लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोना बळीच्या संख्येने आज शंभरी पार केली. आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात १०१ रुग्ण दगावले आहेत. प्रयोगशाळेतील अहवालानुसार आठ नवे रुग्ण शनिवारी आढळून आले. रॅपिड टेस्टमध्ये सकारात्मक आलेल्या रुग्णांचाही समावेश करण्यात आल्याने एकूण रुग्ण संख्या २०६५ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या व मृत्यूदर चिंताजनक ठरत आहे.
जिल्ह्यात करोनाचा उद्रेक वाढतच आहे. शहरीभागापेक्षा ग्रामीण भागात करोनाचा वेगाने प्रसार होत आहे. रुग्णांसोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण २२९ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २२१ अहवाल नकारात्मक, तर आठ अहवाल सकारात्मक आले आहेत. काल रात्री रॅपिड टेस्टमध्ये नऊ जणांचे अहवाल सकारात्मक आले.

रॅपिड टेस्टच्या माध्यमातून आतापर्यंत ९८ रुग्ण आढळून आले. त्यांचाही समावेश रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. सध्या २८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १६३२७ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १५८४९, फेरतपासणीचे १६१ तर वैद्याकीय कर्मचाऱ्यांचे ३१७ नमुने होते. आजपर्यंत एकूण १६२८२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या १४३१५, तर सकारात्मक अहवाल रॅपिड टेस्टचे मिळून २०६५ आहेत. दरम्यान, आज दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. दोन्ही पुरुष रुग्ण असून त्यातील एक ७६ वर्षीय तर अन्य ५४ वर्षीय आहे. अकोट येथील ते रहिवासी होते. त्यांना १० जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.

आज दिवसभरात आठ जणांचे सकारात्मक अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त अहवालात चार रुग्ण आढळून आले. ते चारही पुरुष आहेत. त्यातील तीन जण बोरगाव मंजू येथील तर अन्य एक जण अकोली जहागिर ता.अकोट येथील रहिवासी आहेत. सायंकाळी आणखी चार जणांची भर पडली. त्यात दोन महिला व दोन पुरुष असून ते सर्व मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत.
८१.४५ टक्के रुग्ण करोनामुक्त
आज दिवसभरात कोविड केअर केंद्रामधून १०, खासगी रुग्णालय व हॉटेलमधून पाच असे एकूण १५ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील १६८२ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचे प्रमाण ८१.४५ टक्के आहे.