कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही ठिकाणी पावसाने आणि महापुराने कहर माजवला आहे. पंचगंगा नदीच्या खोऱ्यातला शिरोळ तालुका हा सुपीक शेतीचा प्रदेश आहे. दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या पुराचा फटका या तालुक्याला बसतोच. यावर्षीच्या पावसाने मात्र कहर माजवला आहे. नेमकं काय घडेल याची कल्पना कुणालाही नव्हती आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु झाला, पुराने कहरच माजवला.

कोल्हापूर जिल्ह्यात कनवाड हे गाव आहे आणि सांगलीमध्ये म्हैसाळ नावाचे गाव आहे. या दोन्ही गावांना जोडणारा रस्ता गेल्या १५ दिवसांपासून पाण्याखाली आहे. आज किंवा उद्या पाणी ओसरेल या भरवशावर गावकरी राहिले. मात्र गेल्या १५ दिवसांपासून पाणी ओसरलेले नाही. त्यामुळे सांगली कोल्हापूरच्या सीमेवर असलेलं कनवाड हे गावही पाण्याखाली गेलं. म्हैसाळ गावातले संग्राम गायकवाड हे ग्रामस्थ कनवाड गावात काय समस्या निर्माण झाली आहे ते जाणून होते. या गावाला मदत मिळायची गोष्ट सोडाच लक्षही गेले नव्हते. त्याचमुळेच गावकरी या गावात स्वतःच स्वतःची मदत करत आहेत. अशावेळी याच गावातल्या तरुणांनी कंबर कसली आणि गावकऱ्यांना या संकटातून सोडवण्याचा निर्धार केला.

१० ते १२ तरुणांनी ग्रामपंचायतीच्या जुन्या नावेतून पूरग्रस्तांना शेजारीच असलेल्या म्हैसाळ गावात सोडायचं ठरवलं. दिवसभर हे १२ तरुण होडीतून गावकऱ्यांना म्हैसाळ गावात सोडत राहिले. मागच्या दोन ते तीन दिवसांपासून १२ तरुणांचं हे काम सुरु आहे. आत्तापर्यंत त्यांनी २५०० जणांना पुराच्या पाण्यातून सोडवून सुखरुप स्थळी हलवलं आहे. सुरुवातीला गावकरी यायला तयार होत नव्हते. मात्र पुराचं रौद्ररुप पाहून जड अंतःकरणांनी आपल्या जनावरांना मागे सोडून हे गावकरी या तरुणांसोबत म्हैसाळ गावात जाऊ लागले. बोलभिडू डॉट कॉमने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आत्तापर्यंत २५०० जणांना कनवाडच्या तरुणांनी वाचवलं आहे. रोज सलग नाव वल्हवल्याने या मुलांच्या हाताला फोडही आले आहेत. प्रशासनाने आता डिझेल किंवा मोटरबोट पाठवून या पूरग्रस्तांचे प्राण वाचवावेत अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.