महाराष्ट्रात आज आणखी ११८ रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांची संख्या ३ हजार ३२० इतकी झाली आहे. तर दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. दरम्यान आज ३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजचे ३१ रुग्ण धरुन एकूण ३३१ करोना रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज ज्या सात रुग्णांचा मृत्यू झाला त्यातले पाचजण मुंबईचे तर दोघेजण पुण्यातले आहेत.


आज झालेल्या सात मृत्यूंपैकी ५ पुरुष तर दोन महिला आहेत. आज झालेल्या सात मृत्यूंपैकी एक रुग्ण ६० वर्षांवरील होता. तर इतर ६ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातील होते. मृत्यू झालेल्या सात रुग्णांपैकी ५ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग या स्वरुपाचे आजार होते. करोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत महाराष्ट्रात २०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ६१ हजार ७४० रुग्णांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ५६ हजार ९६४ नमुने हे निगेटिव्ह आले आहेत. तर ३३२० रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.

आजपर्यंत ३३१ करोना पॉझिटिव्ह रुग्णांना बरं झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात ७४ हजार ५८७ रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. ६ हजार ३७६ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. अशीही माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील तीन रुग्णांना हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आला. बुलडाणा शहरात पहिल्या करोना संसर्गिताचा मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या तिघांना १८ दिवसांपासून क्वारंटाइन करण्यात आलं होतं. उपचारानंतर या तिघांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली. त्यामुळे या तिन्ही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी “करोना हा आजार बरा होतो त्यामुळे लोकांनी घाबरुन जाऊ नये, घरी राहा सुरक्षित राहा असे आवाहनही केले. “