ऊसाच्या रसाच्या टाकीचा स्फोट होऊन बारा कामगार भाजल्याची घटना परळीजवळील पांगरी येथे असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात शुक्रवारी दुपारी घडली. जखमींना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

गरम रसामुळे वाफ साचल्याने स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. टाकीला खालच्या भागाकडून गळती लागून स्फोट झाला. टाकीत नेहमी १२० अंश डिग्री सेल्सिअस तापमानावर उकळता रस असतो. स्फोट झाल्यानंतर गरम रस अंगावर पडल्याने त्या ठिकाणी काम करणारे अभियंता धनाजी देशमुख, लहू डाके, सुनील भंडारे, हनुमंत संगापुरे, सुमित भंडारे, गौतम घुमरे, सुभाष कराड, रामभाऊ नागरगोजे, चंद्रकांत मिसाळ, आदिनाथ भंडारे, महादेव मुंडे यांच्यासह अन्य कामगार भाजले आहेत. सर्व जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातुरला हलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.