राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. करोनाविरुद्ध पहिल्या फळीत लढणाऱ्या पोलिसांना करोनाची मोठ्या संख्येनं लागण झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात तब्बल एक हजार एक पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या एक हजार एक पोलिसांमध्ये सध्या उपचार सुरू असले 851 जण, उपचारानंतर बरे झालेले 142 जण तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या आठ जणांचा समावेश आहे.

याशिवाय लॉकडाउनच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याच्या 218 घटना घडल्या असून, अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत 770 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.  महाराष्ट्र पोलीस विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

करोनाविरुद्ध देशाच्या सुरू असलेल्या युद्धात प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आदी दिवसरात्रं आपलं कर्तव्य बजावत आहेत. आपण घरात सुरक्षित रहावं म्हणून जीव धोक्यात घालून देशभराती पोलीस उन्हातान्हात रस्त्यांवर बंदोबस्तास उभे आहेत. या पोलिसांना देखील करोनाने घेरले असून त्यांचा जीव देखील धोक्यात आल्याचे दिसत आहे.

राज्यात राज्य राखीव पोलीस दलाचे 3 हजार 200 पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्या मदतीने राज्यात सध्या पोलीस दल कार्यरत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यातच येत्या काळात रमाझान ईदचा सण आहे. त्यादृष्टीनं राज्यात कायदा सुव्यवस्था राखणं आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात तातडीनं केंद्रीय शसस्त्र दलाचे 2 हजार पोलीस कर्मचारी म्हणजेच 20 कंपन्या पाठवाव्यात, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राकडे केली आहे.

“करोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल,” असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला आहे. “अन्य विषाणूंप्रमाणे करोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही,” असे मायकल जे रेयान म्हणाले. रेयान हे WHO च्या आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख आहेत.