16 February 2019

News Flash

रेड हॅट आणि व्यावसायिक ओपन सोर्स

अत्युच्च कार्यक्षमता, सुरक्षित आरेखन व तत्पर सेवा या गोष्टींसाठी रेड हॅटच्या प्रणाली ओळखल्या जातात.

|| अमृतांशू नेरुरकर

रेड हॅट ही २१व्या शतकातली जगातली सर्वात मोठी १०० टक्के ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा व्यवसाय करणारी कंपनी आहे. केवळ व्यावसायिक परिघातच नव्हे तर अनेक देशांच्या शासकीय कामकाजाच्या प्रणाली रेड हॅट लिनक्सवर चालवल्या जातात. तसेच अनेक शैक्षणिक व संशोधन संस्थांमध्येसुद्धा रेड हॅट लिनक्सचा हमखास वापर केला जातो.

अत्युच्च कार्यक्षमता, सुरक्षित आरेखन व तत्पर सेवा या गोष्टींसाठी रेड हॅटच्या प्रणाली ओळखल्या जातात. त्यामुळे पुष्कळ कार्यक्षमतेची मागणी करणारी एखाद्या संस्थेतील अंतर्गत प्रणाली असो अथवा लाखो करोडो लोकांकडून सतत वापरलं जाणारं एखादं सार्वजनिक संकेतस्थळ असो, बऱ्याचशा कंपन्या रेड हॅट लिनक्सला पसंती देताना दिसतात. भारतातीलच उदाहरण द्यायचं झालं तर ज्या संकेतस्थळाने आपल्या रेल्वे प्रवासासाठी तिकीट आरक्षित करण्याचा अनुभव संपूर्णत: बदलून टाकला, ते भारतीय रेल्वेचे आयआरसीटीसी (IRCTC) संकेतस्थळ पूर्णपणे रेड हॅट एन्टरप्राईस लिनक्सवर चालतं. त्याचबरोबर भारतातल्या कोटय़वधी लोकांचा योगक्षेम वाहणाऱ्या एलआयसीच्या विमा उतरवण्यापासून, त्याचे हप्ते भरण्यापासून, कालावधी पूर्ण झाल्यावर विम्याची रक्कम मिळवण्यापर्यंत वापरात असलेल्या सर्व सॉफ्टवेअर प्रणाली रेड हॅट लिनक्सवरच चालत आहेत.  रेड हॅट आज केवळ लिनक्सपुरती मर्यादित नाहीये. महाजालातल्या विविध प्रकारच्या प्रणालींचे आरेखन करण्यासाठी तसेच मोबाइल, क्लाऊड कॉम्प्युटिंग, व्हच्र्युअलायजेशनसारख्या आजच्या घडीच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सॉफ्टवेअर प्रणाली बनविण्यामध्येदेखील रेड हॅट कार्यरत आहे व महत्त्वाचं म्हणजे रेड हॅटने आपल्या सर्व प्रणाली १००% ओपन सोर्स स्वरूपातच उपलब्ध करून दिल्या आहेत.

आजतागायत केवळ ओपन सोर्सचा व्यवसाय करूनदेखील रेड हॅटची यशस्वी होण्यामागची कारणं शोधायला गेलं तर असं दिसून येतं की कंपनीची तिच्या सुरुवातीच्या कालखंडातली (१९९४-९८) वाढ फारशी नेत्रदीपक नव्हती. लिनक्सवर सेवा पुरवणाऱ्या इतर कंपन्यांसारखीच ती एक कंपनी होती. पण ऑगस्ट  १९९९च्या आयपीओनंतर रेड हॅटने मागे वळून पाहिले नाही. १९९९ सालात रेड हॅटमध्ये अजून एक घटना घडली ज्याने तिला आपल्या प्रतिस्पध्र्याच्या अनेक योजने पुढे नेले. डिसेंबर १९९९ मध्ये रेड हॅटच्या स्थापनकर्त्यांपैकी एक असलेला, बॉब यंग कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पायउतार झाला व रेड हॅटच्या नेतृत्वपदाची माळ पडली अत्यंत धोरणी व व्यावसायिक दृष्टिकोन असलेल्या मॅथ्यू सुलिकच्या गळ्यात!

सुलिकच्या लगेचच ध्यानात आलं की १००% ओपन सोर्स राहूनही चांगल्यापैकी महसूल व नफा कमवायचा असेल तर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून काही नावीन्यपूर्ण मार्ग चोखाळण्याची गरज आहे. यासाठी सर्वात पहिल्यांदा त्याने लिनक्स संबंधित सेवा पुरवण्याच्या शुल्क आकारणीमध्ये एक दूरगामी बदल केला. तोवर सर्व ओपन सोर्स सेवापुरवठादार कंपन्या आपल्या ग्राहकांकडून एकरकमी किंमत आकारत होत्या. रेड हॅटने प्रथमच ग्राहकांच्या सदस्यत्वाची योजना (Subscription model) सुरू केली.

यात रेड हॅट तिच्या रेड हॅट एन्टरप्राईज लिनक्स सॉफ्टवेअरसाठी कसलेही शुल्क आकारत नव्हती. त्याचा सोर्स कोडदेखील सॉफ्टवेअरसोबत वितरित करत होती. ग्राहक जी काही सदस्यत्वाची किंमत मोजत होता त्यात त्याला २४७७ सॉफ्टवेअरचा सपोर्ट मिळत होता – मग त्यात त्याच्या शंकांचे निरसन, सॉफ्टवेअर हे सव्‍‌र्हर वा संगणकावर चढवण्यासाठीची संपूर्ण मदत व मार्गदर्शन, सुधारित सॉफ्टवेअरची आवृत्ती ग्राहकाला देऊन त्याच्याकडचे सॉफ्टवेअर अद्ययावत करणे अशा अनेक गोष्टी समाविष्ट होत्या.

रेड हॅटच्या सॉफ्टवेअरचे सदस्यत्व हे एक ते पाच वर्षांसाठी ग्राहक घेऊ  शकत होता. परत एखाद्या ग्राहकाचे सदस्यत्व संपले की त्याची नूतनीकरण करण्याची कोणतीही सक्ती रेड हॅटने ग्राहकावर लादली नाही. ग्राहकाकडे असलेले सॉफ्टवेअर (त्याच्या सोर्स कोडसकट) त्याच्याकडेच राहणार होते व निरंतर कामही करणार होते. फक्त रेड हॅट तंत्रज्ञांकडून मिळणारा सपोर्ट बंद होणार होता. रेड हॅटचे हे ‘सबस्क्रिप्शन मॉडेल’ अत्यंत यशस्वी झाले. आज भारतासकट जगभरातल्या आघाडीच्या वित्तीय, अभियांत्रिकी, फार्मास्युटिकल तसेच २१व्या शतकातल्या डिजिटल कंपन्या रेड हॅटच्या विविध ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे सदस्यत्व घेऊन ते आपल्या अतिमहत्त्वाच्या व्यावसायिक प्रणालींसाठी वापरत आहेत.

व्यावसायिक जगासाठी रेड हॅट एन्टरप्राईज लिनक्स ही प्रमाण ऑपरेटिंग प्रणाली बनविण्यासाठी सुलिकने केलेले आणखी एक महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे त्याने घडवून आणलेल्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर जगतातल्या दिग्गज कंपन्यांबरोबरच्या भागीदाऱ्या! कोणत्याही कंपनीसाठी ऑपरेटिंग प्रणालीची निवड केली की सगळे प्रश्न सुटत नाहीत. ऑपरेटिंग प्रणाली हा केवळ एक पाया असतो ज्यावर ‘अ‍ॅप्लिकेशन’ सॉफ्टवेअर चालतात, जसे कंपनीमधली सर्व प्रकारची माहिती साठवणारे डेटाबेस, कंपनीतल्या विविध विभागांच्या कामकाजाच्या पद्धतींचे सुसूत्रीकरण करणारे ईआरपी (Enterprise Resource Planning) सॉफ्टवेअर, ग्राहकांची माहिती साठवून त्यांच्याशी सुसंवाद साधणारे सीआरएम (Customer Relationship Management) सॉफ्टवेअर इत्यादी!

रेड हॅटने आपली एन्टरप्राईज लिनक्स प्रणाली इतर दिग्गज सॉफ्टवेअर कंपन्यांच्या प्रणालींबरोबर प्रमाणित (certified) करून घेतली. ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत होते. १९९९ नंतरच्या दोन एक वर्षांतच रेड हॅट लिनक्स हे ओरॅकल (8i डेटाबेस), आयबीएम (Db2 डेटाबेस) आणि इन्फॉरमिक्ससारख्या प्रोप्रायटरी डेटाबेस प्रणालींबरोबर प्रमाणित झाले. पुढे एसएपी या ईआरपी सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या जगातल्या सर्वात मोठय़ा कंपनीने आपले R/3 हे ईआरपी सॉफ्टवेअर रेड हॅट लिनक्सवर प्रमाणित केले. एसएपीची R/3 प्रणाली अध्र्याहून अधिक फॉच्र्युन ५०० कंपन्या वापरत असल्याने रेड हॅटला व पर्यायाने लिनक्सला एक फार मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली.

याच्याच बरोबर विविध संगणकीय हार्डवेअरचे उत्पादन करणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांनी (एचपी, आयबीएम, डेल, कॉम्पॅक वगैरे) आपल्या सव्‍‌र्हरवर चालण्यासाठी रेड हॅट लिनक्सला प्रमाणित केले. याची सुरुवात झाली एचपीपासून, जेव्हा रेड हॅट आणि एचपीने संयुक्तपणे असे जाहीर केले की एचपी आपल्या सुप्रसिद्ध ‘नेटसव्‍‌र्हर’वर चालण्यासाठी रेड हॅट एन्टरप्राईज लिनक्सला प्रमाणित करत आहे. एचपी तेवढय़ावरच थांबली नाही. रेड हॅट लिनक्सला प्रमाणित केल्यानंतर काहीच महिन्यांच्या अंतराने एचपीने रेड हॅटव्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या (जसे व्हीए लिनक्स) व ना-नफा तत्त्वावर चालणाऱ्या प्रकल्पांच्या (जसे डेबियन) लिनक्स वितरणास आपल्या सव्‍‌र्हरवर प्रमाणित केले. थोडय़ाच कालावधीत एचपीचा कित्ता आयबीएम, डेल, कॉम्पॅक, सिलिकॉन ग्राफिक्ससारख्या कंपन्यांनी गिरवला.

एका बाजूला ऑपरेटिंग प्रणाली ज्याच्यावर चालते ते सव्‍‌र्हर हार्डवेअर व दुसऱ्या बाजूला ऑपरेटिंग प्रणालींवर चालणारे अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर, या दोघांवरही लिनक्स प्रमाणित झाल्यामुळे लिनक्सची व एकंदरीतच ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्थेची विश्वासार्हता व्यावसायिक जगात कैक पटीने वाढली आणि २००० सालानंतर ओपन सोर्स सॉफ्टवेअर व्यवस्था ही प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरच्या खांद्याला खांदा लावून मुख्य प्रवाहात सामील झाली.

ओपन सोर्स व्यवस्थेच्या कक्षा रुंदावण्यासाठी अजून एक घटक कारणीभूत ठरला, तो म्हणजे या व्यवस्थेच्या विविध अंगांची विस्तृत व तपशीलवारपणे केलेली मांडणी! याचा पाया इयन मरडॉकने आपल्या डेबियन प्रकल्पाद्वारे घातला व त्यावर कळस चढवला ब्रूस पेरेन्स या निष्णात संगणक तंत्रज्ञाने! ओपन सोर्स व्यवस्थेत झालेल्या या घटनात्मक कार्याचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.

amrutaunshu@gmail.com

(लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)

First Published on May 21, 2018 12:15 am

Web Title: red hat and commercial open source