देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच करोना विरोधात सुरू असलेल्या लढाईत महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या पोलिसांना देखील करोनाने विळखा दिला आहे. राज्यभरात मागील ४८ तासांत १४० पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले असून एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

याचबरोबर एकूण करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आता ३ हजार ९६० झाली आहे. यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४६ जणांचा व उपचारानंतर बरे झालेल्या २ हजार ९२५ जणांचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

तर, मागील चोवीस तासांत देशभरात करोनाचे तब्बल १४ हजार ५१६ नवे रुग्ण आढळून आले. तर, ३७५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची संख्या आता तब्बल ३ लाख ९५ हजार ४८ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण करोनाबाधितांपैकी १ लाख ६८ हजार २६९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २ लाख १३ हजार ८३१ जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. तर आतापर्यंत देशात करोनामुळे एकूण १२ हजार ९४८ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.