लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यात आणखी १२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १३० झाली. दरम्यान, आज चार जणांनी करोनावर मात केली.

बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १३२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १२० अहवाल नकारात्मक आले असून १२ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आज सकारात्मक आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूरमधील भीमनगर येथील १६ व २० वर्षीय तरुणी, नऊ वर्षीय मुलगा, ३० वर्षीय पुरुष, पारपेठ येथील ४३ वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय पुरुष, हेडगेवार नगर येथील ३६ वर्षीय पुरुष, मलकापूर तालुक्यातील धोंगर्डी येथील ७० वर्षीय वृद्ध महिला, ६२ वर्षीय वृद्ध पुरुष, मलकापूर हनुमान चौक येथील आठ महिन्याचे बाळ, २७ वर्षीय महिला तसेच लोणार तालुक्यातील ब्राम्हण चिकना येथील ३० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण १३० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत ८१ करोनाबाधित रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या रुग्णालयात ४४ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आणखी १८ नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंत १८७२ अहवाल नकारात्मक आले आहेत.
दरम्यान, आज चार जणांना कोविड केअर सेंटर येथून सुट्टी देण्यात आली. यामध्ये मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील ५० वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरुष, बुलढाण्यातील मच्छी लेआऊट येथील ३६ वर्षीय पुरुष व मलकापूर भीमनगर येथील २५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.