24 February 2021

News Flash

लिनक्सची वाढ – तिसरा टप्पा

एकदा एखादी गोष्ट मनात घेतली की ती तडीस नेण्याचा हॉलचा स्वभाव होता.

मार्च १९९४ मध्ये लिनक्सची इंटेलच्या पेंटिअम चकती असलेल्या संगणकांवर व टीसीपी/आयपी नेटवर्कवर चालू शकणारी आवृत्ती प्रसिद्ध केल्यानंतर लिनक्सच्या पुढच्या टप्प्यातल्या वाढीला एक घटना कारणीभूत ठरली.  १९९४च्या उत्तरार्धात टॉरवल्ड्सची भेट एका परिषदेत योगायोगाने जॉन हॉल या प्रख्यात युनिक्स तंत्रज्ञाशी झाली. हॉल तेव्हा डीईसी (डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन) कंपनीत काम करत होता व डीईसीच्या लघुसंगणकांवर चालू शकणाऱ्या प्रोप्रायटरी युनिक्सच्या निर्मितीत (ज्याला डीईसीने अल्ट्रिक्स – व ट्रिक्स असं नाव दिलं होतं.) त्याचा मोलाचा वाटा होता. तोपर्यंत हॉल हा टॉरवल्ड्सच्या लिनक्स प्रणालीबद्दल फक्त ऐकून होता; पण त्या दिवशीच्या भेटीत प्रत्यक्ष टॉरवल्ड्सने दाखवलेल्या लिनक्सच्या प्रात्यक्षिकाने हॉल विलक्षण प्रभावित झाला.

हॉल हा काहीसा विक्षिप्त व शीघ्रकोपी असला (म्हणूनच त्याच्या सहकाऱ्यांमध्ये तो ‘मॅड डॉग’  या टोपणनावाने प्रसिद्ध होता.) तरी हाडाचा संगणक तंत्रज्ञ होता. लिनक्सचे तांत्रिक श्रेष्ठत्व व दांडग्या कार्यक्षमतेबद्दल त्याचे अनुकूल मत बनले व त्याने लिनक्सला डीईसीमध्ये आणण्याचा निर्धार केला.

यात दोन प्रमुख अडचणी होत्या. एक म्हणजे डीईसीची मानसिकता जरी ओपन सोर्सच्या विरोधात नसली तरीही त्याचा पुरस्कार करणारी नक्कीच नव्हती. तसेच डीईसीच्या संगणक संचावर प्रोप्रायटरी युनिक्स (अल्ट्रिक्स) व्यवस्थित चालत होती. दुसरी त्याहून महत्त्वपूर्ण अडचण तर लिनक्समध्येच होती. तोपर्यंत लिनक्स केवळ इंटेल मायक्रोप्रोसेसर असलेल्या संगणकांवर चालण्यास सक्षम होती. तिला डीईसीच्या संगणकांवर चालविण्यासाठी (‘पोर्टिग’) लिनक्सच्या कर्नलमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याची गरज होती.

एकदा एखादी गोष्ट मनात घेतली की ती तडीस नेण्याचा हॉलचा स्वभाव होता. त्याने सर्वप्रथम लिनक्सला डीईसीच्या प्रगत स्वरूपाचा अल्फा मायक्रोप्रोसेसरवर चालवण्यासाठी टॉरवल्ड्सला गळ घातली. त्यासाठी त्याने टॉरवल्ड्सला डीईसीच्या तंत्रज्ञांची मदत देण्याची तसेच डीईसीचे संगणकीय हार्डवेअर मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली.

त्याच्याच जोडीला त्याने डीईसीमध्ये लिनक्सला अनुकूल अशी वातावरणनिर्मिती करणं सुरू केलं. तांत्रिक कुवतीत लिनक्स ही अल्ट्रिक्सपेक्षा काकणभर सरसच होती. त्यामुळे डीईसीच्या तांत्रिक सल्लागार मंडळास पटवणं हॉलला फारसं जड गेलं नाही; पण त्याहीपुढे जाऊन त्याने आपलं म्हणणं डीईसीच्या संचालकीय मंडळाच्या गळी उतरवलं व या प्रकल्पासाठीचं आर्थिक साहाय्य आपल्या पदरी पाडून घेतलं.

डीईसीबरोबरची ही भागीदारी लिनक्स व डीईसी दोघांसाठीही परस्परपूरक होती. लिनक्स प्रकल्पात आपल्या तंत्रज्ञांची ऊर्जा व वेळ खर्च करणारी आणि त्यात आर्थिक गुंतवणूक करणारी डीईसी ही संगणक क्षेत्रातली पहिली मोठी कंपनी होती. हा भागीदारीचा निर्णय म्हणजे डीईसीने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना उद्देशून केलेलं एक स्पष्ट व जोरकस विधान होतं; जे म्हणजे डीईसी ही लिनक्स व एकंदरीतच ओपन सोर्स सॉफ्टवेअरसोबत काम करणार आहे, त्याला दुर्लक्षून किंवा त्याच्या विरोधात नाही.

दुसऱ्या बाजूला टॉरवल्ड्सदेखील डीईसीबरोबर भागीदारी करून लिनक्सवर काम करणाऱ्या जगभरात विखुरलेल्या तांत्रिक समुदायांमध्ये हे अधोरेखित करू इच्छित होता की, लिनक्स हे केवळ काही तंत्रज्ञांनी आपल्या फावल्या वेळातला छंद म्हणून बनवलेले सॉफ्टवेअर नाहीए. तर ती एक पहिल्या श्रेणीची व विविध प्रकारच्या संगणकीय हार्डवेअर संचांवर चालणारी ऑपरेटिंग प्रणाली आहे. लिनक्सची एक काळाच्या पुढची अतिप्रगत ऑपरेटिंग प्रणाली अशी ‘ब्रँड इमेज’ तयार होण्यास यामुळे पुष्कळच मदत झाली.

डीईसीचे निष्णात तंत्रज्ञ व त्यांना जगभरातल्या तांत्रिक समुदायांकडून मिळालेली भरभक्कम साथ यांच्या जोरावर टॉरवल्ड्सने १९९६च्या पूर्वार्धातच लिनक्सची दुसरी आवृत्ती (लिनक्स २.०) प्रकाशित केली. यात लिनक्सच्या कर्नलमध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल करून तिला इंटेल तसेच डीईसीच्या अल्फा मायक्रोप्रोसेसर असलेल्या संगणक संचांवर चालण्यासाठी सक्षम बनवलं होतंच, पण त्याचबरोबरीने त्या काळात प्रचलित असलेल्या इतर संगणक संचांवर (जसं मोटोरोला, पॉवर पीसी वगैरे) काम करण्यास सुसंगत (compatible) बनवलं होतं.

एका बाजूला तांत्रिकदृष्टय़ा लिनक्स विविध प्रकारच्या संगणकीय आरेखनांवर चालण्यासाठी सक्षम होत होती, तर दुसऱ्या बाजूला तिचं वितरणही वापर सुलभतेच्या दृष्टीने (ease of use) अधिक परिपक्व बनत होतं. सुरुवातीपासूनच लिनक्स ही हॅकर संप्रदायाने हॅकर संप्रदायासाठी बनवलेली प्रणाली होती. साहजिकच लिनक्स वापरकर्त्यांची तांत्रिक कुवत गृहीत धरली गेली होती व त्यामुळेच ती संगणकावर चढविण्यासाठी व वापरण्यासाठी सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी किंवा अगदी थोडंफार प्रोग्रामिंग कौशल्य असणाऱ्या तंत्रज्ञांसाठीसुद्धा विण्डोजसारखी सुलभ नव्हती.

पण १९९४ नंतर जसजसा लिनक्सचा जोमाने प्रसार व्हायला लागला तशी विविध समुदायांकडून लिनक्सला संगणकावर चढवण्यासाठी सुलभ व सुटसुटीत प्रक्रियेची मागणी सातत्याने व्हायला लागली. लिनक्सला अशा पद्धतीने एकात्मक बनविण्यासाठी एखाद्या सॉफ्टवेअर इंटीग्रेटरची गरज होती जो लिनक्सच्या विविध भागांच्या (जसं कर्नल, शेल, एडिटर वगैरे) नवीनतम आवृत्त्या एकत्रित करेल, त्यांची विशिष्ट हार्डवेअर संचांवरची योग्यता तपासेल व अखेरीस वापरकर्त्यांला त्याच्या संगणकावर विनासायास चढू शकेल असे लिनक्स सॉफ्टवेअर ‘पॅकेज’ स्वरूपात उपलब्ध करून देईल. लिनक्सच्या पॅकेज पद्धतीच्या वितरणाची ही नांदी होती.

या पद्धतीची सुरुवात पहिल्यांदा इयन मरडॉक या परडय़ू विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांने केली. लिनक्सला पॅकेज स्वरूपाच्या वितरणास तयार करण्यासाठीसुद्धा त्याने ओपन सोर्स प्रक्रियेचाच आधार घेतला व विविध समुदायांच्या सहयोगाने (ज्यात फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनचाही महत्त्वाचा वाटा होता.) प्रथमच लिनक्सला पॅकेज स्वरूपात उपलब्ध करून दिलं. या प्रकल्पाचं नाव होतं ‘डेबियन’!

याचं पुढचं पाऊल टाकलं इगड्रासिल कॉम्पुटिंग

(igdrasil Computing) या कंपनीने! तिने प्रथमच लिनक्सला केवळ ९९ अमेरिकी डॉलरच्या मोबदल्यात वापरकर्त्यांला अत्यंत सुलभपणे आपल्या संगणकावर चढवता येईल अशा स्वरूपात, त्या काळात प्रसिद्ध पावत असलेल्या कॉम्पॅक्ट डिस्कवर (CD ROM) उपलब्ध करून दिलं. ही ९९ डॉलर्सची किंमत कंपनी लिनक्ससाठी आकारत नव्हती तर ही किंमत लिनक्स सुटसुटीतपणे उपलब्ध करून देण्याच्या सुविधेची होती. पुढील काळात उदयास आलेल्या लिनक्सभोवती सेवा प्रदान करण्याच्या विविध बिझनेस मॉडेल्सची ही केवळ सुरुवात होती.

इगड्रासिल कॉम्पुटिंग एवढय़ावरच थांबली नाही. तोवर लिनक्स वापरकर्त्यांचे लिनक्सबरोबर संभाषण करण्याचे ‘टेक्स्ट’ हेच माध्यम होते. इगड्रासिलने प्रथमच लिनक्सला (विण्डोजप्रमाणे) ग्राफिकल ऑपरेटिंग प्रणाली बनविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ‘मोटिफ’ या सॉफ्टवेअर संचाची मदत घेतली. मोटिफ महाग तर होतेच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते एक प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर होते व त्याच्यासोबत त्याचा सोर्स कोड देणं अशक्य गोष्ट होती.  इगड्रासिलची ही कृती पुरोगामी स्वरूपाची असली तरीही वादग्रस्त होती. स्टॉलमन व फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनच्या मताप्रमाणे तर हे अक्षम्य पाप होते, पण बऱ्याच लिनक्स वापरकर्त्यां समुदायांचा मोटिफ वापरण्यास पाठिंबा होता. त्यांच्या दृष्टीने तत्त्वांपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन जास्त महत्त्वाचा होता. ओपन सोर्स सॉफ्टवेअरसोबत इतर प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरचे एकत्रित वितरण हा पुढे जाऊन ओपन सोर्स समुदायांचे विभाजन करणारा एक प्रमुख मुद्दा बनणार होता ज्याची सुरुवात १९९४-९५ मध्येच झाली होती.

७०च्या दशकात प्रथम युनिक्स, नंतर बीएसडी व फ्री सॉफ्टवेअर फाऊंडेशनपासून सुरू झालेल्या ओपन संस्कृती व व्यवस्थेच्या प्रवासाने ९०च्या दशकाच्या मध्यावर लिनक्समुळे बरीच मजल गाठली होती. जगभरात विखुरलेले तंत्रज्ञ व वापरकर्त्यांचे अनेक समुदाय लिनक्स व त्यासारख्या इतर ओपन सोर्स प्रकल्पांवर जोमाने कार्यरत होते. असं असलं तरीही या समुदायांना स्वत:ची अशी सामायिक ओळख मिळाली नव्हती, कारण या चळवळीचे वा व्यवस्थेचे अधिकृत नामकरणच अजून झाले नव्हते. या व्यवस्थेचे नामकरण करून तिला स्वत:ची ओळख मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम केले एरिक रेमंड या ख्यातनाम अमेरिकन तंत्रज्ञ व लेखकाने; ज्याचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.

– अमृतांशू नेरुरकर

amrutaunshu@gmail.com

(लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 1:06 am

Web Title: computer scientist jon hall
Next Stories
1 लिनक्सची वाढ – दुसरा टप्पा
2 लिनक्सची वाढ – पहिला टप्पा
3 लिनस टॉरवल्ड्स व लिनक्सचा जन्म
Just Now!
X