गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मिरजेचे वैशिष्टय़ असणा-या ११ स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून या कमानीवर यंदा ‘बाहुबली’ रूपातील गणेश आणि मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे छायाचित्र रेखाटण्यात आले आहे. सुमारे ५१ फूट उंचीच्या या कमानी प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत.
उद्या रविवारी होत असलेल्या विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात येत असून स्वागत कमानी उभारणीची तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर विविध ठिकाणी हिंदू एकता, मराठा महासंघ, शिवसेना, एकता मित्र मंडळ, विश्वशांती मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विश्वश्री पलवान, संभाजी तरूण मंडळ, हिंदू-मुस्लीम मंडळ आदींच्या स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.
शहरातील बहुसंख्य स्वागत कमानींवर पौराणिक व ऐतिहासिक प्रसंग रेखाटण्यात आले असून मिरजेचे रंगकर्मी उस्मान उगारे यांनी या कमानी आकर्षक रंगसंगतीत तयार केल्या आहेत. विद्युत दिव्याच्या झोतात या कमानीवर रेखाटने उजळून निघत असून कमानीवरील दृष्यासोबत सेल्फी काढण्यात प्रेक्षक बराच काळ कमानीजवळ रेंगाळत आहेत.
आज गणेश मंडळांनी मोठय़ा प्रमाणात महाप्रसादाच्या निमित्ताने अन्नदानाचे उपक्रम राबविले. हिंदू-मुस्लीम गणेश मंडळाच्या महाप्रसादाचे वाटप पोलीस अधीक्षक सुनील फुलारी आणि राज्य पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शहरातील १० मंडळांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आपण यंदा डॉल्बीला बायबाय केला असून पारंपरिक वाद्यांच्या गजरात दुपारीच मिरवणूक काढणार असल्याचे सांगितले. या वेळी उप अधीक्षक धीरज पाटील हेही उपस्थित होते. हिंदू-मुस्लीम मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक महंमद मणेर यांनीही या मंडळाच्या कार्यकर्त्यांना डॉल्बीमुक्त मिरवणुकीस प्रोत्साहित केले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2015 रोजी प्रकाशित
मिरवणुकीच्या मार्गावर मिरजेत ११ स्वागत कमानी
शहरातील स्वागत कमानींवर पौराणिक व ऐतिहासिक प्रसंग रंगकर्मी उस्मान उगारे यांनी तयार केल्या आहेत.
Written by अपर्णा देगावकर

First published on: 27-09-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 welcome arches on procession route in miraj