विविध प्रतिनिधींकडून

जान्हवी मोरे या युवा कॅरमपटुच्या रस्ता अपघाती मृत्यूने एकूणच रस्त्यांची दुर्दशा, त्यामुळे होणारे अपघात आणि वाहतूक नियम धुडकावून वेगमर्यादा ओलांडून धावणाऱ्या वाहनांचा वाढता धोका; यावरील चर्चेला तोंड फुटले असतानाच रस्ताअपघातांचे हे सत्र सुरूच आहे. राज्यात मंगळवार रात्रीपासून १० नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.

घोडबंदर येथील मुल्लाबाग परिसरात महापालिकेच्या ठेकेदाराने मलनि:सारण वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्डय़ात मोटार उलटून सचिन काकोडकर (३७) या तरुणाचा मृत्यू ओढवल्याचे बुधवारी सकाळी उघड झाले. या खड्डय़ाभोवतालच्या पत्र्यावर लुकलुणारे दिवे बसविण्यात आले नसल्याने अपघात घडला आहे. तर ओवळा भागात मंगळवारी रिक्षा आणि मर्सडिज कारच्या धडकेत वंदना भगत (४४)  यांचा मृत्यू झाला.

नागपूरमध्ये दोन दुचाकीस्वार बहिणींना बुधवारी टिप्परने चिरडले. चाकात अडकून फरपटत गेल्याने त्यांचा भीषण मृत्यू ओढवला. पुणे जिल्ह्य़ात जुन्नर तालुक्यात उदापूर गावी पहाटे फिरायला निघालेल्या तीन ज्येष्ठ महिलांना भरधाव ट्रकने धडक दिली. तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार फाटा येथील बावखळपाडा येथे बुधवार संध्याकाळी एका कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला.