही चालला चित्रपट.  प्रत्येक व्यक्तीची एक इमेजसुद्धा असतेच, की लोकांना काय बघायला आवडेल. याउलट इंग्रजीत एकच अभिनेता कधी नायक, कधी खलनायकसुद्धा असं चालतं. कारण इंग्रजी चित्रपट पाहणारा जो समाज जगभर आहे, त्यांचा दृष्टिकोन आणि भारतीय समाजमन या जणू काही दोन धृवांवरच्या दोन गोष्टी आहेत. ‘माँ’ या गोष्टीवर िहदी किंवा भारतीय चित्रपट चालतात, तसे हॉलीवूडचे कुठे चालतात? पण आपला प्रेक्षक आता बदलत चालला आहे. नवीन सिनेमा तर आहेच, पण याचं मोठं श्रेय मी टीव्ही वाहिन्यांना आणि इंटरनेटला देतो. शेवटी तुम्हाला, स्वत: म्हणून ज्या वेळेला ‘एक्स्पोजर’ मिळायला लागतं, त्या वेळी तुमच्या अपेक्षाही वाढायला लागतात. पूर्वी परदेशी जाताना नातेवाईक वगरे विमानतळावर सोडायला जायचे, हार घालायचे, जाणाऱ्याचा अगदी शेवटपर्यंत थांबून निरोप घ्यायचे, असा एक काळ होता. तेव्हा परदेशातनं कोणी आला की तो ‘फा’ किंवा ‘कॅमे’ नावाचा साबण आणायचा. ते साबण दिले जायचे आणि ज्यांना मिळाले ते तर साबण तसाच ठेवून फक्त दिवाळीला तो काढायचे. आता को-णी-ही जातं परदेशी. त्याही आधी तिथली सारी प्रॉडक्ट्स इथे मिळायला लागली. लोक परदेशी जायला लागले आणि मग तुलनेचा काळ सुरू झाला.  मग त्यांच्याकडे बघा,  त्यांच्याकडचे रस्ते बघा. मग आपल्याकडचे रस्ते बघा, असं सुरू झालं. तेव्हाही आपल्याकडचे रस्ते असेच होते, जे आजही आहेत. पण लोकांना या गोष्टी कळायला लागल्या. आज आपण म्हणतोय की अमिताभ बच्चन असा का नाही वागला. पण तेव्हाचं समाजमन जे होतं, त्या समाजमनाप्रमाणे तो वागला. आताचं जे समाजमन आहे त्याप्रमाणे तो आज वागतोय. पण इतर कोणतेही त्या वयातले किंवा त्या काळातले अभिनेते तसे वागायला तयार नाहीयेत. किंवा त्यांना ते झेपत नाहीये. त्याने पुढे ‘ब्लॅक’ किंवा ‘पा’सारखे प्रयोगही केले. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की त्याच्या मनात नसतं तर हेही केलं नसतं त्यानं. इच्छा नव्हती अशातला भाग नाही. पण समोर तशा पटकथापण यायला लागतात,  तसे लेखकसुद्धा लागतात. लोक म्हणतात,  की त्याने ओम पुरी, नसरूद्दीन शाह यांच्यासारखे चित्रपट का नाही केले?  तर नसतील केले. पण याचा अर्थ त्यांना प्रयोग करायचे नव्हते असा नाही होत. कदाचित त्या कथा रुचल्या नसतील त्यांना. कदाचित त्यांच्याकडे तसे लोक गेले नसतील. आपल्याला काही कल्पना नाहीये. परंतु प्रयोग करायचे नसते तर त्यांनी हेही चित्रपट केले नसते. ‘पिकू’सारखा चित्रपट बघा. एक बद्धकोष्ठतेवरचा चित्रपट त्यांनी केलाय.

मध्यंतरी मी एक फार छान पुस्तक वाचलं होतं. त्याचं नाव होतं- अमिताभ.  सौम्य बंडोपाध्याय या पत्रकाराचं पुस्तक आहे ते. त्याची सुरुवात फार छान आहे. त्यांनी असं लिहिलंय – ‘माझी आणि  त्यांची तशी फारशी ओळख नव्हती. ते जेव्हा खासदार झाले, त्या वेळी आम्ही लोकसभेतील पत्रकारांच्या कक्षेत बसायचो. नजरानजर व्हायची, इथपर्यंतच परिचय. एकेदिवशी त्यांचा, बहुधा अलाहाबादला कार्यक्रम होता. तिथं आम्हा पत्रकारांना घेऊन जायचं ठरवलं. तेव्हा पहिल्यांदा त्यांची-माझी भेट झाली. तेव्हा पहिल्यांदा मला कळलं ‘वलय काय असतं ते.’  बंडोपाध्याय यांनी त्याबाबत एक उदाहरण दिलं होतं त्यात. फ्रँक सिनात्राचं. ‘त्याने जेव्हा पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला, ते सगळं आयोजित करणारा एक फ्रेंच माणूस होता. त्या कार्यक्रमाला उसळलेल्या गर्दीमध्ये त्यांनी तीन-चार मुली ठेवल्या होत्या. त्यांना पैसे दिले होते. बाहेर एक रुग्णवाहिका उभी केली होती. त्यांचं काम काय, तर फ्रँक सिनात्रा आला की त्यांनी किंचाळायला सुरुवात करायची. बेशुद्ध पडल्या असं दाखवायचं. मग लोक त्यांना डोक्यावरून असे बाहेर घेऊन जातील. त्यांनी रुग्णवाहिकेमध्ये बसायचं. त्यांचे पैसे घ्यायचे आणि निघून जायचं.. तो कार्यक्रम संपल्यावर लक्षात आलं की अशा तीस-चाळीस मुली गेल्या. बेशुद्ध पडल्या. म्हणजे त्यांनी पैसे देऊन काही तीन-चार मुली ठेवल्या होत्या. परंतु फ्रँक सिनात्राचं खरोखर ते वलय होतं. त्यांना वाटलं, की ते ते वलय तयार करीत आहेत. परंतु ते होतं.’ भट्टाचार्य सांगतात, ‘तसं अमिताभ बच्चनना आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा वलय काय असत हे आम्ही पहिल्यांदा पाहिलं.’

आज चित्रपटांमध्ये घेतले जाणारे पैसे हे पाहिलं, तर अमिताभ यांचं नाव आणि ते चित्रपटांसाठी घेत असलेले मानधन यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ते फार पैसे घेत नाहीत चित्रपटांसाठी. आज बाकीचे खान आणि मंडळी जसे शंभर-दीडशे कोटी वगरे घेतात असं म्हणतात, तसं त्यांचं नाही. ते दहा कोटींच्या आतले आहेत. परंतु त्यांचा चित्रपट हा आज एकहाती चालत नसला, लोकांना तो आवडत असला, तरी ब्लॉकबस्टर म्हणतात तसा काही होत नसला, तरीही ते जेव्हा चित्रपटाबाहेर दिसतात, त्या वेळेला पाहणाऱ्याची दृष्टी पहिल्यांदा अमिताभ यांच्याकडे जाते, मग इतर कलाकारांकडे जाते. हे का होतं?

आता तुम्ही म्हणाल, की हे नुसतं अमिताभ यांच्या उंचीमुळे होतं. तर तसं नसतं. तुमच्या मनाच्या कोपऱ्यात अनेक गोष्टी लपलेल्या असतात, त्या सगळ्याचं एकत्र पॅकेज करून तुम्ही अमिताभ यांच्याकडे पाहता. तुम्हाला त्यांचे संस्कार दिसतात, तुम्हाला त्यांची भाषा आठवते, त्यांचे शब्द आठवतात, अभिनय आठवतो, त्यांच्या भावमुद्रा आठवतात. अशा सगळ्या गोष्टी त्या पॅकेजमध्ये असतात म्हणून तुम्ही तिकडे बघता. तेच तुम्ही इतर कलाकारांकडे पाहता, तेव्हा तुम्हाला त्यांचे अपघात दिसतात, त्यांच्या शिव्या दिसतात, त्यांच्या इतर गोष्टीही दिसू लागतात. तेव्हा एखाद्या व्यक्तिमत्त्वातला हा जो फरक असतो, तो कायमच राहणार.

आता अमिताभवर एक आरोप होतो, की ते नेहमी व्यवस्थेच्या बाजूने राहिले. त्याला त्यांनी दिलेलं एक उत्तर आहे, की ते माझं काम नाही आणि ते मला जमत नाही. किंबहुना माझा तो स्वभाव नाही. ते निवडणुकीच्या राजकारणात पडले होते. पण त्यावर त्यांनी सांगितलंय, की माझे आणि माझ्या कुटुंबाचे गांधी कुटुंबाशी राजकारणापलीकडचे जवळचे संबंध होते. म्हणून  मी एका भावनिकदृष्टय़ा अडकलो होतो त्यात. इंदिरा गांधींची हत्या झाली होती. राजीव गांधी एकटे पडले होते. त्या वेळी त्यांनी मला निवडणुकीबाबत विचारले आणि मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही, असं होतं ते. पण त्यात गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे माझं काम नाहीये. मला हे नाही समजत. मी हे नाही करू शकत. त्याच्यानंतर पुढं अमिताभ बच्चन यांच्याबाबत अशा अनेक वावडय़ा आल्या, की हे परत राजकारणात जाणार. पण ते म्हणाले, माझं कामच नाही ते. मी एक कलाकार आहे. सामाजिक आणि राजकीय भूमिका घेणे हे काही माझं काम नाही. ती त्यांनी घ्यायला हवी की नाही, हा नंतरचा मुद्दा. ती आपण अपेक्षा करतोय. परंतु एक व्यक्ती म्हणून त्यांना स्वत:ला काही वाटणं स्वाभाविक आहे ना!  कसं होतं, की आचार्य अत्रे उत्तम विनोदी लेखक होते आणि गंभीर लेखकही. त्यांचं लिखाण महाराष्ट्राला आवडायचं. आजही आवडतं. तेच पु. ल. देशपांडे यांच्या बाबतीतही आहे. की त्यांचं लेखन आजही लोकांना आवडतं. पण म्हणून आचार्य अत्रेंनी घेतलेल्या भूमिका या पु. ल. देशपांडेंनीही घ्यायला पाहिजेत ही जी अपेक्षा आपण बाळगतो, ते अयोग्य आहे. प्रत्येक व्यक्तीकडून तुम्ही अगोदरच्या व्यक्तीने केलेल्या गोष्टींची अपेक्षा धरणं हे मला वाटतं चुकीचं आहे. आता अमेरिकेतल्या मेरिल स्ट्रीप या अभिनेत्रीने डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेचं उदाहरण या संदर्भात घेतलं, तर असं पाहा, की अमेरिकेची आजपर्यंतची परंपरा अशी आहे, की अभिनेते हे उघडपणे एखाद्या पक्षाला पाठिंबा देतात. पक्षात गेलेले नाहीयेत. हे आजचं नाही. गेल्या शंभर वर्षांचं आहे. आपल्याकडे ही परंपराच नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे अशा भूमिका घेत नसतील, याचं कदाचित एक कारण म्हणजे प्रत्येक सरकार पाच वष्रे टिकेल याची हमीपण नसते! त्यांच्याकडे दोनच पक्ष आहेत. सतराशेसाठ पक्ष नाहीत आणि भूमिका घ्यायची, तर ती कोणाची आणि कोणासाठी घ्यायची? पण तुम्ही जर नीट बघितलं, तर अमिताभ बच्चन यांचं बाळासाहेबांच्या जवळ जाणं किंवा गांधी घराण्याबरोबर असणं या गोष्टी त्यांनी कधी टाळल्यापण नाहीत किंवा नाकारल्यापण नाहीत.

हल्ली एक टीका ऐकायला मिळते, की अमिताभ जाहिरातीत फार दिसतात. शेवटी जाहिरात किंवा चित्रपट हे एक प्रॉडक्ट आहे. ते घ्यायला भाग पाडण्याची ताकद त्या कलाकारामध्ये असली पाहिजे. जर तीन तासांचा चित्रपट कन्व्हिन्स करण्याची ताकद अमिताभ बच्चन यांच्यामध्ये असेल, तर तीस सेकंदांची जाहिरात कन्व्हिन्स करणं हा त्यांच्यासाठी अगदी हातचा मळ आहे. आणि तेही करताना अभिनय आहे. आणि एक प्रतिमा तुमच्यासमोर येऊन तुम्हाला कन्व्हिन्स करते, तेव्हा तुम्ही सहमत होताच ना! आता यात ‘ओव्हर-एक्स्पोजर’चा मुद्दा येतो. पण असे जे कलाकार असतात ना, त्यांचं ओव्हर-एक्स्पोजर अजून काय व्हायचंय? तसं अनेकांना वाटणं स्वाभाविक आहे. पण आज जर अमिताभ बच्चन बोलत असतील, तर ते जे बोलतात ते खूप महत्त्वाचं असतं ना! ते तुम्हाला ऐकावंसं वाटतं. जर ओव्हर-एक्स्पोजर असतं तर ते तुम्हाला ऐकावंसं वाटलं नसतं. मी अमिताभ बच्चनना बघतो, ते काही भक्त म्हणून बघत नाही. एवढा काही दूधखुळा नाही मी, की भक्त म्हणून बघायला. पण मला वाटतं, कुठलंही कॅरेक्टर तुम्हाला नीट निरीक्षण करून पाहिलं पाहिजे. की ती व्यक्ती अशी का वागतेय, का बोलतेय, ती कसं बोलतेय. आज मला सांगा, या क्षणाला ट्विटरवर अमिताभ बच्चन यांचे जेवढे ‘फॉलोअर्स’ आहेत, तेवढे अख्ख्या आशियात कुणाचे आहेत? आणि तुम्हाला-आम्हाला काय वाटतंय यापेक्षा एक जाहिरात संस्था नावाची एक गोष्ट असते. त्यांच्याकडे येणारे अहवाल असतात. आणि त्या अहवालानुसार त्यांना वाटत असेल, की हा माणूस आल्यानंतर विक्री वाढतेय तर ते त्यांना घेणारेच आहेत.

आणि कसं असतं.. एक आर्या आहे कवी मोरोपंत यांची-

कोण कुणाचा नाही जगती, संकटसमयी सोडून जाती

बालपणाचा मित्र परंतु वेळप्रसंगी म्हणे कोण तू

प्रेमिकेचा असे चाहता, माता होता मारे लाथा

पसा असता मित्र भोवती, गरीब होता कुणी न पुसती

अमिताभ यांच्या वाईट काळात कोणी उभे राहिले का हो? आणि आज अमिताभ यांचे सगळे पारडेच बदलले आहे. अशा वेळेला तो माणूस म्हणाला, मी करीन ते करीन. आता वयाची पंचाहत्तरी आलेली आहे. अजून ओव्हर-एक्स्पोजर म्हणजे काय असतं? पण या माणसाने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत जे दिलंय, ते भारताच्या चित्रपटसृष्टीच्या संपूर्ण इतिहासात कोणी दिलंय का?

अमिताभ बच्चन यांचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं, तर मी असं म्हणेन की, जाणिवा जिवंत असलेला कलाकार आहे तो. आणि तुमच्या जाणिवा जर जिवंत असतील, तर तुम्हाला मरण नाही. समाजात अशी अनेक माणसं असतात, की जी भूतकाळात जगत असतात. पण अमिताभ हा वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार करून जगणारा माणूस आहे. हीच गोष्ट लताताईंकडे, आशाताईंकडे दिसते. हीच गोष्ट किशोरकुमार – आज आपल्यात नसले तरी – त्यांच्यात दिसते. हीच गोष्ट तुम्हाला रफीसाहेबांकडेपण दिसते. आणि हीच गोष्ट तुम्हाला सचिनच्या फटक्यांमध्येही दिसते. याचं कारण जाणिवा जिवंत असणं..

तो वाद…

मागे माझा आणि अमिताभ यांच्याबद्दलचा वाद झाला होता असं म्हणतात. पण ती गोष्ट निराळी होती.  माझ्या विधानामुळे नव्हता झाला तो. मी अगदी सोपं सांगितलं होतं, की एखाद्या इतक्या मोठय़ा कलावंताला जर त्यांच्या राज्याविषयी प्रेम असू शकतं, तर राज ठाकरे हा खूप छोटा माणूस आहे, त्याला स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम नसेल का? एवढाच विषय होता. पण ते काय वादंग इंग्रजी आणि हिंदी माध्यमांनी चालवलं त्या वेळेला. त्यानंतर जया बच्चन यांनी त्यात काही हस्तक्षेप केला, त्या काही गोष्टी बोलल्या खरं तर त्यानंतर वाद झाला. तेव्हाही माझ्या भाषणांत तुम्ही ऐकलं असेल- मी म्हणालो होतो की गेल्या शतकामध्ये इतका मोठा कलावंत झालेला नाही. हे माझं वाक्य होतं. ते आजही ध्वनिचित्रीत झालेलं यू-टय़ूबवर आहे. मध्यंतरी ते एकदा माझ्या पक्षाच्या व्यासपीठावर आले होते, तेव्हाही त्यांच्या समक्ष मी हेच बोललो होतो. अनेकांना वाटेल, की हा अमिताभबद्दल आता काय बोलतोय.. तर अगोदरही मी हेच बोललो होतो.
राज ठाकरे

मराठीतील सर्व दिवाळी अंक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackerays article on amitabh bacchan
First published on: 26-03-2018 at 14:04 IST